देशी कट्टा आणि एके-२०३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2019
Total Views |


 

राहुल गांधींनी २०१० साली केवळ कार्बाईन निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास केला होता, त्यात रायफलनिर्मितीचा कोणताही मुद्दा नव्हता, तर रविवारी नरेंद्र मोदींनी ‘एके-२०३’ रायफलनिर्मिती विभागाचे उद्घाटन केले. असे असतानाही असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या राहुल गांधींना कार्बाईन, छोटी हत्यारे व एके-२०३ रायफल, तसेच शिलान्यास व उद्घाटनातील फरक कळत नाही.

 

लष्कराने जवळपास १५ वर्षांपूर्वी केलेली अत्याधुनिक रायफल्सची मागणी पूर्ण करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही विद्यमान केंद्र सरकारला करावी लागली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये अत्याधुनिक अशा ‘एके-२०३’ रायफल (एके-४७ ची सुधारित आवृत्ती) निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. अमेठीतील प्रकल्पामुळे आता लष्कराला दरवर्षी ७५ हजार रायफल्सप्रमाणे साडेसात लाख रायफल्सचा पुरवठा केला जाणार आहे. भारत आणि रशियाच्या संयुक्त सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सैनिकांना शत्रूशी दोन हात करताना धडाकेबाज कामगिरी तर करता येईलच, सोबतच राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

 

सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी, देशांतर्गत उच्छाद मांडणारे नक्षलवादी आणि देशाच्या अन्य शत्रूंकडील अत्याधुनिक हत्यारांची, शस्त्रांची चर्चा नेहमीच होत आली. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यावेळीही कसाब टोळीने आधुनिक हत्यारांचा वापर केला, तर तुकाराम ओंबळे वा इतर अधिकार्‍यांनी जुन्या-पुराण्या शस्त्रांच्या साहाय्याने दहशतवाद्यांना टिपले. तेव्हाही पोलिसांसह सुरक्षा दलांना आवश्यक असलेल्या आधुनिक हत्यारांची केवळ चर्चाच होत राहिली, त्यावर निर्णय मात्र कोणीच घेतला नाही. २०१४ साली सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने मात्र सुरुवातीपासूनच सुरक्षा दलांच्या आधुनिकीकरण, आधुनिक शस्त्रास्त्रे, बुलेटप्रूफ जाकिटे, आधुनिक तोफा, नव्या पिढीतील लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, युद्धनौका आदींच्या खरेदीकडे, निर्मितीकडे लक्ष दिले. परिणामी, आताची भारतीय सुरक्षा दले नव्या जगाच्या व शस्त्रबळाच्या तुलनेत कोणत्याही शत्रूच्या तोडीसतोड सिद्ध झाल्याचे दिसते.

 

अमेठीतील रायफल निर्मिती प्रकल्पाचे महत्त्व आणखी एका कारणासाठीही आहे, ते म्हणजेच गांधी कुटुंबीय. १९६७ पासून आतापर्यंत अपवाद वगळता इथे गांधी कुटंबातील अथवा गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेलेच उमेदवार निवडून आले. संजय गांधींसह माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि विद्यमान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रदीर्घ काळापासून अमेठीचे प्रतिनिधीत्व केले. म्हणूनच अमेठीला गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्लाही म्हटले गेले. मात्र, २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याविरोधात लढताना राहुल गांधींना विजयी होता होता चांगलाच घाम फुटला होता. राहुल गांधी व स्मृती इराणी यांच्यातील मतविभागणी पाहता भाजपच्या मतांत २८.५७ टक्क्यांची वाढ, तर काँग्रेसच्या मतांत २५.७ टक्क्यांची घट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि गांधी कुटुंबीयांनी आतापर्यंत इथे केलेल्या ‘विकासा’चाही यात मोठा वाटा होता.

 

वर्षानुवर्षे एकाच मतदारसंघातून निवडून यायचे, पण तिथल्या जनतेच्या समस्या काही सोडवायच्या नाही, त्यांना कायम आशेला लावून ठेवायचे, हा कित्ता गांधी कुटुंबीयांनी देशासह अमेठीतही गिरवला. इथले रोजगाराचे, आरोग्याचे, दळणवळणाचे प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेले दिसत नाहीत. विकासाची ही जगावेगळी परिमाणे निर्माण करणार्‍या गांधी कुटुंबाला म्हणूनच इथल्या मतदारांनी झटका देत प्रचंड मताधिक्क्याने नव्हे, तर लक्षणीयरित्या घटत्या मतांनी निवडून आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी इथे उद्घाटन केलेल्या ‘एके-२०३’ रायफल्स निर्मिती प्रकल्पाचे महत्त्व या अंगानेही मोठे असल्याचे लक्षात येते. परंतु, विरोधासाठी विरोध करणार्‍या काँग्रेसला मोदींचे हे कर्तृत्व कसे सहन होईल? म्हणूनच राहुल गांधींनी लगोलग ट्विटरवर आगपाखड करत, “मोदींनी माझ्या कामाचे श्रेय ओरबाडले,” अशी टीका केली. सोबतच मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप करत त्यांना कसलीही शरम वाटत नसल्याचे राहुल म्हणाले.

 

राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना २०१० साली आपण स्वतः अमेठीतल्या आयुध निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास केल्याचे म्हटले. गेली कित्येक वर्षे तिथे छोट्या हत्यारांची निर्मिती होत असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. मात्र, राहुल गांधींनी स्वतःच्या कामाचे जे दाखले दिलेत, ते पोकळ असल्याचेच तथ्यांचा अभ्यास केल्यानंतर स्पष्ट होते. वस्तुतः लष्कराने सर्वप्रथम २००५ साली काँग्रेस सरकारकडे अत्याधुनिक रायफल्सची मागणी केली. पुढे तत्कालीन केंद्र सरकारला अशा रायफल निर्मिती प्रकल्पाची उभारणी कोठे करावी, हे निश्चित करण्यासाठी दोन वर्षे लागली, तर २००७ साली काँग्रेस सरकारने अमेठीत असा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढची तीन वर्षे इथल्या कारखान्यातून कोणत्या प्रकारच्या हत्यारांची निर्मिती करायची, हे ठरवण्यात गेली अन् ते ठरल्यानंतरही त्याची अंमलबजावणी काही झालीच नाही. दरम्यान, २०१० साली राहुल गांधींच्या उपस्थितीत इथे केवळ कार्बाईन (देशी कट्टा) निर्मिती कारखान्याचा शिलान्यास करण्यात आला, तरी इथे कोणत्या प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त रायफल्सचे उत्पादन करायचे, हे निश्चित झालेच नाही.

 

काँग्रेस सरकारच्या या वेळखाऊपणामुळेच २०१० साली ‘कॅग’ने आपल्या अहवालातून अयोग्य ठिकाण आणि अपुर्‍या देखरेखीमुळे प्रकल्प सुरू होण्यात दिरंगाई होत असल्याचा ठपका ठेवला. सध्या देशातल्या सर्वच संवैधानिक संस्थांच्या विश्वसनीयतेवर शंका घेणारे राहुल गांधी आता आपल्या सत्ताकाळातील ‘कॅग’च्या अहवालालाही खोटे ठरवणार का, हा प्रश्नही त्यामुळे विचारावासा वाटतो. दुसरी गोष्ट राहुल गांधींनी शिलान्यास केलेल्या प्रकल्पाची. वस्तुतः राहुल गांधींनी २०१० साली केवळ कार्बाईन निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास केला होता, त्यात रायफलनिर्मितीचा कोणताही मुद्दा नव्हता, तर रविवारी नरेंद्र मोदींनी ‘एके-२०३’ रायफलनिर्मिती विभागाचे उद्घाटन केले. असे असतानाही असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या राहुल गांधींना कार्बाईन, छोटी हत्यारे व एके-२०३ रायफल तसेच शिलान्यास व उद्घाटनातील फरक कळत नाही, असे दिसते. परिणामी ते, मोदी माझ्या कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप करताना दिसतात. अर्थात, राहुल गांधींच्या अशा बिनडोकपणातूनच त्यांची पप्पूछाप प्रतिमा गडद होत जाते, मात्र तेही त्यांना किंवा त्यांच्या पाठीराख्यांना कळत नाही, हे आणखी एक निराळेच वैशिष्ट्य.

 

अमेठीतल्या या प्रकल्पाबद्दलची व काँग्रेसच्या विचित्रपणाची आणखी एक माहिती म्हणजे या प्रकल्पाला ६० एकर जागेची आवश्यकता होती. परंतु, तत्कालीन केंद्र सरकारने प्रत्यक्षात जागा दिली ती फक्त ३४ एकरच. दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशातील सप-बसप सरकारांमुळेही हा प्रकल्प रखडला. मात्र, केंद्रात व राज्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर आल्यानंतर रायफल निर्मिती विभागाचे काम वेगाने सुरू झाले. तत्कालीन केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ४०० कोटींऐवजी विद्यमान केंद्र सरकारने १२ हजार कोटींचा निधी देत पैशाची कमतरता पडू देणार नसल्याचेही सूचित केले. म्हणूनच राहुल गांधींनी खरे म्हणजे आता स्वतःच्या पक्षाच्या काळातला धोरणलकवा आणि आताच्या सरकारच्या काळातल्या निर्णयक्षमतेचा विचार करायला हवा. मोदींवर टीका करण्याऐवजी आत्मपरीक्षण करायला हवे. कित्येक वर्षांपासून स्वतःच्या ताब्यातल्या मतदारसंघात येऊन नरेंद्र मोदींना कार्यक्षमता म्हणजे काय असते, हे दाखवून देण्याची वेळ का आली, याचा विचार करायला हवा; अन्यथा ते केवळ ‘मेड इन अमुक’, ‘मेड इन तमुक’च्या थापा मारत राहतील, काम मात्र मोदीच करतील आणि देशावर सत्ताही गाजवतील. अर्थात, देशातल्या जनतेलाही ताबडतोब निर्णय घेणारे मोदीच हवेत, प्रश्नाचे भिजते घोंगडे ठेवणारी काँग्रेस वा राहुल गांधी नव्हे, हेही खरेच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@