... या ढोंगी नेत्यांचे बुरखे फाडायलाच हवेत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2019   
Total Views |


 


देशातील २१ विरोधी पक्षांनी बैठक घेऊन, सरकारच्या मागे आम्ही ठामपणे उभे असल्याचे सांगायला हवे होते. पण दिसले काय? तर सरकार या घटनांचे राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांनी जे आरोप केले, त्यामुळे पाकिस्तानच्या हाती भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी आयते कोलीतच मिळाले. पाकिस्तानने भारताची बदनामी करण्याची संधी सोडली नाही.


देशापुढे कितीही गंभीर समस्या असली तरी त्यातून आपले क्षुल्लक राजकारण कसे साधता येईल, असा विचार करणारे नेते आणि त्यांचे पक्ष यांचा आज सुळसुळाट झाला आहे. या नेत्यांना सत्तेवर असलेल्या पक्षाने केलेल्या कोणत्याही कृतीमध्ये चांगले काही दिसतच नाही. देशाच्या संरक्षणासाठी केलेली कृती असो, पुलवामा घटनेचा बदला घेण्यासाठी केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ असो, त्यामध्ये त्यांना राजकारणच दिसते. देशाच्या सार्वभौमत्वावर, अस्मितेवर कोणी घाला घातल्यास ‘वयं पंचाधिकम शतम्’चे दर्शन देशाने संपूर्ण जगाला दाखवून द्यायला हवे. पण, दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. पुलवामा घटनेनंतर सरकारने, या घटनेचा बदला केव्हा, कसा आणि कोठे घ्यायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य सेनादलांना दिले. पुलवामा घटनेस जबाबदार असलेली ‘जैश-ए-मोहम्मद’ ही संघटना आणि त्या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या ‘मिराज २०००’ विमानांनी बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबाद भागातील दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ले केले. त्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले. हवाई दलाने केलेल्या कृतीचे देशवासीयांनी जल्लोषात स्वागत केले. मात्र, सरकार ज्या खंबीरपणे देशापुढे उभ्या असलेल्या समस्यांना तोंड देत आहे ते पाहून, केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून असलेल्या विरोधकांना पोटशूळ उठल्यागत झाले आहे. देशाच्या नेतृत्वाने लष्करास स्वातंत्र्य दिल्यानंतर सामर्थ्याची एक झलक हवाई दलाने पाकिस्तानला दाखवून दिली. हवाई दल त्यासाठी कौतुकास पात्र आहेच. पण, ज्या राजकीय नेतृत्वामुळे हे घडले, त्याचे श्रेय त्यांना देण्यास मात्र विरोधक तयार नाहीत. दहशतवादी तळांवर जे यशस्वी हल्ले झाले ते पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाला होईल, या भीतीने अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या निमित्ताने खार खाण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला अद्दल घडविण्याच्या पंतप्रधानांच्या भाषेमध्ये विरोधकांना राजकारण दिसू लागले.

 

सर्व पक्ष सरकारच्या मागे उभे राहिल्याचे चित्र जगाला दिसण्याऐवजी या काळात विरोधकांनी आपली वेगळी चूल मांडली. राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला. सदैव देशहिताचा, देशाच्या सार्वभौमत्वाचा विचार करणारी, देशापुढे सर्व गोष्टी गौण असल्याचा संस्कार झालेली आणि सध्या सत्तेवर असलेली नेतेमंडळी निवडणुकांवर डोळा ठेवून एखादी कृती करतील, यावर देशातील कोणीही सूज्ञ व्यक्ती विश्वास ठेवेल का? राष्ट्रीय संकटाच्या काळी आम्ही सरकारच्या मागे ठामपणे उभे असल्याचे, आज सत्तेवर असलेल्या पक्षाने यापूर्वी दाखवून दिले आहे. केलेल्या कृतीचे पुरावे द्या, अशी मागणी कधी करण्यात आली नाही किंवा सरकारच्या कृतीचे समर्थन केल्यास निवडणुकांमध्ये त्याचा फटका बसू शकतो, असा क्षुद्र विचार करून त्यांनी कधी राजकारण केले नाही. पण, आज काय दिसते? केंद्र सरकारने केलेल्या प्रत्येक कृतीकडे राजकीय स्वार्थी चष्म्यातून पाहिले जात आहेपुलवामा घटनेचा बदला घेण्यासाठी जी कारवाई करण्यात आली, त्याचे विरोधकांनी एकमुखाने स्वागत करायला हवे होते. पण, तसे दिसले नाही. भारतीय हवाई दलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले, पण राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे हे शक्य झाले त्याबद्दल त्या नेतृत्वाचे गुणगान करणे दूरच, एक चकार शब्दही काढायला ही मंडळी तयार नाहीत. देशातील २१ विरोधी पक्षांनी बैठक घेऊन, सरकारच्या मागे आम्ही ठामपणे उभे असल्याचे सांगायला हवे होते. पण दिसले काय? तर सरकार या घटनांचे राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांनी जे आरोप केले, त्यामुळे पाकिस्तानच्या हाती भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी आयते कोलीतच मिळाले. पाकिस्तानने भारताची बदनामी करण्याची संधी सोडली नाही. सध्या सत्तेवर असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या डोळ्यांत सलत आहेत. भाजप सरकारने जी विविध पावले उचलली, जे उपक्रम राबविले आहेत, त्यामुळे जनता पुन्हा भाजपच्या मागे उभी राहील, अशी भीती विरोधकांना वाटत आहे. त्यात यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याने देशाचे नेतृत्व कसोटीवर उतरले आहे. देश योग्य पक्षाच्या हाती सुरक्षित आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. जनतेच्या मनात आपली जी खुजी प्रतिमा निर्माण झाली आहे, त्यात सुधारणा होण्याची शक्यताही दिसत नसल्याने सरकारच्या कृतीबद्दल शंका-कुशंका निर्माण केल्या जात आहेत.

 

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आदी अनेक विरोधी नेते सरकारच्या कृतीवर नाहक टीका करताना दिसत आहेत. त्या नेत्यांच्या मांदियाळीत मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचीही भर पडली आहे. काँग्रेसच्या या नेत्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे देण्याची मागणी केली आहे. आपण जी मागणी करीत आहोत त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार त्यांच्याकडून केला जात नाही का? अशा वक्तव्याने आपण आपल्या लष्करावर अविश्वास दाखवित आहोत, याचे भान दिग्गीराजाला नसावे? अमेरिकेने लादेनला मारल्याचा पुरावा जसा जगापुढे ठेवला, तसा पुरावा भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांबाबत देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सशस्त्र दलांच्या सन्मानासाठी हे पुरावे देण्यात यावेत, अशा गोंडस वक्तव्याखाली त्यांनी ही मागणी केली आहे. दिग्विजय सिंह हवाई दलाच्या कामगिरीबद्दल शंका उपस्थित करीत आहेत आणि पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशा शब्दांत या दिग्गीराजास मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी फटकारले आहे. दिग्गीराजाप्रमाणे ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसने पुलवामा घटनेबद्दल टीकेचा जो सूर लावला, त्याला प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनीच परस्पर उत्तर दिले आहे. सापाला फार काळ दूध पाजून चालत नाही, अशा शब्दांत हवाई हल्ल्यांवर आक्षेप घेणार्‍यांना त्यांनी ठणकावले आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणतात, “मोदी यांनी विश्वासार्हता गमावली आहे.” किती हास्यास्पद आहे हे विधान! सर्व विरोधकांनी आपली विश्वासार्हता गमावली असल्यानेच देशाने भाजप सरकारला डोक्यावर घेतले आहे. ते लक्षात घेऊन तरी देवेगौडा यांनी असे विधान करायचे! अलीकडील या घडामोडी पाहता, विरोधकांना फक्त आणि फक्त निवडणुकांची चिंता असल्याचे आणि त्यासाठी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतल्याचे दिसून येते. अशा ढोंगी, स्वार्थी नेत्यांचे आणि पक्षांचे बुरखे फाडायलाच हवेत!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@