कर्मचाऱ्यांचे वेतन, बदल्या, बढत्या... सगळाच सावळागोंधळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2019
Total Views |



१२० वर्षे जुन्या असलेल्या व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला सध्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, नियमबाह्य कारभार आदींचे रोज नव्याने गंभीर आरोप होत आहेत. एवढ्या मोठ्या आणि जुन्या संस्थेची ही दुरवस्था का झाली, यामागील नेमके गौडबंगाल काय, याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेला हा मागोवा...


मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कारभाराची चिकित्सा केली असता या साहित्य मंदिरात काहीच आलबेल नसून सगळाच सावळागोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढी मोठी संस्था ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर उभी आहे, त्या कर्मचाऱ्यांचे जगणे आर्थिक कुचंबणेमुळे असह्य झाले आहे. त्याचबरोबर बदली, बढत्यांमध्येही प्रचंड घोळ असून त्यामुळे कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. ग्रंथालयासमोर उपोषणाला बसून कर्मचारी आपले प्रश्न सोडवून घेत आहेत. कर्मचाऱ्यांना आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी अशा पातळीवर यावे लागणे हे कोणत्याही संस्थेसाठी चांगले लक्षण नव्हे, एवढे नक्की. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या २९ शाखा आणि सहा विभागांमध्ये एकूण ११० कर्मचारी असून त्यापैकी केवळ ३५ कर्मचारी कायमस्वरूपी तत्त्वावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ठोक वेतन, वेतनश्रेणी, कायम कर्मचारी असे प्रमुख तीन प्रकार आहेत.

 

ठोक वेतनामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. यामध्ये रजा नसून एक दिवस जरी रजा घेतली तरी सेवा खंडित केली जाते. सलग एक वर्ष सेवा झाल्यास त्या कर्मचाऱ्याला वेतनश्रेणीत घेतले जाते. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीत न घेण्यासाठीच हा ठोक सेवेचा अमानवी प्रकार राबवला जातो. या प्रकारामध्ये बहुसंख्येने महिला कर्मचारी आहेत. पुढील वेतनश्रेणी या प्रकारात रजा मिळते, इन्क्रिमेंट मिळते पण कर्मचारी कधीही कायम केला जात नाही. मुळात एवढ्या मोठ्या संस्थेत कर्मचारी कायम करण्याची कोणतीही ठोस तरतूदच नाही. सर्व कर्मचाऱ्यांना साधारण सहा हजार, तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना आठ ते दहा हजार एवढे वेतन दिले जाते. सध्या भारतात किमान वेतन दिवसाला ३७५ रुपये दिले जावे व महिन्याला किमान चार दिवस साप्ताहिक रजा गृहीत धरून महिन्याला साधारण ९ हजार, ७५० रुपये वेतन देण्यात यावे, असे किमान वेतनाबाबतच्या गिरी समितीकडून ठरविण्यात आले आहे. असे असताना मुंबईसारख्या देशातील आघाडीच्या महानगरातील राज्यभाषेच्या एवढ्या अग्रगण्य संस्थेत कर्मचाऱ्यांची थेट आर्थिक पिळवणूक सुरू आहे.

 

एवढे आर्थिक शोषण होत असताना संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने मी माझ्याकाळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२५० रुपयांची वाढ केली होती, असे सांगितले. मात्र, त्याचवेळी माझे नाव छापू नका, असेदेखील विनवले. यावेळी संस्थेचे विश्वस्त व सेवक समितीचे अध्यक्ष अरविंद तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला. संस्थाचालकांनी संस्था कशी चालवू नये, याचा धडाच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कारभाऱ्यांनी समोर ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ कारभार असलेल्या या संस्थेत किमान कर्मचाऱ्यांच्या तुटपुंज्या वेतनाची तरी अध्यक्ष शरद पवारांनी, विश्वस्त सुप्रिया सुळे व संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, ही साहित्यप्रेमी मुंबईकरांची वेडी आशा आहे.

 

"कर्मचाऱ्यांच्या बढत्या करताना समान सूत्रे पाळली जात नाहीत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची पात्रता न बघता कोणालाही कुठलीही नियुक्ती दिली जाते. एवढ्या मोठ्या ग्रंथालयाच्या ‘संदर्भ’सारख्या महत्त्वाच्या विभागात आजही प्रमुख ग्रंथपालाची नेमणूकच केली गेली नसून, त्याठिकाणी तीन शाखा ग्रंथपाल कार्यरत आहेत. तसेच रद्दी प्रकरणासारख्या विषयात काही लोकांची नावे असून तो विषय न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही त्याच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे चमत्कारही या संस्थेत घडले आहेत. लेखनिकाला थेट हिशेबनीस करण्याचे अजब प्रकार संस्थाचालकांनी बिनबोभाटपणे केले आहेत."

 

सुचिता मोरे, सेवक प्रतिनिधी

माजी कर्मचारी

 
 

"मी या संस्थेत ३६ वर्षे सेवा केली. या कालावधीत माझ्या किमान २० वेळा बदल्या झाल्या. माझ्या कारकिर्दीच्या शेवटी मला शारीरिक व्याधी असताना माझी बदली केली गेली. निवृत्तीला एक वर्ष शिल्लक असताना व मला काळा चौकीच्या शाखेत जाणे शक्य नसताना माझी बदली केली. ‘संदर्भ’ विभागातून दुर्मीळ पुस्तके बाहेर नेण्यास मी नकार दिल्यानेच माझी बदली केली गेली. त्याचबरोबर माझे निवृत्तीच्या आधीचे सात महिन्यांचे वेतनही थकविण्यात आले असून हे माझे वेतन मिळावे म्हणून मी संस्थाचालकांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे."

 

राजश्री नाईक , सेवानिवृत्त ग्रंथपाल, संदर्भ विभाग

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@