राहुल गांधींना पाडणारच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2019
Total Views |



तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड फळीचा धसका घेतलेल्या राहुल गांधी यांनी आताच्या लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची घोषणा केली. राहुल गांधी आता उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. मात्र, राहुल गांधींनी ही घोषणा करताच डाव्या पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “राहुल गांधी भाजपला नव्हे तर कम्युनिस्ट पक्षाला पराभूत करण्यासाठीच वायनाडच्या रिंगणात उतरले, त्यांची लढाई थेट आमच्याशीच आहे, त्यामुळे आम्ही त्यांना पराभूत करू,” अशा शब्दांत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी इशारा दिला आहे. विजयन यांच्या या इशाऱ्यामुळे काँग्रेसची रणनीती चांगलीच गोत्यात येत असल्याचे दिसत असून कम्युनिस्ट पक्ष राहुल गांधींना पाडूनच दाखवतील, असे चित्र पाहायला मिळते.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांनी राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. अँटोनी यांच्या घोषणेनंतर डाव्यांनी लगोलग काँग्रेसविरोधी भूमिका घेत तीव्र प्रतिक्रिया दिल्या. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे काँग्रेस वरवर दाखवते पण केरळमध्ये राहुल गांधी यांनी स्वत:ची उमेदवारी देऊन त्यांचा खरा चेहरा उघड केला असल्याचे पिनराई विजयन यांनी म्हटले. “काँग्रेस केरळमध्ये २० पैकी केवळ एकाच जागेवर निवडणूक लढत आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्ही त्यांच्याशी लढू. जिथे भाजपचा उमेदवार मैदानात असेल, अशा मतदारसंघातून त्यांनी लढायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही. यावरून त्यांची थेट लढाई डाव्यांविरोधात असल्याचे स्पष्ट होते,” असेही त्यांनी सांगितले.

 

दुसरीकडे वरिष्ठ नेते प्रकाश करात यांनीही राहुल गांधींच्या उमेदवारीवरून विरोधाचा सूर आळवला आहे. ते म्हणाले की, “राहुल गांधी वायनाडमधून उभे आहेत. याचाच अर्थ डाव्यांच्या विरोधात लढणे, हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे भाजपला हरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हणायचे आणि प्रत्यक्षात वायनाडमधून उमेदवारीही घोषित केली जाते, हे चुकीचे आहे. केरळमध्ये काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. त्यांच्या या निर्णयाचा आम्ही जोरदार विरोध करू आणि त्यांना पराभूत करू,” असेही करात यांनी स्पष्ट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@