शिक्षण आणि नोकरीतील ‘पुलकरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2019
Total Views |


 


कौशल्यावर आधारित शिक्षण नसेल, तर पदवी असूनही चांगली नोकरी मिळत नाही. पण प्रशिक्षण देऊन शिक्षण आणि नोकरीमधील प्रगतीचा पूल नारायण महादेवन यांनी बांधला आहे.


चांगले उत्पन्न, सुरक्षित नोकरी आणि सुखी जीवन हीच बहुतेकांच्या आयुष्याच्या आनंदाची सध्याची व्याख्या. त्याची सुरुवातही अगदी शालेय जीवनातून होताना दिसते. आधी दहावी, मग बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी खटपट. त्यानंतर मनजोगे महाविद्यालय आणि आपल्याला हवा असणारा अभ्यासक्रम मिळवण्यासाठी एकच धडपड. पण, बरेचदा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर योग्य कौशल्य नसल्यामुळे अभियांत्रिकीसारखी पदवी मिळवूनही मनासारखी नोकरी लाखो तरुणांना मिळत नाही किंवा मिळाली तरी योग्य वेतन मिळत नाही. राष्ट्रीय रोजगार संस्थेच्या एका आकडेवारीवर नजर टाकली असता, शिक्षित बेरोजगारांची संख्या किती मोठी असू शकते, याची कल्पना येईल. या सरकारी संस्थेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी साधारण १५ लाख अभियांत्रिकीचे विद्यार्थी भारताच्या विविध महाविद्यालयातून उत्तीर्ण होतात, पण त्यापैकी केवळ ४ टक्के म्हणजे साठ हजार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे इतर लाखो विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांना मुरड घालून वेगळ्याच क्षेत्राची वाट धरावी लागते किंवा योग्य संधीची वाट बघत ते बेरोजगार राहतात. ही समस्या सोडवण्यासाठी आजघडीला शिक्षणासोबतच प्रात्यक्षिक सरावाची गरज आहे. ही गरज ओळखून उद्योजक नारायण महादेवन यांनी ‘ब्रिजलॅब्स’ ही स्थापन केली. ही संस्था अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत तांत्रिक समस्या सोडविण्याचे प्रशिक्षण देते आणि नोकरीची हमीही.

 

‘ब्रिजलॅब्स’ ही संस्था रोजगारक्षमतेमध्ये वाढ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करते. नारायण स्वत: कंपनीतील संपूर्ण ऑपरेशन्स व फंक्शन्सची देखरेख करतात. एखाद्या कंपनीला जर मनुष्यबळाची आवश्यकता असेल, तर ती कंपनी ‘ब्रिजलॅब्स’शी संपर्क साधते. विशेष म्हणजे, ‘ब्रिजलॅब्स’चे हे कार्य केवळ शहरातच चालते असे नाही, तर ग्रामीण भागातील तसेच गरीब कुटुंबातून आलेल्या मुलांनादेखील या संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. पण, ग्रामीण भागातून आलेल्या मुलांसमोर प्रश्न उभा राहतो तो राहण्याचा आणि खाण्याचा. त्यामुळे नारायण यांची कंपनी या मुलांना आर्थिक मदत व्हावी, म्हणून ‘स्टायपेंड’ देते. नारायण यांनी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून बी.ई. पूर्ण केले आहे. ‘कान्स स्टेट युनिव्हर्सिटी’कडून मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग’मध्ये पदवी प्राप्त केली. तेथे, ‘ग्रॅज्युएट रिसर्च असिस्टंट’ म्हणून त्यांनी काम केले. मुंबईतील ह्युरिक्स सिस्टीम्स येथेही ते कार्यरत होते. ‘मौज’ मोबाईल कंपनीतही काही काळ त्यांनी काम पाहिले. नारायण यांनी ‘ईएफआय’चे संचालक म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे नारायण यांचा विविध ठिकाणी काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. पण, नोकरीत त्यांची प्रगती होत असली तरी, सगळे सकारात्मक असले तरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी ‘झेस्टा टेक्नॉलॉजी ग्रुप’ची स्थापना केली, जिथे त्यांनी ‘चीफ टेक्लोलॉजी ऑफिसर’ अर्थात ‘सीटीओ’ म्हणून काम केले. येथे त्यांनी प्रिंट खरेदीदार आणि पुरवठादारांना लाभ देण्यासाठी ‘पी ३’ (प्रिंट, प्रमोशन आणि वैयक्तिकरण) ‘बी टू बी एसएएएस’ ही सेवा विकसित केली. २०१६ मध्ये ‘ब्रिजलॅब्स’च्या स्थापनेबरोबरच, उदयोन्मुख तंत्रज्ञानातील रोजगार आणि कौशल्य यामधील अंतर कमी करण्यासाठी नारायण यांनी ही संस्था सुरू केली.

 

परंतु, कोणतीही संस्था सुरू केल्यानंतर कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागतेच. त्याचप्रमाणे नारायण यांनाही काही अडचणींचा सामना करावाच लागला. त्यांची कंपनी नवीन असल्यामुळे, ज्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी जागा आहे, त्या कंपन्या सुरुवातीला ‘ब्रिजलॅब्स’वर विश्वास ठेवण्यास तयार नव्हत्या. तसेच नवीन मुलांना शिकवण्यासाठी काही अडचणी आल्या. पण, नारायण यांनी या सर्व अडचणींवर खुबीने मात केली. गरीब व मध्यमवर्गीय मुलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. ज्या मुलांना पदवीनंतर अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळत होते, त्यांना आज चार तर साडेचार लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळत आहे. मागील तीन वर्षांमध्ये जवळपास ५०० मुलांना त्यांनी कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. “पुढील पाच वर्षांत ‘ब्रिजलॅब्स’ हा ‘रोजगारासाठी समानार्थी शब्द असेल,”असा विश्वास नारायण यांनी व्यक्त करतात. २०२५ पर्यंत ‘ब्रिजलॅब्स’मुळे भारतातील एक दशलक्षांहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळतील, असा त्यांचा मानस आहे. ‘ब्रिजलॅब्स’च्या या कौशल्य प्रशिक्षण आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकरी प्रदान करणाऱ्या कामाचीही महाराष्ट्र सरकारनेही उचित दखल घेतली असून राज्यातील १०० स्टार्ट-अपमध्ये आज ‘ब्रिजलॅब्स’चाही समावेश होतो. असे हे नारायण कुठलीही समस्या सोडवण्यात कुशल आहेतच, पण ते तितकेच मायाळूदेखील आहेत. ‘ब्रिजलॅब्स’च्या बाहेर, नारायण यांचे आयुष्य त्यांच्या कुटुंबीयांभोवतीच फिरते. ते मुंबईत त्यांच्या आईवडील, पत्नी आणि दोन मुलांसह एक आनंदी जीवन जगतात. त्यांना बुद्धिबळ, क्रिकेट आणि बॅडमिंटनही खेळायला आवडते. शिवाय, ते रोज सकाळी उठून योग आणि व्यायामही करतात. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  

- नितीन जगताप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@