'आरे' मधून कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |


 


मुंबई (अक्षय मांडवकर) : गोरेगावच्या आरे वसाहतीमधून 'जम्पिंग स्पायडर' जातीमधील 'जेर्झिगो' या पोटजातील नव्या कोळ्याच्या प्रजातीचा शोध लागला आहे. राज्याच्या वन विभागाचे राज्याच्या वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पूर्व) सुनिल लिमये यांच्या नावे या नव्या प्रजातीचे नामकरण 'जेर्झिगो सुनिल लिमये' असे करण्यात आले आहे. या नव्या प्रजातीचा उलगडा झाल्याने आरे वसाहत ही जैवविविधतेसाठी समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

 

 
 

'जम्पिंग स्पायडर' ही कोळ्यांची जात शरीरावरील डोळ्यांच्या विशिष्ट रचना आणि सतत उडी मारण्याच्या गुणधर्मामुळे ओळखली जाते. मुंबईतील मरोळ येथे वास्तव्यास असलेले छायाचित्रकार आणि जीवशास्र्ज्ञ राजेश सानप काही वर्षांपासून आरेमधील कोळ्यांच्या प्रजातींच्या जैवविविधतेवर अभ्यास करत आहेत. शिवाय त्यांच्या छायाचित्रणांचे संग्रहणही करत आहेत. 'जेर्झिगो सुनिल लिमये' ही नवीन प्रजाती सानप यांना सर्वप्रथम २०१६ साली आरेमध्ये आढळून आली होती. या प्रजातीचे मूळ 'जम्पिंग स्पायडर'च्या 'जेर्झिगो' या पोटजातीतील आहे. बॅर्निओ आणि सुमात्रा या देशात 'जेर्झिगो' पोटजातीतील दोन कोळी असून दक्षिण भारतात त्यामधील तिसऱ्या कोळ्याची प्रजात आढळते. त्यामुळे आरे वसाहतीमधून नव्याने सापडलेली 'जेर्झिगो सुनिल लिमये' ही प्रजात 'जेर्झिगो' पोटजातीतील चौथी प्रजात असल्याची माहिती राजेश सानप यांनी दिली.


 
 

आरे वसाहतीत २०१६ मध्ये या प्रजातीमधील मादी आढळ्यानंतर अधिक सर्वेक्षणअंती दोन नर सानप यांना सापडले. त्यांच्या छायाचित्रणांच्या आधारे 'जेर्झिगो' पोटजातीतील इतर तीन प्रजातींशी त्यांचे बाह्यांग परीक्षण केल्यानंतर आरेमधील प्रजात नवीन असल्याची माहिती मिळाल्याचे सानप यांनी सांगितले. दुसऱ्या टप्यातील अभ्यासात गुणसूत्रांच्या आधारे या नव्या प्रजातीची चाचपणी केली जाणार आहे. सानप यांच्याबरोबर या संशोधन कार्यात जीवशास्त्रज्ञ अनुराधा जोगळेकर आणि 'झूलाॅजिकल सर्वे आॅफ इंडिया'चे जाॅन कालेब यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यापूर्वी सानप यांनी आरे वसाहतीतून कोळ्यांच्या तीन प्रजातींचा नव्याने आणि सहा प्रजातींचा पुनर्शोध लावला आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@