यात काय ‘अर्थ’ आहे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |


 

 

१२० वर्षे जुन्या असलेल्या व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला सध्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, नियमबाह्य कारभार आदींचे रोज नव्याने गंभीर आरोप होत आहेत. एवढ्या मोठ्या आणि जुन्या संस्थेची ही दुरवस्था का झाली, यामागील नेमके गौडबंगाल काय, याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेला हा मागोवा...

 

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ठिकठिकाणच्या मालमत्ता पाहिल्या, त्यातही नायगाव, दादर (पूर्व) भागातील संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाची वास्तू पाहिली की, संस्थेच्या या ‘सर्वांगीण’ दुरवस्थेमागे काही वेगळाच ‘अर्थ’ आहे की काय, असा संशय व्यक्त होतो. गेले अनेक दिवस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील गैरकारभार, अनागोंदी व भ्रष्टाचाराच्या आरोपांवर व त्यामुळे संस्थेच्या होणाऱ्या हानीवर उजेड टाकण्यात येत आहे. तथापि, या सर्व घटना काही पदाधिकाऱ्यांच्या चुकांमुळे वा किरकोळ तांत्रिक त्रुटींमुळे घडत आहेत की मुंबईतील जमिनींचे भाव लक्षात घेता भविष्यातील ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे डोळ्यासमोर ठेऊन जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत, अशी गंभीर शंका ग्रंथालय बचाव कृती समितीचे आंदोलक व्यक्त करतातसंस्थेच्या शाखांपैकी दोन-चार शाखांचे अपवाद वगळता प्रत्येक शाखेतील कोणत्या ना कोणत्या आर्थिक व्यवहारावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनीही ही प्रकरणे न्यायालयीन पातळीवर नेऊन त्यांना वाचा फोडण्याचे काम नेटाने चालवले आहे. या लढ्याला हळूहळू यशही मिळताना दिसत आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा गैरकारभार मुळापासून खणून काढण्यात मोलाचा वाटा असणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर हेगिष्टे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने संस्थेचे विद्यमान प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी आणि माजी प्रमुख कार्यवाह कृष्णकांत शिंदे यांना समन्सदेखील बजावले आहे. संस्थेच्या डॉ. भडकमकर मार्ग विभाग शाखेच्या दोन खोल्यांच्या (टोपीवाला लेन, ग्रँट रोड) विक्रीचा व्यवहार संस्थेत योग्य तो ठराव न करता तसेच धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता केल्याचा गंभीर आरोप असून याप्रकरणी हेगिष्टे यांनी लॅमिंग्टन रोड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर ‘मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट’तर्फे ८ मार्च रोजी मोकाशी आणि शिंदे यांना भादंवि-कलम ४२० अंतर्गत समन्स बजावण्यात आले. ही घटना म्हणजे बचाव समितीच्या लढ्याचे यश असल्याची भावना हेगिष्टे व अन्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 

याचप्रकारचे आरोप संस्थेच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांशी संबंधित व्यवहारांवर झाले आहेत व यातील असंख्य प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. डॉ. भडकमकर मार्ग प्रकरणासह दादर (प.) येथील रानडे मार्ग येथील शाखा व जागा, पुणे येथील ‘दाते सूची मंडळा’ची जागा, शारदा चित्रपटगृह प्रकरण, शारदा मंगल कार्यालय प्रकरण अशी अनेक ‘प्रकरणां’ची जंत्रीच बचाव समितीचे कार्यकर्ते आपल्यासमोर मांडतात. या सर्व गोष्टी उघडकीस आणण्याचे किंवा त्याबद्दल संस्था पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे परिणामही बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना भोगावे लागले आहेत. संस्थेचा गैरकारभार खणून काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आणखी एक शिलेदार नितीन मोहिते हे संस्थेचे साधारण सभासद होते. त्यांचे सभासदत्वच संस्थेने रद्द केले. मोहिते यांनी संस्थेच्या एप्रिल-मे, २०१६ च्या निवडणुकीविरुद्ध सार्वजनिक न्यासाकडे तक्रार दाखल केली. यानंतर संस्थेने त्यांचे सभासदत्व रद्द केले तसेच भोईवाडा न्यायालय क्र. २९ येथे मोहितेंवर अब्रूनुकसानीचा दावाही दाखल करण्यात आल्याचे समजते. सुट्टीच्या दिवशी रात्री संस्थेच्या प्रमुख कार्यवाहांनी लिपिकाच्या मदतीने रद्दीच्या नावाखाली संस्थेचे महत्त्वाचे दस्तवेज नष्ट केले असा गंभीर आरोप नितीन मोहिते यांनी केला आहे. तसेच, याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कुंपणच शेत खातंय?

 

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या खजिन्यात मे, २०१६ रोजी पाच कोटींचा निधी शिल्लक होता. जानेवारी, २०१९ मध्ये यापैकी केवळ दीड कोटींचाच निधी शिल्लक असल्याची बाब ग्रंथालय बचाव कृती समितीने पत्रक जारी करून उघड केली. यातील बहुतांश निधी हा रिपेअरिंगसारख्या कामांवर खर्च केल्याचा तसेच त्यासाठी योग्य त्या प्रक्रियेद्वारे निविदा न काढल्याचाही आरोप समितीने केला आहे. तसेच, प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शारदा चित्रपटगृह हे जाणीवपूर्वक ‘भंगार अवस्थे’त आणण्यासाठी प्रयत्न केल्याचा, यापायी संस्थेचा ३० लाखांहून अधिक महसूल बुडवल्याचा, इमारतीची तटबंदी मजबूत असताना त्यावर हातोडा मारून तब्बल एक कोटींचा निधी अनावश्यकरीत्या खर्च केल्याचा खळबळजनक आरोप बचाव कृती समितीने या व अशा अनेक पत्रकांत केला आहे. त्यामुळे इतक्या जुन्या व वैभवशाली संस्थेची ही दुरवस्था होण्याचे कारण ‘कुंपणच शेत खात आहे’ अशी भावना संस्थेच्या हितचिंतकांकडून व्यक्त होत आहे.

 

खरा ‘वाद’ वेगळाच?

 

नायगाव, दादर येथील मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना १९५९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते झाली. दादर येथील अत्यंत मोक्याच्या भागात सुमारे अडीच एकर जागेवर ही इमारत आहे. ५० वर्षांहून अधिक जुनी इमारत असल्याने तिला एफएसआयही जास्त आहे. त्यामुळे हा एफएसआय अनेक व्यावसायिकांना व त्यांच्यामागील राजकारण्यांना आकर्षित करतो. त्यामुळे खरा वाद हा काहीतरी ‘वेगळा’च असल्याचीही कुजबुज जोरात आहे.

 
 

संस्थेची प्रतिमा अशाप्रकारे केवळ मलीनच नाही, तर अक्षरश: रसातळाला जात आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या विशेष प्रतिनिधीने संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या तसेच संस्थेच्या विद्यमान विश्वस्त सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक दिवस प्रयत्न केला. स्वत: सुप्रिया सुळे यांना तसेच त्यांच्या स्वीय साहाय्यकांना आठवडाभर असंख्य वेळा कॉल्स करूनही तसेच, एसएमएस करूनही सुप्रिया सुळे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@