कल्पना हेच भविष्याचे चलन : डॉ. सुरेश हावरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |


 


“कल्पना हेच भविष्याचे चलन आहे. म्हणूनच, कल्पनेला 'कॅच' करता आलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात विविध कल्पना येतात आणि जातात. पण, त्या आपण 'कॅच' करत नाही. म्हणून आधी कल्पना पकडता आली पाहिजे,” असे बहुमूल्य विचार डॉ. सुरेश हावरे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'च्या नुकत्याच संपन्न झालेल्या 'मुक्त संवाद' कार्यक्रमातील मुलाखती दरम्यान बोलताना व्यक्त केले. तसेच, यशस्वी अणुशास्त्रज्ञ, बांधकाम व्यावसायिक आणि शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असा त्यांचा 'अॅडव्हेंचर'पूर्ण जीवनपटही त्यांनी उलगडला. त्याचबरोबर राजकारणापासून ते गिर्यारोहणापर्यंत बरेच रंजक अनुभवही यावेळी डॉ. सुरेश हावरे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'च्या टीमच्या प्रश्नांची उत्तरे देताना आवर्जून सांगितले. याच मुलाखतीचा संपादित अंश खास वाचकांसाठी देत आहोत.


तुम्ही बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित आहातच. पण, तुमची पार्श्वभूमी अणुशास्त्रज्ञाची आहे. तसेच तुम्ही गिर्यारोहणही केले आहे. इतकं सगळं तुम्ही कसं काय करू शकता?

 

खरं सांगायचं तर, मी केवळ रस्ता चालत गेलो व एक एक मंजिल मिळत गेली. कुठलाही मार्ग सोपा नव्हता व तो माहितीही नव्हता. पण, आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा सगळा पट उलगडत जातो. मी एका छोट्या गावातून आलो आहे. जेमतेम १० हजार लोकवस्तीचे गाव. जिल्हा परिषदेच्या शाळेत, मराठी माध्यमातून माझे शिक्षण झाले. घरी शेतीवाडी. शेतात काम केलं, गुरं-ढोरं सांभाळली. तिथूनच माझा प्रवास सुरू झाला. मी जिथे जिथे गेलो, तेथील मला काहीच माहीत नव्हते. म्हणजे अंधारात चालत जावे, अशा प्रकारचा तो एक प्रवास होता. मी जेव्हा गिर्यारोहणाला गेलो, तेव्हा लक्षात आले 'अॅडव्हेंचर' म्हणजे काय? तर 'अॅडव्हेंचर' म्हणजे 'going from known to unknown'. म्हणूनच, मला माझा जीवनप्रवास हा प्रत्येक टप्प्यावर एका 'अॅडव्हेंचर' सारखाच दिसतो. निवडणूक लढवेपर्यंत निवडणुकीतील 'ए..बी..सी..डी'सुद्धा मला माहिती नव्हतं. पण माझा स्वभाव असा आहे की, आव्हाने स्वीकारत राहिली पाहिजे. कारण, ' Without risk, there is no reward.' तुम्ही जेव्हा आव्हान स्वीकारता, तेव्हा ते आव्हान तुमच्या क्षमतांनाही आव्हान देत असतं. त्यामुळे जेवढे मोठे आव्हान, तेवढीच तुमची क्षमता अधिक विकसित होत जाते. आपल्याला आपली क्षमता किती आहे, हे माहिती नसतं. पण, ती क्षमता आपोआप विकसित होत जाते व त्या आव्हानांचा पाडाव करते. म्हणूनच मी अशी आव्हाने आनंदाने स्वीकारत गेलो.

 

तुम्हाला विज्ञान क्षेत्रात करिअर करायचं होतं. नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे केमिकल इंजिनिअरिंगमधील तुम्ही सुवर्णपदक विजेते आहात. असं असताना आपण बांधकाम क्षेत्रात आलात, त्यावेळी तुमच्या मनात नेमकं काय होतं?

 

इथे मी महाविद्यालयात असतानाची दोन उदाहरणे सांगू इच्छितो. एकदा आमची चाचणी परीक्षा चालू होती. त्यावेळी एक मुलगा माझी उत्तरपत्रिका बघून कॉपी करत होता आणि हे शिक्षकांनी नेमकं पाहिलं. त्यांना वाटलं, आम्ही दोघेही कॉपी करतोय. मग काय, त्यांनी आम्हा दोघांनाही पकडलं. दोघांचेही पेपर जप्त केले. तुम्हाला शून्य गुण मिळाल्याचे सांगून आम्हाला वर्गाबाहेर काढले. आम्ही दोघांनीही पेपर जमा केले व वर्गाबाहेर गेलो. नंतर पाच-सहा दिवसांनी पेपर तपासून मिळालेले गुण वर्गात सर्वांसमोर सांगितले जाई. सरांनी पेपर देताना आनंदाने सांगितले की, “हावरेचा पेपर मी तो कॉपी करतोय असे वाटून हिसकावून घेतला. पण, पेपरमध्ये जो प्रश्न दिलेला होता, त्या प्रश्नाचे उत्तर सगळ्या विद्यार्थ्यांचे चुकले आणि फक्त हावरेचे बरोबर आले. म्हणून मी या निष्कर्षावर पोहोचलो की, त्याने याची कॉपी केलेली नाही.” म्हणून माझे कापलेले गुण मला परत मिळाले. दुसरा प्रसंग आठवतो, तो असा की, आम्हाला इंजिनिअरिंगला शिकत असताना दांडेकर नावाचे प्राचार्य होते. एकदा शिकवताना त्यांनी एक सूत्र फळ्यावर लिहिले. मी त्यांना सांगितले की, सर, हे सूत्र चुकलेले आहे. पण, माझ्या अशा सांगण्याने त्यांचा 'इगो' दुखावला गेला. त्यांनी मला उभे केले. ते म्हणाले की, “तू वर्गाबाहेर जा.” मी वर्गाबाहेर गेलो. पूर्ण तास संपेपर्यंत मला सरांनी बाहेर उभे राहण्यास सांगितले होते. त्यांनी त्या सुत्रानुसार गणित सोडवण्यास सुरुवात केली. पण, मुळातच सुरुवात चुकलेली असल्यामुळे त्यांचे उत्तरही चुकले. मग उत्तर का चुकले, हे शोधताना मूळ चूक तर सूत्रामध्येच झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी मला वर्गाबाहेरून बोलावले व “तू बरोबर होतास,” असे म्हणाले. अशा मोठ्या मनाचे शिक्षक तेव्हा होते. या महाविद्यालयीन काळातील घटना होत्या. पण, मी जेव्हा बीएआरसीमध्ये रुजू झालो, तेव्हा मला संशोधन करायची इच्छा होती. त्यासाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती मला नोकरी करण्यास सांगत होती. कारण, माझ्या मागील भाऊ-बहीण शिकत होते. कोणी कमावते नव्हते. म्हणून मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे पीएच.डीसाठी नोंदणीसाठी गेलो. तिथे माझी निवडही झाली. तिथे केवळ संशोधनाचे काम होते. नंतर मी हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्समध्ये मुलाखत दिली. तिथे पूर्ण वेळ नोकरीच होती. माझी बीएआरसीमध्येही निवड झाली होती आणि तिथे नोकरी व संशोधन दोन्हीही होते. म्हणून मग मी बीएआरसीचा पर्याय निवडला. कारण, मला पैसाही मिळणार होता आणि संशोधनही करता येणार होते. पण, हा प्रवासही एक 'अॅडव्हेंचर' होता.

 

बीएआरसीमध्ये काम करताना तुम्ही काही कोड निर्माण केले होते. ते अजूनही वापरले जातात. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकरांबरोबरही तुम्ही काम केले आहे. तर तो सगळा एकूणच अनुभव कसा होता?

 

आता मागे वळून पाहताना वाटतं की, आपण काय काय करत होतो... ते मजेदार दिवस होते. काकोडकरांचे सान्निध्य व सहवास आनंददायक होता. त्यांची दोन-तीन वैशिष्ट्ये सांगतो. एक म्हणजे, त्यांच्या केबिनबाहेर त्यांनी लिहिले होते- 'Disturb!' एरवी केबिनबाहेर 'परवानगीशिवाय आत येऊ नये,' असे लिहिलेले असते, पण काकोडकारांनी ' Disturb' असे लिहिले होते. म्हणजे त्यांना कोणीही कधीही जाऊन 'डिस्टर्ब' करू शकत होतं. कारण, कल्पना, विचार कधी सुचतील हे सांगता येत नाही. म्हणून कुठलीही कल्पना घेऊन तुम्ही त्यांना कधीही भेटू शकत होता. दुसरी गोष्ट म्हणजे, त्या दिवसाचे काम पूर्ण केल्याशिवाय ते घरी जायचे नाही. तिसरे म्हणजे, काकोडकर हे अगदी ' Handsfree Person.' म्हणजेच, बरेच लोक घरचं काम ऑफिसमध्ये घेऊन येतात, तर ऑफिसचे काम घरी घेऊन जातात आणि मग त्यातील कोणतंच काम नीट करत नाहीत. पण, काकोडकरांनी असं कधीही केलं नाही. ते नेहमी रिक्तहस्त असायचे. ते स्वत:जवळ फक्त एक डायरी ठेवायचे. असं एकूणचं सगळं आनंददायी वातावरण होतं. बीएआरसीमध्ये मी जो कोड निर्माण केला होता, तो ' Reactor Licensing Code' होता. म्हणजे ' Nuclear reactor'मध्ये सगळ्यात मोठा अपघात झाला, तर जे काही आतमध्ये झाले, ते आतल्या आतच नियंत्रित करता आले पाहिजे. त्याची क्षमता अशी हवी की, रिअॅक्टरच्या अपघातातून कुठलाही घातक घटक लोकांपर्यंत जाता कामा नये. जसे घरातल्या गोष्टी घरात ठेवतो, तसेच हे. त्यासाठी मग कोड डिझाईन केले. मग तो कोड काय करतो, तर ते एक सॉफ्टवेअर आहे. प्रत्येक अपघात तो करून पाहतो आणि करून पाहिल्यानंतर जे परिणाम येतात, ते तो त्या वातावरणात टाकतो. मग ते रिअॅक्टर सहन करू शकते अथवा नाही, त्याचे Temperature, Pressures, Aerosols, Chemicals काय काय निघतात, या सगळ्याचा तो अभ्यास करतो आणि Timewise from ० to till end. प्रत्येक पॅरामीटरची नोंद करून त्याचे ग्राफिकल प्रेझेंटेशन सगळे तो समोर आणतो आणि जेव्हा नवीन reactor सुरू करायचे असते, तेव्हा ते आपल्याला माहीत नसते. त्याच्यासाठी हा कोड वापरला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे reactor असतात. PWDR, PHWR अशी नामांकने आहेत. त्यात अपघात झाले तर सिस्टीममधील वातावरण किंवा त्याच्या प्रतिक्रिया कशा असतील, याचे विश्लेषण करायला लागते आणि ते जर सुरक्षित असेल, समाजाला त्याच्यापासून धोका नसेल, तर reactor operation'ची परवानगी दिली जाते. असा हा ' Licensing Code' आहे आणि अजूनही तो वापरला जातो. बीएआरसीमध्ये जुने सहकारी भेटतात. ते म्हणतात, तुम्ही जो कोड निर्माण केला, तो आमच्यासाठी 'ब्रेड आणि बटर' झाला आहे. आमचं सगळं काम त्याच्या आधारेच चालतं.

 

म्हणजे, तुम्ही बांधकाम क्षेत्रात गेल्यामुळे भारतीय अणुक्षेत्र एका वैज्ञानिकाला मुकलं, असं म्हणता येईल तर?

 

नाही, असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण, ' Nobody is indispensable in this world.' कोणामुळेही जग थांबत नाही. मला जर असं वाटायला लागलं की, मी इथे आहे. आता कसं होईल, तर तसं काही होत नाही. मग जे चालायचं आहे, ते चालत राहतं. त्याचा स्वतःचा एक क्षण असतो. तात्पुरत्या गोष्टी होत राहतात. एका ठिकाणी काही कमी झाले, तर दुसऱ्या ठिकाणी त्याची भर पडते. जिथे जिथे जावं, तिथे काम करत राहावं आणि तुमचा ज्या कामात सहभाग आहे, त्या कामाची स्वत:ची अशी ओळख झाली पाहिजे; अन्यथा वेळ घालवण्याचं काम प्रत्येक जणच करतो. पण, त्या वेळेचा आपण सदुपयोग केला की नाही, त्याच्यातून काही निर्मिती केली की नाही, हे आपण स्वतःला विचारत राहिलं पाहिजे. आपल्या निर्मितींचे, कृतींचे मोजमाप आपणच करत राहिले पाहिजे. म्हणजे दिवसाच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी मोजले पाहिजे की, या वर्षाची माझी निर्मिती काय आहे? What did I do?

 

'हावरे समूहा'च्या 'नॅनो हौसिंग' प्रकल्पाबद्दल खूप चर्चा होत असते आणि त्याचे तुम्ही प्रणेते आहात. तुम्ही त्या विषयावर पीएच.डी केली आहे, पुस्तकही लिहिले आहे. तर ही 'नॅनो हौसिंग' संकल्पना व त्याची गरज याबद्दल काय सांगाल?

 

आधी पीएच.डीबद्दल सांगतो. पीएच.डी ही त्या माणसाची खाज असते. त्याला ती खाजवत असते आणि अशीच खाज मलाही होती. मी बीएआरसी सोडले तेव्हा माझं पीएच.डीचे काम तयार होते. पण, मला ती सोडावी लागली. तेव्हा पीएच.डी करायची राहून गेली. पण, ती खुमखुमी कायम मनात राहिली. कुठेतरी मी संधी शोधत होतो, ती मिळाली व मी घेतली. 'नॅनो हौसिंग' ही एक अभिनव संकल्पना आहे आणि ' blue ocean strategy' यावर ती आधारित आहे. दिसायला ती खूप सोप्पी वाटते. त्यामागे एक धोरण आहे, एक कौशल्य आहे, याला पार्श्वभूमी 'लेहमन ब्रदर्स' या बॅकिंग इन्स्टिट्यूटची. ही इन्स्टिट्यूट अमेरिकेतील सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त वर्षे काम करत होती आणि जेव्हा ती गडगडली, तेव्हा साऱ्या जगाला असे वाटले की, आता मोठ्या प्रमाणात मंदी येणार व ती आलीही; अगदी सगळ्याच व्यवसायामध्ये. या 'लेहमन ब्रदर्स'चा मी इतिहास वाचला तेव्हा माझ्या लक्षात आलं की, बँकिंग व्यवस्था ही अनेक देशांमध्ये कोलमडण्याच्या मार्गावर आहे. आपल्या देशातही तीच परिस्थिती. पण, बँकेला मरू देणं हे कोणत्याही सरकारला परवडणारं नाही. बँकांना सरकार मरू देणार नाही, सरकार जगवेल त्यांना. डिसेंबर २००८ मध्ये लेहमन ब्रदर्स कोलमडले. त्याचे धक्के सर्वदूर अगदी भारतातही बसले. बांधकाम व्यवसायात तर एवढं मंदी आली की, लोक कार्यालये बंद करून बसले. त्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला घरी जायला सांगितलं. म्हणजे आता काही केलं तरी आपलं नुकसानच होणार, हे ओळखून काहीही न करणे बरे, असं लोकांना वाटू लागलं. मग त्या काळातही मी विचार करत होतो की, आपल्याला काय करता येईल. लोकांचे प्रकल्प बंद झाले होते. लोकांची गरज काय आहे, हे पाहत असं लक्षात आलं की, छोट्या घरांची आज जास्त गरज आहे. बेघरांची संख्या खूप मोठी आहे. मुंबईत सात लाख लोकांना घरं नाही. पण, घरे मोठ-मोठी बनत आहेत. म्हणून छोटी घरं बनली पाहिजेत. त्यासाठी काय करावं लागेल, याचा विचार करता करता कळले की, घरांचा आकार २५ टक्क्यांनी कमी केला पाहिजे. आता घराची किंमतही परवडत नाही. तीसुद्धा २५ टक्क्यांनी कमी केली पाहिजे. या दोन्ही गोष्टीला उद्योग समूहात कोणीही तयार नव्हते. याला प्रचंड विरोध होता. तुम्ही हे सगळं कशासाठी करता? आमचं मार्केट कशाला घालवता? आमचा रेट कशाला तोडताय? याचा उपयोग काय होणार? पण, मी म्हटलं की, 'मला करायचं आहे' आणि मी ते केलं. एका ७०५ घरांच्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण केले. ज्या दिवशी तो प्रकल्प लोकार्पित केला, त्यादिवशी त्या स्टॉलवर भरपूर गर्दी झाली. १०० लोकांची व्यवस्था केली होती, पण तिथे एक हजार लोक आले आणि सगळ्यांच्या हातात बुकिंगचा चेक. पण, त्या मंडपात गर्दी काही मावेना. मग ते रस्त्यावर आले. रस्ताही बंद झाला. रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीसही आले आणि मग ती बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी त्यादिवशी मोठ्या संख्येने नोंदणी केली. अनेकांचे फोन आले. पण, कोणी सवलतीची मागणी केली नाही. पहिला गृहप्रकल्प चक्क तीन दिवसात विकला गेला. नंतर अशाच चार गृहप्रकल्पांचे मी लोकार्पण केले. एक ठाण्यात, दुसरा पालघरमध्ये, तिसरा पडघ्यामध्ये आणि चौथा नवी मुंबईत. अशा एकूण चार गृहप्रकल्पांचे लोकार्पण केल्यानंतर प्रत्येक ठिकाणीच मी यशस्वी होत गेलो. लोकांची मागणीही वाढत होती आणि आता मी मागे वळून पाहतो तेव्हा 'JLL' नावाची एक मार्केटिंग कंपनी आहे. त्यांनी संपूर्ण भारतात एक सर्व्हे केला. त्यांच्या असे लक्षात आले की, प्रत्येक ठिकाणी घरांचा आकार कमी झाला आहे. आता बाजारात सगळे बांधकाम व्यावसायिक जी घरं घेऊन येत आहेत, ती सरासरी २३ टक्क्यांनी कमी झाली आहेत. मी जो घरांचा आकार २५ टक्क्यांनी कमी करण्याचा सिद्धांत मांडला होता, त्याच्या जवळपास ही सरासरी आहे. म्हणजे, त्याची अंमलबजावणी झालेली दिसते. घराचा आकार २५ टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे २५ टक्क्यांनी घरांची किंमतही कमी झाली. ती लोकांच्या आवाक्यात आली आणि म्हणूनच लोकांनी त्याच्यावर उड्या मारल्या.

 

उद्योजगता हा तुमच्या चिंतनाचा विषय राहिला आहे. सुमारे दोन कोटी तरुणांशी तुम्ही 'उद्योजकता' विषयावर संवाद साधला आहे. त्यावरील तुमचा टीव्ही शो, तुमची पुस्तकेसुद्धा खूप गाजली आहेत. हे तुम्हाला का करावसं वाटलं?

 

'उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा' हे पहिलं पुस्तक मी लिहिलं. हे लिहिण्यामागे हेतू होता की, मी जेव्हा उद्योगधंद्यात आलो, तेव्हा अनेकांशी भेटल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, लोकं कुठेतरी अडकलेली आहेत. सर्वाधिक लोकं पैशाच्या ठिकाणी अडकलेली आहेत. माझ्याकडे पैसा नाही. मग मी कसा उद्योग करणार? हाच अनेकांच्या अडचणीचा प्रश्न. म्हणूनच मी 'उद्योग करायला पैसा लागत नाही,' असं म्हटलं. कारण, उद्योग करायला कृती लागते आणि उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो. त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं नाही. बँकांमध्ये पैसा आहे. गुंतवणूकदारांकडे पैसा आहे. ग्राहकांकडे पैसा आहे. खूप लोकांकडे पैसा आहे. सोबतच मी 'नॅनो हौसिंग'वर जी पी.एचडी केली त्यावरही पुस्तक लिहिले. लोक पीएच.डी करतात. सिद्धांत मांडतात. पण नंतर तो लोकांपर्यंत येत नाही. म्हणून तुमचे संशोधनामधील सहभाग, योगदान लोकांपर्यंत पोहोचायलं हवं. म्हणून मी माझ्या प्रबंधावर पुस्तक लिहिले; नाहीतर लोक शंकाही घेतात की, मी खरंच पीएच.डी केली आहे का? असेच मी एकदा एका एका नेत्याला भेटलो. त्या नेत्याचं अवघं आयुष्य आरक्षण मिळवण्याच्या लढाईतचं गेलं. नंतर मी त्यांना विचारलं की, “आता मराठ्यांंना आरक्षण मिळतंय, तर तुम्ही शांत का?” तेव्हा ते म्हणाले, “पण नोकऱ्या कुठे आहेत? त्यामुळे आरक्षणाचा फायदा काय?” म्हणूनच, आपण मृगजळाच्या मागे धावणं बंद केलं पाहिजे. आता नोकऱ्यांचा काळ राहिलेला नाही. नोकऱ्या मागणारे होऊ नका, तर नोकऱ्या देणारे व्हा, हा दृष्टिकोन, ही वृत्ती तरुणांमध्ये निर्माण होणं गरजेचं होतं; अन्यथा तो तरुण सरकारला वा परिस्थितीला आई-वडिलांना समाजाला दोष देईल. तसे न होता तुम्ही नोकऱ्या देणारे व्हा. त्याच्यासाठी तुम्ही उद्योजक व्हा म्हणून मी 'सुरेश हावरे स्टार्ट-अप शो सुरु केला. नंतर 'सुरेश हावरे बिझनेस शो' केला. मला अशी अनेक उदाहरणे दाखवायची होती की ज्यांनी शून्यातून उद्योगनिर्मिती केली. अशा शून्यातून उद्योेग उभा करणाऱ्या २० उद्योजकांनामी शोमध्ये आमंत्रित केले आणि नंतर या शोचे एका पुस्कातही रुपांतर करण्यात आले. 'उद्योग करावा ऐसा.' नंतर एक स्टार्ट-अप शो केला. त्या शोमध्ये केवळ एका कल्पनेवर आधारित उद्योग उभा केलेल्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आहेत. छोट्या छोट्या कल्पना. पण, त्या कल्पना त्यांनी रुजवल्या. त्या वाढवल्या. त्याच्यातून उत्पादन काढलं आणि ते मार्केटमध्ये आणलं. लोकांना ते आवडलंही. त्याच्यावर उद्योग उभा झाला. आता त्याच्यावरही एक पुस्तक येतं आहे, 'सुरेश हावरे स्टार्ट-अप शो.' लोकांना याची गरज आहे असं मला वाटलं आणि ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं की, त्यातूनच गरज आहे हे सिद्ध झालं.

 

तुमचा शो खूप गाजला. त्यातून लोक कुठल्या कुठल्या क्षेत्रात पुढे गेले? आणि त्यानंतर तुमचा त्यांच्याशी संवाद कसा राहिला? म्हणजे या शोचा रिझल्ट काय?

 

पहिली गोष्ट म्हणजे लोकांना मुळात 'स्टार्ट-अप' म्हणजे काय, हेच माहिती नाही. कोणी पिठाची गिरणी, किराणा दुकान, पान टपरी, सुरू केली, तर ते 'स्टार्ट-अप' आहे का? तर 'स्टार्ट-अप' म्हणजे काय हे आधी लोकांना कळलं पाहिजे, हा माझा हेतू होता. 'स्टार्ट-अप'च्या तीन आवश्यकता आहेत. एक म्हणजे ती अभिनव कल्पना असावी जसं उबर, ओला, फेसबुक, व्हॉट्सअॅप. दुसरं म्हणते, ती कल्पना तंत्रज्ञानावर आधारित असावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिच्यात अमर्यादित वाढण्याची, पसरण्याची क्षमता असली पाहिजे. ती जगभर पसरली पाहिजे. मी असा विचार केला की, आपल्याला मराठी 'स्टार्ट-अप' शोधायचे आहेत. कारण, शो मराठीत होता. सहा महिने मी त्यासाठी शोध घेतला. पण, मराठी मुलं मिळत नव्हती. म्हणून मी मग माझ्या शोधाची व्याप्ती वाढवली व तेव्हा ५० लोकं मला मिळाली. त्यातून मी १५-१६ लोकं निवडली आणि त्यांचा शो सादर केला. त्यातून भरपूर अभिनव कल्पना समोर आल्या. एकाने तर अशी भन्नाट कल्पना काढली की, तो विद्यार्थ्यांकडून मागील वर्षीच्या वह्या घेतो व नव्या कोऱ्या तेवढ्याच वजनाच्या वह्या त्यांना देतो. तेव्हा त्याला विचारले की, तुला हे सगळं कसं परवडतं रे? कारण, तुला फक्त रद्दी मिळते आणि तू तर विद्यार्थ्यांना चक्क नवीन वह्या देतोस. मग त्यांना सांगितले की, तो ज्या वह्या विद्यार्थ्यांना देतो, त्या वह्यांमागे जाहिरातीही छापल्या जातात आणि त्या जाहिरातीतून त्याला उत्पन्न मिळतं आणि रद्दीतूनही पैसे मिळतात. ही एक अभिनव कल्पना होती. अशा विविध कल्पना आहेत. 'एक रुपया डॉक्टर' ही एक अशीच कल्पना. एक रुपयात डॉक्टर कसा परवडेल? पण, रोज २००-३०० रुग्णांनी जरी भेट तरी महिन्याला एक रुपयानेही कमाई होतेच की केवळ प्रिस्क्रिपशनवर. अन्य लोकही त्याला सहकार्य करतात. त्याची जाहिरात करतात. म्हणून मी म्हणतो की, कल्पना ही भविष्याचे चलन आहे. म्हणूनच, कल्पनेला 'कॅच' करता आलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात विविध कल्पना येतात आणि जातात. पण, त्या आपण 'कॅच' करत नाही. म्हणून आधी कल्पना पकडता आली पाहिजे. नंतर ती शिजवता आली पाहिजे, त्याला 'इन्क्युबेशन' म्हणतात. म्हणून 'इन्क्युबेशन सेंटर' सरकारने सुरू केली आहेत. आपल्या अभिनव कल्पनेचं 'कुकिंग' केल्यानंतर तिला 'बिझनेस मॉडेल'मध्ये टाकता आलं पाहिजे. त्याच्यातून 'बिझनेस' निर्माण झाला पाहिजे. यासाठी मी तो शो केला आणि तो यशस्वी झाला. कोट्यवधी लोकांनी तो शो पाहिला. त्यावरसुद्धा माझं एक पुस्तक येणार आहे. या शोमध्ये आमचा संपर्क क्रमांक आम्ही दिला होता. महाराष्ट्रातून अनेक मुलं संपर्क करायची. या सगळ्यांना शो झाल्यानंतर एकत्र केलं. संपूर्ण दिवस कार्यशाळा घेतली. ज्यांनी ज्यांनी शोमधून प्रेरणा घेतली त्यांना बोलावलं. ६०० लोकांनी नोंदणी केली. ज्यांनी खरीच चांगली कल्पना वापरली होती, अशी २०० लोकं आम्ही निवडली आणि यांची दिवसभर कार्यशाळा घेतली. ते मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये जसं 'स्टॉक एक्सचेंज' तसं 'आयडिया एक्सचेंज' मुंबईत सुरू झालं पाहिजे, असं वाटलं व पुढच्या काळात ते होईल. लोकांनी ही संकल्पना उचलून धरली. एक जण नगर जिल्ह्यातल्या एका गावातून आला होता. तो म्हणाला की, मी दूध विकायचो, पण दुधाचं ताक करून विकलं, तर फायदा होईल, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली व मी तसे केले. दुधापासून नऊ-दहा उत्पादने सुरू केली आणि मी आता ती विकतोय व नफा कमावतोय.

 

एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण सुपरिचित आहातच. त्याच्यासोबत तुम्ही शिर्डी संस्थानचे अध्यक्षही आहात. शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तुम्ही अनेक नाविन्यपूर्ण, लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. तुमच्या विविधांगी कारकिर्दीतील या भागाविषयी काय सांगाल?

 

ध्यानीमनी नसतानाही मी शिर्डी संस्थानचा अध्यक्ष झालो. माझं आयुष्य हे 'अॅडव्हेंचर'ने भरलेलं आहे. म्हणूनच नवनवीन क्षेत्रात कधी नियती मला ढकलते, तर कधी मी जातो. शिर्डीमध्ये जवळपास ३५ कार्यांसाठी मी पुढाकार घेतला आहे. त्यापैकी चार प्रमुख कार्य मी आता सांगतो. मी पहिल्यांदा शिर्डीला गेलो, तेव्हा मंदिराचा चेहरा सेवाभिमुख आणि समाजाभिमुख असला पाहिजे, असं वाटले आणि जर तसे नसेल तर तो तयार केला पाहिजे. आपल्या देशात ३० लाख मंदिरे आहेत, शाळा-महाविद्यालये २० लाख आहेत. म्हणजेच मंदिरांची संख्या जास्त आहे. मंदिरांची उलाढाल सर्वात मोठी आहे. कोणत्याही उद्योग समूहापेक्षा म्हणजेच यात मोठं 'पोटेन्शिअल' आहे. नोकऱ्यांच्या शक्यताही खूप आहे. अनेकांना ही मंदिर रोजगार पुरवतात. तर मी मुख्य चार कार्यांमध्ये पुढाकार असा घेतला की, एक म्हणजे बाबांच्या समाधीवर दररोज दोन टन फुले अर्पण केली जातात. पण, ती कचऱ्यात फेकली जातात, असं निदर्शनास आलं. मला तो भक्तीचा अनादर वाटला. भक्तीचा आदर केला पाहिजे म्हणून या फुलांतून काय निर्माण करता येईल, असा विचार केला. त्यासाठी अनेकांनी विविध संकल्पनांचे सादरीकरण केले. त्यातून अगरबत्तीची संकल्पना आम्ही निवडली. आम्ही अगरबत्ती बनवणे सुरू केले. आज दिवसाला पाच हजार अगरबत्तीचे पुडे निर्माल्यातून तयार केले जातात. एका पुड्यात ३० अगरबत्त्या असतात. ३० रुपयायला तो पुडा विकला जातो. म्हणजेच दीड लाख रुपये रोज केवळ अगरबत्ती विक्रीतून येतात. शिर्डीतच त्याचे उत्पादन घेतले जाते. महिला बचत गटांच्या माध्यमातून हे काम होते. म्हणजेच 'वेस्टमधून वेल्थ' तयार झाली आणि भक्तांच्या भक्तीचा सुगंध भारतभर दरवळला. २०० महिलांना यातून रोजगारदेखील मिळाला, तर अप्रत्यक्षपणे अनेकांना रोजगार मिळाला. दुसरा विचार केला तो रक्तदानाचा. रोजच्या ५० हजार भक्तांपैकी ५०० लोकांनी रक्तदान केले तरी, रक्तपेढीला व रुग्णांना रक्त मिळेल. म्हणून आमच्या रुग्णालयाच्या रक्तपेढीबरोबरच जिल्ह्यातल्या, आसपासच्या रक्तपेढ्यांना, महाराष्ट्रातल्या रक्तपेढ्यांनाही तिथे रक्त गोळा करण्यासाठी आम्ही बोलावले. २५ रक्तपेढ्या आम्ही जोडून घेतल्या. प्रत्येकाला वार वाटून दिले व रक्तदान शिबीर सुरू केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात येऊ लागले. शिवाय रक्तदात्याला बाबांचे थेट दर्शन उपलब्ध करून दिले. आता १५० लोक तिथे रोज रक्तदान करतात. तिसरे म्हणजे, मोठ्या प्रमाणावर युवक शिर्डीमध्ये पदयात्रा करत येतात. साडेचार लाख लोक चालत येतात. दरवर्षी त्यांना सेवेची संधी द्यायची असे ठरवले. शेगावच्या सेवेकरी योजनेच्या धर्तीवर ही योजना होती आम्ही 'साईसेवक' नावाने ही योजना सुरू केली. २० जणांचा एक गट तयार केला. त्यांचा एक-एक गटनायक ठरवला. असे रोज १० गट तिथे सेवेला असतील असे ठरवले म्हणजे २१० जण आठवड्यातून. १० गट तर वर्षभरातून ५२० गट एवढी जोडणी करायची होती. त्यासाठी साई सेवक, संमेलन आम्ही भरवले. सगळे पदयात्री आलेही. पहिल्याच दिवशी ५२० गटांऐवजी ५७० गटांची नोंदणी झाली. वर्षभराचे कॅलेंडर सुरू झाले. दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. चौथी नाविन्यपूर्ण गोष्ट अशी केली की, तीर्थक्षेत्राच्या गावात गेल्यावर आपल्याला मंदिर स्वच्छ दिसते. पण, गाव गलिच्छ दिसते. घाण, कचरा अस्वच्छता सगळी पसरलेली असते. म्हणून मी विचार केला की, शिर्डी शहर स्वच्छ झाले पाहिजे. यासाठी मंदिराने खर्च करायचे ठरवले. वर्षाला पाच कोटी रुपये आम्ही त्यासाठी मंजूर केले. दिवसातून दोन वेळा शिर्डी गाव झाडून स्वच्छ करण्याचे, कचरा बाहेर टाकण्याचे कंत्राट दिले. आता आम्ही घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही सुरू करत आहोत. गेल्या वर्षी महाराष्ट्रातले स्वच्छता सर्वेक्षण झालं. तेव्हा शिर्डीचा दुसरा, तर देशातून तिसरा क्रमांक आला. नगरपरिषदेला १५ कोटी रुपयांचं पारितोषिक मिळालं. विशेष म्हणजे गावाची जबाबदारी घेणारं शिर्डी संस्थान पहिलंच संस्थान ठरले.

 

दै.'मुंबई तरुण भारत'ची पालकसंस्था 'भारतीय विचार दर्शन' आणि दै. 'मुंबई तरुण भारत'शी तुम्ही जोडले गेले आहात. तुम्ही अध्यक्ष होतात. तुमचे वडीलही संस्थेशी जोडलेले होते, हा ऋणानुबंध कसा निर्माण झाला?

 

- मला आठवते की, आमच्या गावी, घरी एकच वृत्तपत्र येतं असे, ते म्हणजे 'नागपूर तरुण भारत.' 'नागपूर तरुण भारत' तेव्हा प्रचंड लोकप्रिय होत. माझे वडील 'नागपूर तरुण भारत'मध्ये विश्वस्त होते. आणीबाणीच्या काळात त्यांना जेव्हा 'मिसा'खाली अटक झाली, तेव्हा ते नागपूरमध्ये होते. तेव्हा अध्यक्ष इंदुलकर व वडील सोबतच होते. हा एक संबंध. दुसरा संबंध तो असा इंदुलकरांचा भाऊ एलाआयटीमध्ये हेडक्लार्क होता. माझं बी.एस्सी पूर्ण होऊन बी.टेकला जायचे होते. तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना या विषयी सांगितले. तेव्हा त्यांचा भाऊ तुरुंगात भेटायला आला. त्यांनी आम्हाला पत्र लिहिले. आणीबाणी सुरू होती. घरी पत्र आलं. तेव्हा ते अक्षर ओळखता येऊ नये, अशा पद्धतीने लिहिले होते. तेव्हा वडील मला म्हणाले की, “तुझ्या मित्राचे पत्र आले आहे.” मी म्हणालो, “माझा तर असा कोणी मित्र नाही, तुमचा असेल.” तेव्हा वडील म्हणाले, “कोणाचा का असेना, आपण जाऊन तर पाहू.” तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळ्या अॅडमिशन संपल्यानंतर काही जागा शिल्लक राहिल्या, तर त्या भरण्यासाठी 'स्पॉट अॅडमिशन' नावाचा प्रकार होता. म्हणजे वेळेवर जो उपलब्ध असेल त्याला प्रवेश दिला जाई. पण, मला त्याकाळी इंजिनिअरिंग कॉलेज कुठे किंवा त्यासाठी अर्ज कसा करायचा हेच माहिती नव्हते. तरी मी केला होता. मला बोलावणे आले होते. तेव्हा आम्ही तिथे गेलो. वडील पॅरोलवर सुटून आले होते. डोक्यावर त्यांच्या भगवी टोपी तशीच्या तशी होती. आणीबाणी सुरू असताना भगवी टोपी घालून वडील व त्यांच्या सोबत मी कॉलेजमधून फिरतोय. तेव्हा एकाने आम्हाला ओळखले व त्यांच्या केबिनमध्ये नेले. तेव्हा वैद्य नावाचे प्राध्यापक तिथे होते. ते स्वयंसेवक होते. ते म्हणाले, “तुम्ही आणीबाणी असूनही भगवी टोपी घालून फिरताय?” वडील म्हणाले, “मी तुरुंगातून तसाच इकडे आलो आणि आता पुन्हा जायचंही आहे. मुलाच्या प्रवेशासाठी आलो.” तेव्हा त्यांनी हे पत्र पाहिले. त्यांनी ते ओळखलं की, हे पत्र इंदुलकरांचे आहे. मग ते आम्हाला आत घेऊन गेले आणि माझी अॅडमिशन झाली. म्हणजे माझी अॅडमिशन 'तरुण भारत'शी संबंधित आहे. हा एक ऋणानुबंध आहे. जो विसरता येणार नाही. कर्मधर्म संयोगाने इथे आल्यानंतर एके दिवशी नितीनजींनी बोलावले. तेव्हा 'तरुण भारत' बंद पडला होता. कर्जबाजारी झाला होता. कर्जबाजारी का झाला? हा संशोधनाचा विषय आहे. तेव्हा मला नितीनजी म्हणाले की, “तू व्यवसायात आहेस, पैशाची उलाढाल बरीच असते. तर हे आम्हाला काही झेपेनासं झालंय. आमची काही संपत्ती आहे, देणंही आहे. हे सगळं तू घेऊन टाक. त्यानंतर त्यांनी एक सामंजस्य करार करून दिला. नंतर मी विचार केला की, हा 'तरुण भारत,' 'भारतीय विचार दर्शन' संस्था खूप मोठमोठ्या लोकांनी उभी केलेली आहे. त्यामुळे ती संपता कामा नये. ती जीवंत राहिली पाहिजे व ती वाढली पाहिजे. त्यामुळे मला वैयक्तिक म्हणून जी प्रॉपर्टी नितीनजींनी दिली होती ती मी वैयक्तिक म्हणून घेतली नाही. ती 'भारतीय विचार दर्शनची'च ठेवली. आजही 'भारतीय विचार दर्शनची'च आहे. जे काही खर्च करता येणे आवश्यक होते, ते केले. त्यातून काही उभे झाले. सगळे कर्ज फिटले आहे.

 

तुम्ही दोन निवडणुकाही लढवल्या आहेत. म्हणजे ३५० ते ४५० कोटींची कंपनी चालवणे आणि निवडणूक लढवणे यात बराच फरक आहे. निवडणूक लढवण्याचा तुमचा अनुभव कसा होता?

 

ते ही एक 'अॅडव्हेंचर'च म्हणावे लागेल. त्यावरही मी 'निवडणूक पाहावी लढून' असे पुस्तक लिहिले आहे. कारण, मला असं वाटतं की माझ्यासारखे अनेकजण असतात, ज्यांची आयुष्यात पहिली निवडणूक असते. त्यांना काहीही माहिती नसते. म्हणजे 'AB' फॉर्म काय हेही माहिती नसते. अशा अनेकांना मार्गदर्शन उपलब्ध केले पाहिजे. कारण आज ते उपलब्ध नाही. पुस्तक लिहिले तर चांगले चालेल! पण, ते 'अॅडव्हेंचर'च होते. कोणी प्रोत्साहित करते, मग आपण ढकलले जातो. मी तसाच गेलो. पण माझं अपयश राहिलं त्यात. राजकारण हेच एक असं क्षेत्र आहे, जिथे मला यश मिळाले नाही. माझी प्रकृती, प्रवृत्ती, स्वभाव त्याला साजेसा आहे, असं मला वाटलं नाही. आजचं राजकारण आपण पाहिलं, तर त्यात अपवाद दिसतीलच. पण, आज राजकारणाचं 'कमर्शियलायझेशन' झालं आहे. गुन्हेगारीकरण झालेलं आहे आणि प्रोफेशन झालेलं आहे. यापूर्वी असं नव्हतं. म्हणजे, 'Politics was never a profession.' पण, आज तो व्यवसाय झाला आहे. उदरनिवार्हचे साधन झालेले आहे. उत्पन्नाचे साधन झालेले आहे. बिझनेस झाला आहे. याला अपवाद खूप आहेत. मोठे अपवाद आहेत. काही लोक ते 'पॅशन' म्हणून करतात. आवड म्हणून, सामाजिक आवश्यकता म्हणून करतात. समाजसेवा म्हणून, नीतिमत्ता, ध्येय, शब्दप्रेम या भावनेतून करतात. पण, अशांची संख्या खूप कमी आहे. मी जे बोलतो ते खूपच जबाबदारीने बोलतो. हे सगळ्या पक्षांना लागू आहे. कुठलाही पक्ष त्यात अपवाद नाही. पण, अपवाद अनेक पक्षात आहेत. एकाच पक्षात आहेत असे नाही.

 

राजकारणात चांगल्या लोकांची कमतरता आहे, तर पुन्हा तुमचा काही निवडणूक लढवण्याचा मनोदय आहे का?

 

मला आता ते माहिती झालेलं आहे. आणि माझा स्वभाव जे माहिती आहे, त्यात न जाण्याचा आहे. त्याच्यात आता 'अॅडव्हेंचर' काही राहिलेलं नाही.

 

हिमालयापर्यंत तुम्ही पोहोचला होता. हिमालयाचं आकर्षण तुम्हाला का वाटलं?

 

'अॅडव्हेंचर' म्हणूनच मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात जो मुद्दा आला तो अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक माणसाचा एक वेगळा वेगळा असा 'एव्हरेस्ट' असतो आणि त्याला तो गाठायचा असतो. म्हणून मला असं वाटलं की, खरा एव्हरेस्टच का गाठू नये? मला माहिती होतं, आपल्या ज्या क्षमता आहेत, त्या मर्यादित आहेत. वेळ मर्यादित आहे. जेवढा वेळ देणं आवश्यक आहे, तेवढा देऊ शकणार नाही. पण, नंतर मला 'गिरीप्रेमी' नावाच्या पुण्यातील संस्थेची माहिती मिळाली. मी त्यांच्या एव्हरेस्ट सर केलेल्या गिर्यारोहक तरुणांची भेट घेतली. तेव्हा मलाही एव्हरेस्टवर जाण्याची इच्छा झाली व नंतरच्या वर्षी मी त्यांच्याबरोबर एव्हेरस्ट बेस कॅम्पला गेलो. तो अतिशय वेगळा अनुभव होता. अतिशय निर्जन, केवळ बर्फ आणि बर्फच असलेल्या ठिकाणी मी होतो. पण त्या दहा दिवसांच्या कालावधीत पहिल्यांदा मी स्वतःशी बोलू शकलो. कारण, स्वतःशी बोलण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. आपण इतरांशी बोलतो पण स्वतःशी बोलणेही आवश्यक असते. तसा कालावधी मला तिथे मिळाला. नंतर मी अंटार्क्टिलाही गेलो. स्कुबा डायव्हिंगही केले, आता स्काय डायव्हिंग आणि पंजी जम्पिंग मला करायचे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@