शेवटी काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019
Total Views |



'रुजवात' या वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख. या माध्यमातून, विकासाच्या मानसशास्त्राविषयीचे माझे अनुभव, माझी विचारधारा मांडता आली. मानवी विकासाचा बहुअंगी परामर्श घेता आला. काही समाजविधायक विषयांना स्पर्श करता आला याचा मनापासून आनंद आहे.


“तुमच्यापासून काय लपवायचं, मॅडम? मी एक-दोन वेळा स्वतःचा जीव संपवण्याचा पण विचार केला. म्हटलं, लेकरांना देऊ सोडून त्यांच्या नशिबावर.” एक बुटकीशी, सडपातळ स्त्री माझ्याशी बोलत होती. तिच्या आधीच सुजलेल्या, लाल झालेल्या डोळ्यांत पुन्हा अश्रू जमा झाले. मी शांतपणे पुढे सरकवलेल्या पेल्यातील दोन घोट पाणी पिऊन तिने काही क्षण डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला आणि डोळे उघडले. त्यात आत्मविश्वासाची चमक परत आली होती. पण मग मी विचार केला, ती पुढे सांगू लागली, “जर मी माझ्या लेकरांना दुःख सोसायला सोडून दिलं, तर मी माझ्या देवाला काय तोंड दाखवणार? मग ठरवलं, हे असलं भीतीचं जगणं मीही जगणार नाही आणि माझ्या मुलांनाही जगायला लावणार नाही. मुलांना चांगलं आयुष्य आणि शिक्षण देण्यासाठी मी वाट्टेल ते प्रयत्न करीन.” माझ्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटली. मला अजून एक 'कर्मयोगी' भेटली होती. कुठून आले असेल हे धाडस हिच्याकडे? स्वतःच्या देवावर पूर्ण विश्वास टाकून अंधारातल्या भविष्याला उजळायच्या प्रेरणेने पावले उचलण्याचे धाडस!

 

माझ्या आत्तापर्यंतच्या १५-१६ वर्षांच्या देश-विदेशातील कार्यकालात असे हे 'शुद्ध चैतन्य' मी अनेक व्यक्तींमध्ये अनुभवले आहे. त्याची अभिव्यक्ती प्रत्येक वेळी वेगवेगळी असेल, पण त्यातील 'अधिक समृद्ध आयुष्यासाठी बदलाची कास धरणारा' समान धागा मात्र वय, शिक्षण, देश, धर्म, वर्ण या सर्व पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीला जोडणारा आहे याचा मला नेहमी प्रत्यय येतो. १० वर्षांच्या कालावधीत एकामागोमाग एक दोन्ही पार्टनर्स गँग-वॉरमध्ये अत्यंत क्रूरपणे मारले गेल्यानंतर आपल्या २० व ८ वर्षांच्या दोन मुलींना घेऊन दिवसागणिक आयुष्य अधिकाधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न चालू ठेवणाऱ्या छत्तीशीतल्या लिंडामध्ये मी ती जिद्द पाहिली आहे. 'I never ask Him, why me? I always say, try me.' हे जीवनसूत्र बनवून जगणारी लिंडा, भगवद्गीतेमध्ये वर्णिलेल्या 'स्व-धर्माचे' खऱ्या अर्थाने पालन करत आहे. लोक स्वतःचे, आपल्या आयुष्याचे वर्णन कसे करतात हे अनुभवणे खूप चित्तवेधक असते. एखाद्या अतिशय हृद्य समुपदेशनाच्या सत्रात जाणवते की, समुपदेशकाच्या माध्यमातून लोक स्वतःशीच संवाद साधत असतात. त्या दिवशी एका १६ वर्षाच्या मुलाने केवळ तासाभराच्या सत्रात माझ्यासमोर भावनांचे जणू इंद्रधनूच उलगडले. हमसून रडला, जोराने ओरडला, मुठी घट्ट आवळून राग आवरला, शून्यात बघत स्तब्ध बसला, निघताना मला एक विनोद सांगून स्वतःच मोकळे हसला. जाताना माझ्यापाशी त्याचे एक वाक्य सोडून गेला, “माय गॉड, मला वाटलंच नव्हतं की या सगळ्या गुंत्याकडे अशाही पद्धतीने पाहता येईल. This changes everything.”

 

लोक जेव्हा माझ्यातल्या मानसोपचारतज्ज्ञाला भेटतात, तेव्हा त्यांच्या ऊर्जेचा काही भाग माझ्यापाशी सोडून जातात, असे मला प्रकर्षाने जाणवते. ही ऊर्जा मला व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातही खूप उपयोगी पडते. आपल्याला भेटणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला, तिच्याबाबत उतावीळ आराखडे न बांधता, जाणून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर तिच्या माध्यमातून आपल्याला आपल्याही तात्कालिक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, याची मी वारंवार अनुभूती घेतलेली आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत राहण्यासाठी हा माझा मोठा प्रेरणास्रोत आहे. स्वतःशी असणारे नाते बदलून आपले आयुष्य संपूर्णपणे बदलणारे लोक मी पाहिलेले आहेत. त्यांच्या या बदलाच्या प्रवासात सहभागी-साक्षीदार होण्यातले समाधान काही औरच आहे. 'रुजवात' या वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख. या माध्यमातून, विकासाच्या मानसशास्त्राविषयीचे माझे अनुभव, माझी विचारधारा मांडता आली. मानवी विकासाचा बहुअंगी परामर्श घेता आला. काही समाजविधायक विषयांना स्पर्श करता आला याचा मनापासून आनंद आहे. या प्रवासात वाचकांच्या रूपाने अनेक हितचिंतक, प्रोत्साहक, समीक्षक भेटले. त्यांच्या प्रतिक्रियांमधून माझ्या लेखनात, विचारांमध्ये अधिकाधिक संपन्नता येत गेली. शेवटी काय? आपल्या आयुष्यात ज्यांची योजना केली गेली आहे, त्या सर्वांकडून शिकत राहणे, क्षणोक्षणी विकसत राहणे महत्त्वाचे.

 

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!

 

- गुंजन कुलकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@