॥तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय॥

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2019   
Total Views |


 
 
 
ज्योतिरिंद्रनाथ टागोरांचे संगीत, कला, साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. भारतातील इतर भाषांमधील संगीतापेक्षा बंगाली संगीताचे वेगळेपण सिद्ध करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे.
 

ज्योतिरिंद्रनाथ टागोर यांची आज ९४ वी पुण्यतिथी! ज्योतिरिंद्रनाथ टागोर हे एक उत्तम लेखक, संगीतकार, गीतकार, चित्रकार, संपादक आणि अनन्य साधारण बुद्धिमत्ता असलेले विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सांगू तितक्या ओळखी कमीच आहेत. विविध क्षेत्रांचे त्यांना सखोल ज्ञान होते. एक माणूस आपल्या ७६ वर्षांच्या उभ्या आयुष्यात किती गोष्टी करू शकतो, अनेक कला आत्मसात करू शकतो, अनेक विद्यांमध्ये पारंगत होऊ शकतो, नुसते पारंगत होणेच नव्हे, तर त्या विषयात विद्वत्ता प्राप्त करू शकतो, एखाद्या नव्या कलेला जन्म देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्योतिरिंद्रनाथ टागोर!

 

जीवन हे नश्वर आहे, कर्मधर्म संयोगाने माणसाला लाभलेल्या आयुष्याचे आसमंत किती मोठे आहे, याची कल्पना करणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे आकाश किती मोठे आहे, हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्याचादेखील थांगपत्ता लावता येत नाही. विश्वाच्या या भल्यामोठ्या कॅनव्हासवर मनुष्यरुपी जीवनाचे अनेक रंगतरंग उमटत असतात. काळाच्या ओघात काही पुसले जातात, तर काही पुसले जाऊनही आपली छाप जनसामान्यांत कायम ठेवतात. ‘मरावे परी कीर्तिरुपी’ हे सूत्र फार कमी लोक आपल्या प्रत्यक्ष जीवनात अवलंबतात. जी माणसे हे सूत्र अवलंबतात ती अजरामर ठरतात. पुढे युगानुयुगे त्यांचा उल्लेख केला जातो. तुम्ही कोण आहात? कोणत्या जातीचे, धर्माचे आहात? तुमची मातृभाषा कोणती? हे महत्त्वाचे नसून तुमचे कार्य काय? हे नेहमी महत्त्वाचे असते. मृत्युपश्चात केलेले कार्यच लोकांच्या लक्षात राहणारे असते, तुम्ही केलेले उत्तम कार्य अनेकांना तुमचे स्मरण करून देते. त्यालाच खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण म्हणतात.

 

ज्योतिरिंद्रनाथ टागोरांचे संगीत, कला, साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. भारतातील इतर भाषांमधील संगीतापेक्षा बंगाली संगीताचे वेगळेपण सिद्ध करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. देशातील विविध राज्यांमधील संगीत वेगळे असले, त्याची लय वेगळी असली, तरी विविध भाषांमधील हे सर्व सूर देशातील विविध नद्यांप्रमाणे ‘भारत’ या एका सागरालाच येऊन मिसळतात. त्यातूनच ‘जन-गण-मन’ हे देशव्यापी गीत तयार होते. ‘जन-गण-मन’ चा दाखला येथे देण्याचे कारण म्हणजे, ज्योतिरिंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू! मोठा भाऊ या नात्याने ज्योतिरिंद्रनाथांनी रवींद्रनाथ टागोरांप्रति असलेली आपली सर्व कर्तव्ये तर पूर्ण केलीच. पण आपल्या लहान भावामधील सुप्त कलागुण त्यांनी वेळीच ओळखले आणि त्यांना वाव दिला. घरातच कलेचा वारसा लाभल्याने आणि कलेची उत्तम जाण असलेल्या ज्योतिरिंद्रनाथांच्या योग्य शिकवणीमुळे आज रवींद्रनाथ टागोरांनी केलेले कार्य जगविख्यात आहे. दारातील एखाद्या छोटाशा रोपट्याला दररोज पाणी घालून, योग्य ती देखभाल केल्यावर त्याचे रूपांतर एका विस्तीर्ण वटवृक्षात होते. तेव्हा त्या वटवृक्षाच्या छायेत आश्रय घेण्यासाठी अनेकजण येतात. वटवृक्षाचे भलेमोठे रूप पाहून ते त्याचे कौतुकही करतात. पण त्या वटवृक्षाचे इवलेसे रोप लावणारा जन्मदाता, तर महान असतोच. तसेच त्याला नियमितपणे पाणी घालून त्याची काळजी घेणाऱ्याचेदेखील तितकेच श्रेय असते.

 

४ मे, १८४९ रोजी जोरासंको येथे टागोरांच्या घरात ज्योतिरिंद्रनाथांचा जन्म झाला. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा कोलकाता हे कलकत्ता होते. इंग्रजांचे देशावर राज्य होते. शिक्षण हे सर्वसामान्यांच्या नशिबात नव्हते. ज्योतिरिंद्रनाथांचे मोठे बंधू हेमेंद्रनाथ टागोर यांनी घरातच ज्योतिरिंद्रनाथांना प्राथमिक शिक्षण दिले. ज्योतिरिंद्रनाथ हे ललित कलेचे विद्यार्थी होते. नंतर नाट्यकलेकडे त्यांचा ओढा वाढत गेला. घरी नाटकाचा सराव करण्यासाठी ज्योतिरिंद्रनाथांनी शिक्षण अर्धवट सोडले. त्यांचे चुलत भाऊ गणेंद्रनाथांनी १८६५ साली जोरासंको नाट्यशाळेची स्थापन केली. ‘कृष्णकुमारी’ नाटकामध्ये ज्योतिरिंद्रनाथांनी ‘अहिल्यादेवी’ या धाडसी राणीची भूमिका साकारली होती. या नाटकातूनच ज्योतिरिंद्रनाथांना लिखाणाची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी नाटकांच्या पटकथालेखनास सुरुवात केली. त्यांच्या लेखणीतून ‘पुरुबिक्रम,’ ‘सरोजिनी,’ ‘अश्रुमती’ (अश्रु गाळणारी स्त्री), ‘स्वप्नमयी’ (स्वप्न पाहणारी स्त्री) या उत्तम कलाकृती साकारल्या गेल्या.

 
कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी बंगालीमध्ये भाषांतर केले. त्यामुळे बंगाली भाषिकांना या महान कलाकृतीची पर्वणी लाभली. यावरूनच ज्योतिरिंद्रनाथ टागोर हे संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते, हे दिसून येते. बंगाली या आपल्या मातृभाषेवरील प्रेम त्यांनी कधीही कमी होऊ दिले नाही. संस्कृतमधील अनेक नाट्यकलाकृतींचे ज्योतिरिंद्रनाथांनी बंगालीमध्ये भाषांतर केले. शेक्सपिअरच्या ‘ज्युलिअस केसर’ पुस्तकाचा त्यांनी बंगालीत अनुवाद केला. इंग्रजीवर तर त्यांचे प्रभुत्व होतेच, पण फ्रेंच ही परकीय भाषादेखील त्यांना उत्तमरित्या अवगत होती. अहमदाबादमध्ये बंधू सत्येंद्रनाथांच्या घरी वास्तव्यास असताना त्यांनी सतार शिकण्यास सुरुवात केली. नंतर हळूहळू त्यांनी पियानो, हार्मोनियम, व्हायोलिन वादनासही सुरुवात केली. संगीतकार म्हणून त्यांनी नाव कमावले. त्यांनी बंगालीमध्ये लिहिलेली, संगीतबद्ध केलेली गाणी आजही ज्योतिरिंद्रनाथांप्रमाणेच अजरामर आहेत. समाजकल्याणासाठी त्यांनी पत्रिका काढली होती. तसेच भाऊ द्विजेंद्रनाथ यांच्यासोबत त्यांनी ‘भारती’ या मासिकाची निर्मितीही केली होती. ज्योतिरिंद्रनाथांचे कार्य सांगावे तितके कमी आहे, अशा या टागोरबंधूंना आणि ज्योतिरिंद्रनाथांच्या अफाट कार्याला ‘दै. मुंबई तरुण भारत’ चा सलाम!
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@