न कमावताच वाटणारे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |



स्वत:च्या आयुष्यात एक दमडीही न कमवलेला गृहस्थ गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा करतो आणिकुठलीही निवडणूक न लढवता सरंजामी आयुष्य जगणारी त्याची बहीण वाराणसी लढविण्याच्या बाता मारते...


परवा पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार, अशी बातमी आली आणि त्यानंतर जो काही गदारोळ उडाला, त्याला तोड नाही. नोटाबंदीपूर्वी पंतप्रधानांनी अशी सूचना दिली होती आणि नोटाबंदी अमलात आली होती. पंतप्रधानांनी डीआरडीओचे कर्तृत्व सांगितले आणि ‘मिशन शक्ती’ची घोषणा केली. हा केवळ उपग्रहापुरता विषय नव्हता, हे वेगळे सांगायला नको. ज्यांना जो संदेश द्यायला हवा होता, तो मोदींनी चोख दिला. त्यामुळे या प्रकरणाची प्रतिक्रिया येणे साहजिकच होते. आपली क्षेपणास्त्रे ३०० किमीचा पल्ला गाठू शकतात आणि कुणालाही कसलाही सुगावा लागू न देता आपण हे करू शकतो, हे मोदींना सांगायचे होते. “आज उपग्रह पाडलाय, उद्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहाणाऱ्यांकडे त्याचा रोख वळवू,” असा हा स्पष्ट संदेश होता. ‘मिशन शक्ती’ची नैसर्गिक प्रतिक्रिया यायला हवी होती, ती पाकिस्तान आणि चीनमधून. तिथून फारसे काही आवाज आलेच नाहीत. लहानमोठे निषेधाचे सूर आले. मात्र, अधिक कर्कश आवाज आले ते काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांकडून आणि त्यांच्यावर आशा लावून बसलेल्या त्यांच्या विचारवंतांकडून. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकिस्तानने आपल्या भूमीवरचे दहशतवादी तळ गुंडाळायला सुरुवात केली. मात्र, आपल्याकडे संशयाचे वातावरण कसे तयार केले जाईल, याचेच प्रयत्न अधिक करण्यात आले.

 

अटलजी म्हणत, “निवडणुका येतील जातील, पण देश अक्षुण्ण राहिला पाहिजे.” इथे तर निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासून एका माणसाच्या द्वेषातून जे काही सुरू आहे, ते देशासाठी तर घातक आहेच; पण इतकी वर्षे देश कुठल्या मानसिकतेच्या लोकांकडे होता, याचाही प्रत्यय देणारी ही गोष्ट आहे. डीआरडीओने जे साध्य केले ते करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते, ते डीआरडीओच्या माजी प्रमुखाने सांगून टाकले. शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांनी जे सांगितले ते असे होते की, “यापूर्वी आम्हीदेखील ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. मात्र, त्याची वाच्यता केली नाही.” मुळात वाच्यता का केली नाही, हे दोघांनीही सांगितले नाही. वाच्यता केली गेली नाही, त्याचे मुख्य कारण म्हणजे वाच्यता करण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. आपल्या सैन्याने काही केले तर त्यांची पाठ थोपटण्यापेक्षा अमेरिका काय म्हणेल? पाकिस्तान काय म्हणेल? चीन काय म्हणेल? याचीच चिंता काँग्रेसला सतावत होती. त्यामुळे आपल्या सैन्याचे खच्चीकरण करीत ही मंडळी सत्तेचा आनंद घेत राहिली. राफेलच्या बाबतीतही तेच झाले. राफेलची मागणी सैन्य दलाने इतक्या वेळा केली होती. मात्र, आपल्या पांढऱ्या शर्टावर डाग पडू नये म्हणून तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. आता केंद्र सरकारभोवती जे मळभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला जनता भुलणार नाही, हे सुस्पष्ट आहे.

 

मोदींनी गेल्या पाच वर्षांत जे कमावले त्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे विश्वासार्हता. या विश्वासार्हतेवरच्या आधारावरच ते आताची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांची संपत्ती वाढलेली नाही. कोणताही व्यवसाय न करता त्यांचे नातेवाईक आलिशान आयुष्य जगत नाहीत. राहुल गांधींनी नुकत्याच देशातील पाच कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याच्या बाता मारल्या. नीती आयोगातल्या तज्ज्ञांनी ही गोष्ट कशी अशक्य आहे, ते विशद केले. पण, एकदा का तुम्ही निवडणूक हरणार, हे स्पष्ट असले की तुम्ही वाटेल त्या थापा मारू शकता आणि स्वत:ची बुडती नौका तारल्याच्या आवेशातही जगू शकता. ज्याने आयुष्यात एक रुपया कमावला नाही, तो आज लोकांना पैसे वाटण्याच्या गोष्टी करीत आहे. वयाची चाळीशी पार केलेल्या राहुल गांधींनी आपल्या पोटापाण्यासाठी काय केले? रोजच्या जगण्यासाठी लागणारे पैसे कुठून कमावले? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच आहेत. राजीव गांधी पायलट होते. राहुल आणि त्यांच्या भागिनी नेमक्या काय करतात, हे कुणालाच ठाऊक नाही. प्रियांकाचे तर पाहावे तितके नवलच! दर पाच वर्षांनी या बाई पडद्यातून बाहेर पडतात. शिवीगाळ करायचे उद्योग करतात आणि पुन्हा कुठेतरी गायब होतात. दरम्यानच्या काळात यांच्या नवऱ्याचे उद्योग मात्र चर्चेत असतात. सारे काही आपल्या बापजाद्यांची मालमत्ता असल्याचा जो काही समज गांधी परिवाराच्या या पिढीत आहे, त्याला तोड नाही. रायबरेलीत उरलेसुरले कार्यकर्ते विचारतात की, “तुम्ही रायबरेली का लढवित नाही?” यावर त्या म्हणतात, “वाराणसी का लढवू नये?” प्रियांकाने जनतेचे संसदेत प्रतिनिधीत्व केले नाही की कधी जनतेच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठविला नाही, तरीही आपल्याला कुठूनही निवडणूक लढता येते, हा आविर्भावच गंभीर आहे. वस्तुत: ज्या उत्तर प्रदेशातून गांधी परिवार निवडून येतो, त्या उत्तर प्रदेशात काँग्रेसने आपले बळ केव्हाच गमावले आहे.

 

मायावती आणि मुलायमसिंह यांच्याशी जोडगोळ्या लावून ही मायलेकरे निवडून येत असतात. २०१४च्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने सोनिया व राहुल यांच्या विरोधात उमेदवारच उभा केला नव्हता; उलट आपली ताकद त्यांच्यामागे लावली. आता वाराणसी लोकसभा लढविण्याची जी गोष्ट प्रियांका गांधी करीत आहेत, त्यामागे दडलेले राजकारणही तितकेच गलिच्छ आहे. भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ ‘रावण’ याने नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीहून लोकसभा लढविण्याची घोषणा केली आहे. मागे काही तरी फालतू कारणासाठी इस्पितळात असताना या रावणाला ही शूर्पणखा भेटायला गेली होती. आता प्रियांका गांधींना वाटते की, चंद्रशेखर आझाद दलितांची मते मिळवेल, काँग्रेसला काँग्रेसची मते मिळतील व आपण यशस्वी होऊ. या बालबुद्धी तर्काला जातीयवादाची घाणेरडी किनार आहेच, पण सरंजामी निर्बुद्धपणाचा वासही आहे. देशाची जनता मूर्ख आहे, असा विचार करूनच ही माणसे लढाईला उतरली आहे. पुलवामा हल्ल्याला दिलेला सडेतोड जबाब देशाच्या जनतेला भावला. जनता मोदींच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कर्तृत्वावर फिदा आहे. आयुष्यात काही न कमावलेली माणसे, वाटण्याची भाषा करीत काय काय गमावतील, हे पाहणे कुतूहलाचे असेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@