मोगलान रंगाकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |



लहानपणापासून आलेले कटु अनुभव म्हणूनच मोगलान श्रावस्ती यांच्या प्रत्येक पेंटिंगद्वारे व्यक्त होतात. मात्र, ते अनुभव नकारात्मक नसून बुद्धांच्या तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे ते सकारात्मकतेतून अभिव्यक्त झालेले दिसतात.


आजच्या असुरक्षित समाजात प्रत्येकजण चाचपडत-चाचपडत रस्ता शोधत असतो. जो रस्ता दिसतो तो खरेच अपेक्षित ध्येयापर्यंत नेऊन सोडणार आहे का किंवा दिसणारा प्रत्येक मार्ग हा योग्य आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे लहानपणापासून ‘शोधावी लागणं’ असं नकारात्मक भावनेतून न मानता, ‘शोधायला मिळण्याचं भाग्य’ जर एखाद्या व्यक्तीला मिळालं, लाभलं, तर त्या व्यक्तीकडून असामान्य कार्य घडू शकतं. जर का अशी व्यक्ती चित्रकार असेल, तर मग उपलब्ध ‘सरफेस’ अर्थात पार्श्वभूमी पुरेशी ठरते. अशा व्यक्तींना की, ज्यांना त्यांचे विचार रंगबद्ध-आकारबद्ध करायला...! मोगलान श्रावस्ती हेही अशाच एका स्वयंभू विचारांची बैठक असणार्‍या प्रतिथयश चित्रकाराचं नाव. विश्वविख्यात सर ज. जी. कला महाविद्यालयात सुमारे दोन दशकांहून अधिक काळ, कलाध्यापनाचे सत्कर्म करणार्‍या या आत्मसंवादी चित्रकाराने, त्याच्या लहानपणीच एका सच्च्या मार्गाची दिशा अवलंबिली आहे. लहानपणी समाजाच्या विविध समजुतींच्या आणि मानगुटीवर बसलेल्या भूतांना सामोरे जाताना मोगलान यांना अनेक मानसिक धक्क्यांसह कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. प्रत्येक संकट हे ‘स्वाध्यायिक’ मानत आणि प्रत्येक अपमान हा मानाची पहिली पायरी मानून चित्रकार मोगलान श्रावस्ती यांनी आज अखेरपर्यंत, अशी एक दिशादर्शक मार्गाची कास धरली की, जी आजच काय, भविष्यातही आनंदाकडेच घेऊन जाईल.

 

त्यांच्या ठाम विचारांचा ठसा हा त्यांच्या रंगलेपनातही दिसतो. अर्थातच, बुद्ध विचार, बुद्ध पिटके, बुद्ध ध्यान आणि बुद्ध संग या चतुःसूत्रींवर त्यांची प्रत्येक कलाकृती समृद्ध झालेली आहे. बुद्ध तत्त्वज्ञान हे कोणा एका धर्माचं, पंथाचं वा समाजाचं नसून ते एक वैश्विक तत्त्वज्ञान आहे. जीवनाचा अचूक अर्थ बुद्धज्ञानाद्वारे आकलन होण्यास सुलभ होतो. लहानपणापासून आलेले कटु अनुभव म्हणूनच मोगलान श्रावस्ती यांच्या प्रत्येक पेंटिंगद्वारे व्यक्त होतात. मात्र, ते अनुभव नकारात्मक नसून बुद्धांच्या तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे ते सकारात्मकतेतून अभिव्यक्त झालेले दिसतात. म्हणून या सार्‍याच कलाकृती या आदर्श विचारांच्या पथदर्शक ‘आयकॉन’ ठराव्यात. रंग, आकार, प्रतीके यांच्या अत्यंत साध्या सुलभ संकल्पनांद्वारे, स्वैर चिंतनातून त्यांची प्रत्येक कलाकृती बनविलेली नाही, तर बनलेली वाटते. म्हणूनच स्वयंभू कलाकृतीची अनुभती येतेच येते. काही आकारांमध्येच वैश्विक आणि गूढरम्य आशय असतो. मोगलान श्रावस्ती यांच्या कलाकृतींना या आशयाची किनार आहे. रंगांच्या लेपनासह पोत वा टेक्स्चरदेखील समर्पकता साधत असेल, तर कलाकृती निर्माणाचा हा शुभसंकेत मानला जातो. चित्रकार श्रावस्ती यांच्या या स्वयंभू विचारांतून निर्माण झालेल्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगिर कलादालनात संपन्न झाले असले तरी, विचार कायम असतो. म्हणूनच अशा विषयांना समर्पित झालेल्या कला प्रदर्शनाची दखल ही घ्यायचीच असते.

- प्रा. गजानन शेपाळ

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@