शिंग फुंकिले रणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019
Total Views |



राहुलमध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी राजकीय चातुर्याच्या बाबतीत मोदींच्या खूप मागे आहेत. शिवाय ते केव्हा चूक करतील याचाही भरवसा देता येत नाही. मोदींच्या बाबतीत तसे नाही. मोदी आपल्या क्षमतेचे श्रेय भाजपला निश्चितच देतील. पण, आज त्यांची स्थिती अशी झाली आहे की, ते स्वत:च्या बळावर गर्दी खेचू शकतात.


सतराव्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना मला पहिली दुसरीत असताना आमच्या गावातील प्रभातफेरीत गायिली जाणारी काव्यपंक्ती आठवते.

 

शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे,

सज्ज व्हा, उठा चला, सैन्य चालले पुढे...

 

अशी ती कविता होती. आज जेव्हा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम प्रत्यक्षात सुरू झाला आहे, तेव्हा ही काव्यपंक्ती आठवणे अगदी स्वाभाविक आहे. सोळाव्या लोकसभेची निवडणूक जरी नऊ टप्प्यांत झाली असली तरी ही मात्र सात टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला होणार असून सातव्या व शेवटच्या टप्प्याचे मतदान १९ मे रोजी होणार आहे आणि सर्व मतदारसंघांतील मतदानाची मोजणी २३ मे रोजी होणार आहे. म्हणजे ११ एप्रिलला मतदान करणाऱ्यांना तब्बल ३३ दिवस निकालाची वाट पाहावी लागणार आहे. जेव्हापासून या निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हापासूनच तिच्याविषयी अंदाज बांधणे सुरू झाले. विशेषत: वृत्तवाहिन्यांनी शंभर दिवसांपूर्वीपासूनच विशेष कार्यक्रम सुरू केले. आता तर सर्वच माध्यमांनी स्वाभाविकपणेच निवडणूक डोक्यावर घेतली आहे. सर्वात आधी सुरू झाली मित्रांची जुळवाजुळव. रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) एकसंघ राहील का? विरोधकांची एकच आघाडी होईल की अनेक? कोण कुणाबरोबर जाणार? पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण होणार? यासारखे प्रश्न चर्चिले जात होते. आता त्यांची उत्तरे जवळजवळ मिळाली आहेत. मित्रांना दुरावण्याची सर्वाधिक चिंता भाजपबद्दल व्यक्त केली जात होती. प्रत्येक मित्रपक्ष आपापले उपद्रवमूल्य वसूल करण्याच्या प्रयत्नात होता. पण, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या अथक प्रयत्नांनी भाजपने आपले बहुतेक मित्रपक्ष तर कायम ठेवलेच, शिवाय तामिळनाडूत अण्णाद्रमुक हा नवीन मित्र मिळवला. आतापर्यंत भाजप व अण्णाद्रमुक यांच्यात बऱ्यापैकी सहकार्य नांदत होते. पण, यावेळी तो पक्ष अधिकृतपणे रालोआत आला आहे. अकाली दल, उत्तर प्रदेशातील अपना दल, बिहारमधील नितीशकुमारांचा जदयु, रामविलास पासवान यांचा लोजप हे मित्र थोड्या प्रयत्नांनी भाजपसोबत राहिले असले तरी शिवसेनेला सोबत राखताना भाजपनेत्यांच्या संयमाची पुरेपूर कसोटी लागली व विशेष म्हणजे चार वर्षांच्या कटुतेनंतर भाजप-सेना कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाला मात्र फारसा वेळ लागला नाही. आता त्यांचे जागावाटप झाले आहे. मतदारसंघ आणि उमेदवारही निश्चित झाले आहेत आणि अवघी मंडळी प्रचारात भिडली आहे. विरोधकांचे मात्र अपेक्षेप्रमाणे कथित महागठबंधन राष्ट्रीय पातळीवर तरी झालेले नाही. राज्यपातळीवरील मोर्चेबांधणीतही समान सूत्र आढळत नाही. प्रथम बंगळुरु आणि नंतर कोलकाता येथील महामेळाव्यांमध्ये हातात हात घेऊन उंचावणारे दोन पक्ष आज परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अद्याप दिल्ली, पंजाबबाबत निर्णय घेऊ शकलेले नाहीत. काँग्रेस आणि तृणमूल यांचे संबंध एवढे विकोपाला गेले आहेत की, ममतांनी आपल्या पक्षाच्या नावातूनदेखील ‘काँग्रेस’ हे नाव अधिकृतपणे बाहेर फेकले आहे आणि राहुल गांधी यांनी कोलकात्यात त्यांच्यावर केलेल्या टीकेची ‘बाळाची बडबड’ म्हणून उपहासात्मक संभावना केली आहे. उत्तर प्रदेशात बुआ-बबुआने काँग्रेसला वाळीत टाकले आहे तर तिकडे बिहारमध्ये लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्या नाकात दम आणला आहे. त्यात लालूंचे तेजप्रताप नावाचे दुसरे पुत्र तर वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामादेखील दिला आहे. या सगळ्या कल्लोळात डावे पक्ष कुठे हरविले आहेत, हे बहुधा त्यांच्या नेत्यांनाही कळेनासे झाले आहे. महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यात काँग्रेस व मित्रपक्षांची आघाडी बनली आहे, तेथे मतदारसंघवाटप व उमेदवारनिश्चितीवरून ओढाताण सुरू आहे. काँग्रेस पक्ष डावपेचांच्या बाबतीत फार पक्का नाही, पण २०१९ चा संघर्ष हा मूलत: ‘भाजप विरुद्ध काँग्रेस’ किंवा ‘मोदी विरुद्ध राहुल’ असा आहे, असे चित्र निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहे. अर्थात त्यामुळे त्याने तिसऱ्या आघाडीच्या पक्षांमध्ये स्वत:विषयीचा अविश्वास निर्माण करण्याची किंमतही मोजली आहे.

 

जे आज भाजपसोबतही नाहीत किंवा काँग्रेससोबतही नाहीत, अशा पक्षांचेही दोन गट आहेत. एक कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाणारा व दुसरा सर्व पर्याय खुले ठेवणारा. पहिल्या प्रकारात भाकप, माकप, तृणमूल, महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल यांचा समावेश करता येईल. जे कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत. त्यांचा अग्रक्रम काँग्रेस नव्हे, तर तिसरी आघाडी असेल. ती जर झाली नाही तर मायावती आणि अखिलेश यांच्यापैकी मायावती पुरेपूर किंमत वसूल करून भाजपसोबत जाऊ शकतात. म्हणूनच बहुधा त्यांनी सपासोबत जातानाच काँग्रेसला दूर ठेवले. काँग्रेसला ठोकण्याची त्या एकही संधी सोडत नाहीत. भाजप मजबूत झाली तर मायावतींना फरक पडत नाही, पण त्यांच्या भावी राजकारणासाठी काँग्रेस मजबूत न होणे ही त्यांची प्राथमिकता आहे. सपा आज मायावतींसोबत आहे, पण उद्या राहीलच, याची शाश्वती मुलायमसिंहही देऊ शकणार नाहीत. तीच स्थिती शरद पवारांचीही आहे. पण, ‘काँग्रेस नको’ म्हटल्यानंतर त्यांचा अग्रक्रम तिसरी आघाडी हा राहील. पण, वेळप्रसंगी ते भाजपसोबत जाणारच नाहीत, याची शाश्वती ते स्वत:ही देऊ शकणार नाहीत. १९७८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रात जनसंघाच्या लोकांबरोबर पुलोद सरकार बनविले होते. हा इतिहास कदाचित जुना वाटेल, पण २०१४ नंतर काही काळ त्यांनी मोदींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होताच, हे विसरता येणार नाही. डॉ. फारुख अब्दुल्ला हे शरद पवारांचे मित्र आहेत, असे म्हटल्यानंतर ते कुठे जाऊ शकतात वेगळ्याने सांगण्याची गरज पडत नाही. तात्पर्य हेच की, राजकारणात कुणीही कायम शत्रू नसतात आणि कुणीही कायम मित्र नसतात. फक्त हितसंबंध कायम असतात, ही उक्ती सर्व नेत्यांनी घोकून ठेवली आहे. सर्व पर्याय खुले ठेवणाऱ्या पक्षांमध्ये ओडिशातील बिजू जनता दल, तेलंगणातील टीआरएस, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, उत्तर प्रदेशातील अजितसिंहांचे लोकदल यांचा समावेश करता येईल. ज्याची शक्ती जास्त त्याच्याकडे जाण्याचा त्यांचा कल राहील. अर्थात हे सगळे त्रिशंकू लोकसभा तयार झाली तरच; अन्यथा ‘फिर एक बार, मोदी सरकार’ आहेच. रालोआ आणि संपुआ यांचा विचार केला तर जेवढी शक्यता रालोआची आहे, त्याच्या निम्मी शक्यता देखील संपुआची नाही. आतापर्यंत विविध संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्या तेच सूचित करतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास यशस्वी मित्रनीतीच्या बाबतीत रालोआ संपुआ वा तिसरी आघाडी यांच्या कितीतरी पुढे आहे.

 

नंतर प्रश्न येतो मुद्द्यांचा. आपल्याकडच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास इथे नेहमीच मुद्द्यांवर व्यक्ती हावी होतात. मुद्दे, निवडणुकीची घोषणापत्रे तयार केली जातात, त्यांचे समारंभपूर्वक विमोचनही होते पण शेवटी महत्त्वाचे ठरते ते व्यक्तित्व, नेतृत्व. त्याबाबतीत विचार केला तर नरेंद्र मोदी इतर नेत्यांच्या तुलनेत कितीतरी पुढे आहेत व ते विविध जनमत चाचण्यांतून अधोरेखितही होत आहे. राहुल गांधींच्या लोकप्रियतेत पूर्वीपेक्षा वाढ होत असली तरी अजून ते मोदींच्या जवळपासही पोहोचलेले नाहीत. एवढे मात्र खरे की, इतर भाजपविरोधी नेत्यांना त्यांनी बरेच मागे टाकले आहे. एकेकाळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या इतर नेत्यांची नावेही टाकली जात असत, पण आता ते काँग्रेसचे एकमेव नेते बनले आहेत. आपल्याकडे नेत्यांचे नाव हमखास लाटेशी जोडले जाते. पण, या लाटेचे वैशिष्ट्य असे असते की, निकालांनंतरच तिचे नामकरण होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रचंड सभा होत होत्या. १९७१ मध्ये तीच स्थिती इंदिराजींची होती. पण, त्यांच्या नावाने लाटेचे नामकरण मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच होऊ लागले. अर्थात, त्यात प्रचाराचा भागही बराच असतो. अलीकडे म्हटले जाऊ लागले आहे की, ‘२०१४ ची मोदी लाट ओसरत आहे.’ पण तोही प्रचाराचाच एक भाग आहे. मुळात लाट ही काही क्षणात निर्माण होत नाही. मोदीलाटही त्याला अपवाद नाही. २०१४ चा प्रचार सुरू झाला तेव्हा प्रारंभी मोदींनाही प्रतिसाद कमीच मिळाला. पण, नंतर त्यांची जादू अशी विकसित झाली की, तिचे लाटेत किंवा त्सुनामीत वा महात्सुनामीत केव्हा रूपांतर झाले, हे भल्याभल्यांनाही कळले नाही. एवढे मात्र खरे की, आज लाट, त्सुनामी वा महात्सुनामी निर्माण करण्याची मोदींची जेवढी क्षमता आहे, तेवढी कुणाचीच नाही. ती त्यांनी अनेकदा सिद्धही केली आहे. गर्दी राहुलच्या सभांनाही व्हायला लागली आहे. पण, त्यात राहुल या व्यक्तीचे योगदान किती आणि काँग्रेस पक्षाचे योगदान किती याचा विचार करावा लागणार आहे. राहुलमध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी राजकीय चातुर्याच्या बाबतीत मोदींच्या खूप मागे आहेत. शिवाय ते केव्हा चूक करतील याचाही भरवसा देता येत नाही. मोदींच्या बाबतीत तसे नाही. मोदी आपल्या क्षमतेचे श्रेय भाजपला निश्चितच देतील. पण, आज त्यांची स्थिती अशी झाली आहे की, ते स्वत:च्या बळावर गर्दी खेचू शकतात. लाट निर्माण करू शकतात. एखाद्या राजकीय पक्षासाठी ही स्थिती किती उपकारक, हा प्रश्न मात्र वेगळा.

 

मुद्द्यांचा ठोस विचार करतो म्हटले तर यावेळी विरोधी पक्षांजवळ मुद्दाच नाही. ते आपापल्या घोषणापत्राद्वारे अनेक मुद्द्यांचा उल्लेख करतीलच. पण, त्यांनी स्वत:च केवळ ‘मोदी हटाव’ हाच एकमेव मुद्दा निश्चित केला आहे. निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांनी तो केला तर ते समजू शकते, पण ज्याने निवडणुकीतून अधिकृतपणे माघार घेतली आहे, त्या राज ठाकरे यांच्या मनसेनेही तोच मुद्दा बनविला आहे. कथित महागठबंधनाच्या ज्या ज्या वेळी चर्चा झाल्या, तेव्हा ‘आम्हाला मोदींना कोणत्याही स्थितीत हटवायचे आहे. त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत,’ असे म्हणत होते. प्रत्यक्षात काय घडले याचा ऊहापोह वर केला आहेच. त्यांनी ‘मोदी हटाव’ वर एवढा भर दिला आहे की, ‘आम्हाला भाजप चालेल पण मोदी नकोत,’ असा अर्थ त्यातून निघतो. तसे कुणी त्या शब्दांत म्हटले नाही, पण जेव्हा आपल्या सोयीसाठी त्यांनी नितीन गडकरींची प्रशंसा करणे सुरू केले, त्यातून तोच अर्थ निघत होता व त्यांचा ‘मोदी हटाव’ मुद्दा किती तकलादू आहे, हेही सिद्ध होत होते. काँग्रेसने अलीकडेच किमान वेतनाचा मुद्दा समोर करून आपल्या ‘गरिबी हटाव’च्या घोषणेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेसने ती घोषणा एवढी गुळगुळीत करून टाकली आहे की, कुणी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. भाजपवर जुमलेबाजीचा आरोप करताना ती स्वत:च जुमल्यात कशी अडकली, हे बहुधा तिलाही कळले नाही. रालोआने, भाजपने वा मोदींनी मात्र याबाबतीत कुठलीही संदिग्धता ठेवलेली नाही. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या धडाकेबाज कारभाराच्या बळावर लोकांसमोर जाण्याचे तिने ठरविले आहे. शिवाय पुलवामा हल्ल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अग्रस्थानी आणण्याची संधीही तिला मिळाली आहे. परवा उपग्रहभेदक क्षेपणास्त्राची शास्त्रज्ञांनी यशस्वी चाचणी केल्याने त्या मुद्द्याला आणखी बळ मिळाले आहे. संपुआच्या दहा वर्षांतील निष्क्रिय कारभाराची त्याला पार्श्वभूमी लाभली आहे ती वेगळीच. गेल्या पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने लोकहिताचे आणि व्यवस्था परिवर्तनाचे इतके निर्णय घेतले आहेत की, त्यांची मोजदाद करणे कठीण होऊन बसले आहे. हल्ली समाजमाध्यमावर एक पोस्ट फिरत आहे. ‘पाच वर्षांपूर्वी कुणी स्वप्नात तरी पाहिले होते काय?’ असा तिचा प्रश्नार्थक मथळा आहे. मोदी सरकारचे किमान शंभर निर्णय असे आहेत की, त्यांची व त्यांच्या परिणामांची पाच वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल, अशी तिची सोदाहरण मांडणी आहे. एकप्रकारे तो रालोआचा निवडणूक जाहीरनामाच आहे. निवडणुकीत रणनीतीचे इतर सगळे आयाम जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच किंबहुना त्यापेक्षा महत्त्वाचे असते ते तिकीटवाटप. त्याबाबत व प्रचार मोहिमेबाबत पुढील लेखात चर्चा करू या.

 

- ल. त्र्यं. जोशी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@