भारतीय राजकारणातला ‘तेजस्वी सूर्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019   
Total Views |


 

जर तो लोकसभेची निवडणूक जिंकला, तर सर्वात कमी वयात खासदार होण्याचा मान असेल कर्नाटकच्या तेजस्वी सूर्याचा. कर्नाटकसह देशभरात ज्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे, अशा या तेजस्वी सूर्याविषयी...


भाजपतर्फे दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेला आतापर्यंतचा सर्वात युवा नेता तेजस्वी सूर्या नेमका आहे तरी कोण, याची चर्चा संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तेजस्वी हा भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, भाजयुमोचा प्रदेश महासचिव आणि नॅशनल मीडिया टीमचा सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होताच. पण, राजकारणाबरोबरच तेजस्वी सामाजिक कार्यातही तितकाच अग्रेसर आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री दिवंगत एच. एन. अनंतकुमार सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या दक्षिण बंगळुरू मतदार संघातून तेजस्वी यंदा उमेदवार म्हणून उभा आहे. अशा तरुणाच्या उमेदवारीमुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही जिंकण्याचे एक नवे स्फुल्लिंग जागृत झाले आहे. अशा या तेजस्वीला संधी मिळाली ती, त्याच्या राजकारणातील सक्रिय चेहऱ्यामुळे, उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वामुळे आणि जनाधाराच्या बळावरच. कर्नाटकच्या चिकमंगळूर जिल्ह्यात १९९१ साली तेजस्वीचा जन्म झाला. ‘श्रीकुमारम् चिल्ड्रन्स होम्स’ या शाळेतून त्याने शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पदवीतील शिक्षण ‘नॅशनल कॉलेज’ या महाविद्यालयातून पूर्ण केले. बंगळुरूमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज’मधून त्याने वकिलीचे शिक्षण घेतले. कर्नाटक उच्च न्यायालयातून तो वकिलीचीही प्रॅक्टीस करतो. वकील, राजकारणी, रा. स्व. संघाचा स्वयंसेवक अशा अनेकविध भूमिका त्याने निभावल्या आहेत. बासावानगुडी विधासभेचे आमदार एल. ए. रविसुब्रमण्यम यांचा हा पुतण्या. पण, ती मात्र त्याची प्राथमिक ओळख नाही, हे विशेष.

 

अनंतकुमार यांना गुरू मानणाऱ्या तेजस्वीने त्यांच्या मार्गदर्शनात राजकारणात सक्रिय प्रवेश केला. त्यापूर्वी तो रा. स्व. संघात आणि समाजकार्यात सक्रिय होता. समाजकार्याचा वसा हाती घेतल्यावर त्याने ‘अराईझ इंडिया’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. ही एक बिगर राजकीय सामाजिक संस्था असून त्याद्वारे देशभरातील गावा-खेड्यांमध्ये विकासकामांना हातभार लावण्यासाठीचे काम पाहिले जाते. साक्षरता आणि शिक्षणाबद्दल जनजागृतीसाठीही काम करणारी ही सामाजिक संस्था. देशभरातील तरुणांना समाजकार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे कामही संस्था करते. याशिवाय सामाजिक कार्य करत असलेल्या इतरही अनेक विविध संस्थांचा पदभारही तेजस्वीने सांभाळला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर तेजस्वीच्या नेतृत्वकुशल, संघटन कौशल्य आणि वक्तृत्वामुळे अभाविपच्या सचिवपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली. विद्यार्थीदशेपासूनच रा. स्व. संघाशी संबंधित असलेल्या तेजस्वीने मोठमोठ्या पदांपर्यंत मजल मारली आणि आपल्या सामाजिक कार्याचा ठसा राजकीय पटलावरही उमटवण्यात यश मिळवले. आगामी लोकसभा निवडणुकीत त्याला यश मिळल्यास, सर्वात युवा खासदार होण्याचा मान तेजस्वीला मिळेल.

 

तेजस्वीची उमेदवारी घोषित होण्याच्यावेळी झालेल्या नाट्यामुळे या मतदारसंघाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. काँग्रेसचे दिग्गज नेते बी. के. हरिप्रसाद यांच्याशी तेजस्वीची थेट लढत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांची पत्नी तेजस्विनी यांचे तिकीट निश्चित मानले जात होते. मात्र, भाजपकडून तेजस्वीला उमेदवारी घोषित झाली. तेजस्वीला तर याबाबत कल्पनाही नव्हती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आश्चर्य व्यक्त करत आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून त्याने व्यक्त केली. “जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठ्या पक्षाने माझ्यासारख्या २८ वर्षीय तरुणावर विश्वास दाखवला,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत विनम्रपणे त्याने पक्षाचे आभार मानले. आपल्या मतदारसंघात लोकप्रिय असलेला तेजस्वी त्याच्या वक्तृत्वशैलीमुळेही परिचित आहेत. विरोधकांवर आपल्या भाषणांमधून आसूड ओढत त्यांना निरुत्तर करण्याची आक्रमक शैली हे त्याच्या भाषणांचे वैशिष्ट्य. समाजमाध्यमांवरही सध्या तेजस्वीच्या भाषणांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच नेतृत्व आणि कौशल्य गुणांमुळे संघटन कौशल्याचाही दांडगा अनुभव तेजस्वीपाशी आहे. भाजपनेही त्याच्या याच गुणांमुळे विश्वास दाखवत प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून तेजस्वीला उमेदवारी दिली आहे.

 

सामाजिक, राजकीय मंचावर विविध पातळ्यांवर कार्यरत असूनही आपल्या वैयक्तिक आयुष्यातही तेजस्वीने तितकेच वेगळेपण जपले आहे. प्रवासाची आवड असणाऱ्या तेजस्वीचे लंडन, मलेशिया आणि बर्लिन हे पर्यटनासाठीचे आवडते देश. प्रवासासह त्याला वाचनाचीही आवड आहेच. विविध विषयांवर तो स्तंभलेखनही करतो. दक्षिण भारतातील असल्यामुळे इडली-सांबार हा आवडता खाद्यपदार्थ, तर दाक्षिणात्य चित्रपटांसह तेजस्वीला बॉलिवूड चित्रपटांचीही आवड आहे. आजच्या समाजमाध्यमांच्या जमान्यात तेजस्वीला फॉलो करणारा लाखोंचा वर्ग आहे. ‘एक आदर्श युवा नेता’ म्हणून आज कर्नाटकमध्ये तेजस्वीकडे पाहिले जाते. तेजस्वीची वाढती ताकद पाहून विरोधकांनीही त्याच्याविरोधात रान उठवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानेही विरोधकांना तोडीस तोड उत्तर देत आपणही राजकारणात मुरलेले खिलाडी असल्याचे दाखवून दिले. विरोधकांना थोपवण्याचीही कला इतक्या कमी वयात आत्मसात असणारा तेजस्वी सूर्याचे युवा नेतृत्व आगामी काळात राजकारणातील एक नवा चेहरा म्हणून उदयास येईल, हे निश्चित.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@