‘शाखा बंद करणे आहे!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |


 


120 वर्षे जुनी असलेली व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला सध्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, नियमबाह्य कारभार आदींचे रोज नव्याने गंभीर आरोप होत आहेत. एवढ्या मोठ्या आणि जुन्या संस्थेची ही दुरवस्था का झाली, यामागील नेमके गौडबंगाल काय, याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ ने घेतलेला हा मागोवा...

 

संस्था पदाधिकाऱ्यांवरील गैरव्यवहाराचे आणि अनियमिततेचे आरोप, कर्मचाऱ्यांच्या वेतनांचे प्रश्न, जीर्ण मालमत्ता, संस्थेच्या घटना-नियमावलीच्या पायमल्लीचा आरोप इ. सर्व संकटमालिकेचा परिणाम एकूणच संस्थेची दुरवस्था होण्यात आणि त्यातून संस्थेच्या शाखा बंद पडण्यात किंवा वाचकसंख्या खालावण्यात झाली नसती तरच नवल. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेचा विस्तार होत गेला. मुंबई शहर, उपनगरांत शाखा झाल्या. परंतु, आज यातील 11 शाखांचे काम बंद करावे लागले आहे. अपुरा निधी आणि वाचकसंख्येतील घट यामुळे या शाखा बंद झाल्याचे कारण संस्थेतर्फे देण्यात आले आहे.

 

संस्थेच्या एकूण शाखा 38 आहेत आणि सहा स्वायत्त विभाग आहेत. असे असले तरी 38 पैकी प्रत्यक्षात संस्थेच्या स्वतःच्या शाखा केवळ 9 आहेत. उरलेल्या 29 शाखा या मुंबई महानगरपालिकेच्या आहेत. मुंबई महापालिकेने या शाखा संस्थेला चालवायला दिल्या असून त्याबदल्यात संस्थेला पालिकेकडून अनुदान दिले जाते. या पालिकेच्या शाखांपैकी 10 शाखांचे काम आज बंद आहे. दुसरीकडे, संस्थेच्या स्वतःच्या शाखांपैकी कुलाबा शाखेचे कामही बंद पडले आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रत्यक्षात कार्यरत शाखा या केवळ 27 आहेत. पालिकेकडून चालवायला दिलेल्या शाखांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शाखेची वाचकसंख्या कमीत कमी 50 असेल तरच पालिका अनुदान देते. शाखांची घटलेली वाचकसंख्या पाहता आणखी अनेक शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ज्यो. फुले मार्गावरील शाखेचे एकूण सभासद केवळ 2 आहेत तर बोराबाजार शाखेत 13. आग्रीपाडा, डोंगरी, गोखले मार्ग या शाखांनाही अनुक्रमे 24, 29 आणि 30 वाचक आहेत. या सर्व पालिकेच्याच शाखा आहेत. त्यामुळे अशा 50 हून कमी सभासद असलेल्या आणि पालिकेने चालवायला दिलेल्या एकूण 10 आणखी शाखा अखेरच्या घटका मोजत आहेत. या शाखांची ही रोडावलेली अवस्था पुढेही अशीच राहिल्यास दुर्दैवाने आधी बंद पडलेल्या 10 शाखांप्रमाणेच याही शाखा बंद पडू शकतात.

 

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्याच 120 व्या वार्षिक वृत्तांत अहवालात मार्च, 2018 अखेर सभासदसंख्या आणि ग्रंथसंख्या या भागात ही आकडेवारी देण्यात आली आहे. संस्थेच्या स्वतःच्या 9 शाखांमध्येही परिस्थिती फार उत्तम आहे, असे नाही. वांद्रे, चेंबूर, गोराई आणि कांदिवली केंद्र या शाखांची सभासदसंख्या अनुक्रमे 52, 33, 38 आणि 78 इतकी आहे. पालिकेने चालवायला दिलेल्या शाखांच्या बंद पडण्यामागे अनुदानाशिवाय या शाखांचा भार उचलणे शक्य न झाल्याचे कारण देण्यात आले आहे.

 

शरद पवार, सुप्रिया सुळे असतानाही असे का?

 

वास्तविक, शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ आणि दिग्गज राजकीय नेते संस्थेच्या अध्यक्षपदी अनेक वर्षांपासून आहेत. तसेच, त्यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे विश्वस्त आहेत. या दोघांसह अनेक राजकीय नेतेमंडळी संस्थेच्या उपाध्यक्ष, विश्वस्तपदी आहेत. असे असतानाही संस्थेला निधीची कमतरता का भासावी? संस्थेला उत्पन्न म्हणून उपयोगी ठरू शकणारे शारदा चित्रपटगृह बंद का ठेवण्यात आले आहे? पालिकेकडून मिळणारे अनुदान वाढवून घेण्यास अडचण का यावी? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.

 

कोण होतास तू, काय झालास तू...

 

एकेकाळी संस्थेत वाचकांची वर्दळ दृष्ट लागावी अशी होती. संस्थेच्या इतर उपक्रम, कार्यक्रमांना साहित्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद होता. पत्रकार, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थ्यांसाठी ही संस्था म्हणजे संदर्भांची ‘पंढरी’ होती. ती आजही आहे. परंतु, संस्थेचे एकूण चित्र पाहता या सर्वच बाबींना नेमकी कुणाची आणि कशाची दृष्ट लागली आणि संस्थेची अशी दुरवस्था झाली, असाच प्रश्न विचारला जात आहे.

 

वाचकसंख्या रोडावण्यामागे ई-बुक्सच्या संख्येत वाढ झाल्याचेही कारण दिले जाते. वास्तविक, केवळ वाचनालय चालवणे एवढ्यापुरता संस्थेच्या कार्याचा पसारा मर्यादित नाही. संस्थेने चालवलेल्या उपक्रमांबाबत आपण गेल्या भागात आढावा घेतलाच. आता आज या संस्थेत काय सुरू आहे, याचा आढावा घेणेही आवश्यक ठरते. महाराष्ट्राचे साहित्यिक वैभव मानल्या गेलेल्या या संस्थेत आज अनेक शाखा तिळगूळ वाटप, हळदीकुंकू इ. उपक्रमांमध्ये व्यस्त दिसतील! आश्चर्य वाटेल, परंतु हे वास्तव आहे.

 

हळदीकुंकू, तिळगुळात मग्न वाचनालये !

 

फलकावर बोधप्रद सुविचार लिहिणे, मकरसंक्रांतीला तिळगूळ वाटणे, सरस्वती पूजन करणे, सेवकांना मिठाई व पेढे वाटप करणे, महिला सभासदांना भेटवस्तू (वाण) देणे, तिळगूळ-लाडू वाटून सभासदांचे तोंड गोड करणे, हळदीकुंकू समारंभ करणे, वृत्तपत्रातील कात्रणे व सुविचार फलकावर लावणे, ग्रंथालय सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, हे संस्थेच्या कित्येक शाखांचे विशेष उपक्रम म्हणून गणले जातात. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 120 व्या वार्षिक वृत्तांतातच याबाबत उल्लेख आहे. केवळ ठाकूरद्वार, नायगाव, विलेपार्ले, बोरिवली (प.), गोरेगाव (प.), दहिसर इ. मोजक्याच शाखांनी मुलाखती, चर्चा, विविध निबंध-वक्तृत्व स्पर्धा आणि असे साहित्य-संस्कृतीशी निगडित वेगवेगळे उपक्रम राबविल्याची अहवालात नोंद आहे. 120 वर्षे जुन्या आणि वैभवशाली संस्थेची आजची अवस्था ही अशी आहे. आधीच आरोप-प्रत्यारोप, वादांचा उल्हास त्यात हा उपक्रमांचा फाल्गुन मास, त्यामुळे संस्थेच्या वाचकसंख्येला ग्रहण लागले नसते तरच नवल!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@