संजयचा पराजय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |


आपल्या देशातीलकाँग्रेसी राजकारण’ हा आजपर्यंत कित्येकांच्या संशोधनाचा विषय ठरला आहे. त्या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांचा काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर काहीएक परिणाम झालेला नाही, हा भाग वेगळा. एककल्ली, ढिसाळ, बेशिस्त अशा काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे कोणताच सकारात्मक बदल झालेला दिसत नाही, उलट काँग्रेसची अवस्था उतरोत्तर बिघडत गेली. आता मुंबई प्रदेश काँग्रेसचेच बघा ना, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसचा चालकच बदलण्यात आला. वास्तविक गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम पक्षात अक्षरशः एकाकी पडले होते. ‘त्यांना तातडीने बदला,’ अशी मागणी मुंबई काँग्रेसमधील जवळपास प्रत्येक गटाने केली होती. पण ‘थंडा करके खाओ’ या टिपिकल काँग्रेसी पद्धतीनुसारच हा विषय हायकमांडकडून हाताळला गेला. मात्र, आता लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर ठेपल्या असताना अचानक काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी निरुपम यांची उचलबांगडी करून सर्वांनाच धक्का दिला. मात्र, हा धक्का काँग्रेसच्याच अंगलट येण्याचा धोका असून निवडणुकीनंतर, ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी मुंबई काँग्रेसची अवस्था होण्याची शक्यताच जास्त आहे. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवरा, भाई जगताप, प्रिया दत्त, नसीम खान, कृपाशंकर सिंह या सर्वांचीच निरुपम यांना हटविण्याची मागणी होती. देवरा तर म्हणे पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे ठाणच मांडून बसले होते. तसेच, पक्षाचे मुंबई प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनीही निरुपम यांना हटविण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे समजते. दक्षिण भारतीय खर्गेंना ते प्रभारीपदावर आल्यापासूनच निरुपम यांचे टिपिकल उत्तर, बेदरकारपणे वागणे खटकत होतेच. पण, त्यांनाही हे ऑपरेशन आता होईल, याचा अंदाज नव्हता. या सर्वांनी निरुपम यांना या निवडणुकीत उमेदवारीही देऊ नका, अशी मागणी राहुल यांच्याकडे केली होती. यावर राहुल यांनी निरुपमना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बहाल केले. त्यामुळे राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे कोणालाही न दुखवता एक ‘सुवर्णमध्य’ काढला. पण, या निर्णयामुळे ऐन निवडणुकीत पक्षामध्ये गोंधळ माजण्याचा धोका असून त्याचा फटका पक्षाला मुंबईतील पाचही जागांवर बसण्याचा संभव आहे.



काँग्रेसचे काँग्रेसला हरवणे...

 

काँग्रेसला नेहमी काँग्रेसच हरवते,’ असे उपरोधिकपणे म्हटले जाते. मुंबईतही आता त्याचा प्रत्यय येईल, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. या निवडणुकीत त्यातल्या त्यात दक्षिण मुंबईच्या जागेवर काँग्रेसला संधी आहे, असे म्हटले जातेय. परंतु, आता त्या जागेवरील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडेच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदरी आल्याने त्यांनाही आता मुंबईत सर्व ठिकाणी लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचा फटका त्यांना त्यांच्याच प्रचारात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी काँग्रेसला थोडीफार संधी होती, त्या ठिकाणीही काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. त्यात यावेळीही काँग्रेसने बहुतांशी अमराठीच उमेदवारांना संधी दिल्याने काँग्रेसचे असलेले-नसलेले मराठी मतदारही त्यांच्याकडे पाठ फिरवणार, एवढे नक्की. भाई जगताप, डॉ. वर्षा गायकवाड यांच्यासारख्या मुंबईकर मराठी नेत्यांकडे यावेळीही काँग्रेस हायकमांडने दुर्लक्षच केले. नाही म्हणायला आता काश्मिरी, पण मूळच्या मराठी उर्मिला मातोंडकरना पक्षात घेऊन काँग्रेसने ‘बॅलन्स’ साधायचा प्रयत्न केलाय, हा भाग वेगळा. निरुपम यांची कार्यपद्धती काहीशी एककल्ली व हेकेखोर असली तरी ते रस्त्यावर उतरून लढणारे होते. भाजपच्या लाटेत त्यांनीच मुंबईत काँग्रेस जिवंत ठेवली होती. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असणार्या राष्ट्रवादीची मुंबईत अजिबात ताकद नसताना निरुपम यांनी गेल्या चार वर्षांत काँग्रेस किमान चर्चेत तरी ठेवली होती. मुंबई काँग्रेसचे एकेकाळचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांच्याकडे आता अध्यक्षपदाची जबाबदारी आली असली, तरी त्यांना ती कितपत झेपेल, यावरही शंका व्यक्त केली जातेय. कारण, मिलिंद हे रस्त्यावर उतरणारे नेते नसून वातानुकूलित कार्यालयात बसून दरबारी राजकारण करणारे नेते आहेत. तसेही एकेकाळी देशात सर्वत्र काँग्रेस जोरात असताना मुरली देवरा यांना मुंबईत काँग्रेस सशक्त करणे जमले नव्हते. विशेष म्हणजे, असे असतानाही त्यांनी तब्बल 22 वर्षे अध्यक्षपद स्वत:कडे राखले होते. हीच तर काँग्रेसची खरी गंमत असून, हीच किमया मिलिंद देवरा यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमधील या नियुक्तीचा आनंद भाजप-शिवसेनेच्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना झाल्याचे गमतीने म्हटले जाते. देवरांच्या नियुक्तीने पक्षातील ‘एलिट क्लास’ सुखावला असला तरी सामान्य काँग्रेस कार्यकर्ता मात्र अजूनच दूर जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता एका महिन्यातच चांगला निकाल देण्यासाठी देवरा यांना अंग मोडून मेहनत करावी लागणार आहे; अन्यथा त्यांचाच निकाल लागणार, एवढे नक्की.

 
- शाम देऊलकर 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@