मतलबी अश्रू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019
Total Views |



लालकृष्ण अडवाणी यांचे भाजपमधील स्थान ते खासदार आहेत की खासदार नाहीत, यावर अवलंबून नाही. भाजपमधील त्यांचे स्थान वनराजासारखे आहे. ज्याचा कुणी अभिषेक करीत नाही किंवा ज्याचा कुणी डंका पिटत नाही, तो स्वयंभू राजा असतो.

लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना येणार्‍या लोकसभा निवडणुकांचे तिकीट दिले गेले नाही. ते अत्यंत स्वाभाविक होते. अडवाणी ९१ वर्षांचे झाले आहेत आणि मुरली मनोहर जोशी ८५ वर्षांचे. हे निवडणूक लढविण्याचे वय नाही, अगदी सामान्य माणसालाही हे समजते. जे सामान्य माणसाला समजते ते ममता बॅनर्जी, शत्रुघ्न सिन्हा आणि काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना समजत नाही. कारण, ते पडले राजकीय नेते आणि सरळपणे विचार करील तो राजकीय नेता कसला? त्याने सदैव वाकड्यातच गेले पाहिजे.

यातील सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की, आज जे अडवाणींसंबंधी खूप दुःखी झाले आहेत आणि अश्रू गाळत आहेत, त्याच सर्वांनी १९९०च्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांना जबरदस्त शिव्या घातलेल्या आहेत. सप्टेंबर १९९० ला लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. रथयात्रेचा विषय होता-अयोध्येतील राम जन्मस्थानावर रामाचे भव्य मंदिर बांधण्याचा. ही यात्रा निघाली आणि सगळ्या काँग्रेसी नेत्यांची, कम्युनिस्ट नेत्यांची, सेक्युलॅरिस्टांची, शिव्यांची गटार यात्रा निघाली. ‘ही यात्रा देशाचे दुसर्‍यांदा विभाजन घडवून आणेल, ही सांप्रदायिक यात्रा आहे, मुसलमानांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करील, ही यात्रा सेक्युलॅरिझमच्या विरोधी आहे, धार्मिक विषयावर राजकारण करता येत नाही, म्हणून भाजपची मान्यता काढून घ्या, अडवाणी फॅसिस्ट आहेत, हिटलरचे अवतार आहेत, देशाच्या सर्वसमावेशक संस्कृतीला अडवाणी धोका आहेत.’ ही काही वाक्ये नमुन्यासाठी दिली आहेत. ही वाक्ये बोलणारे काँग्रेस पक्षातील आहेत, डाव्या पक्षातील आहेत, आणि तथाकथित सेक्युलर विचारवंत आहेत; त्यांना आज अडवाणींना तिकीट मिळाले नाही म्हणून खूपच वाईट वाटले आहे, याला म्हणतात ‘मगरीचे अश्रू.’

लालकृष्ण अडवाणी यांचे भाजपमधील स्थान ते खासदार आहेत की खासदार नाहीत, यावर अवलंबून नाही. भाजपमधील त्यांचे स्थान वनराजासारखे आहे. ज्याचा कुणी अभिषेक करीत नाही किंवा ज्याचा कुणी डंका पिटत नाही, तो स्वयंभू राजा असतो. अडवाणी उणे भाजप, बेरीज येते दोन. हे दोन म्हणजे १९८४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे फक्त दोन खासदार होते. भाजप संपला, असे सर्वांनी ठरवून टाकले. १९९० साली अडवाणीजींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली आणि १९९६ साली भाजप सत्तेवर आली. पुन्हा १९९८ साली भाजप सत्तेवर आली आणि २०१४ मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आली. दोन ते सत्ता म्हणजे लालकृष्ण अडवाणी. इतके त्यांचे कर्तृत्व अफाट आहे, कधीही न पुसले जाणारे आणि कुणालाही न पुसता येणारे.

जे स्थान काँग्रेस पक्षात पं. जवाहरलाल नेहरूंना आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांना आहे, ते स्थान लालकृष्ण अडवाणी यांचे भाजपमध्ये आहे. अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेने भारताच्या राजनीतीचा चेहरामोहराच बदलून टाकला. बेगडी सेक्युलॅरिझम धाराशयी झाला. हिंदू विरोधाच्या राजकारणाला जबरदस्त चाप बसला. किंबहुना,‘जो हिंदूहित की बात करेगा, वह देशपर राज करेगा।’ हे समीकरण झाले. नरेंद्र मोदी २०१४ साली प्रचंड बहुमताने विजयी झाले (म्हणजे भाजप विजयी झाला.) याचे कारण हिंदू समाजाने एकमुखाने भाजपला आपले प्रतिनिधी केले. याचे परिणाम सेक्युलॅरिझमचा डंका पिटणार्‍या काँग्रेसवर झाला. राहुल गांधींना मंदिरांच्या यात्रा कराव्या लागल्या. मी जानवेधारी ब्राह्मण आहे, असे आपल्या पोपटांकरवी त्यांना सांगावे लागले. पारशाचा नातू ब्राह्मण कसा? असा प्रश्न आपण विचारायचा नसतो. रॉबर्ट वढेराची पत्नी प्रियांका चर्चमध्ये जायचे सोडून गंगायात्रा करायला निघाली आहे. वेगवेगळ्या मंदिरांना त्या भेटी देत आहेत. गळ्यात हार घालून घेत आहेत, देवीला हार घालीत आहेत, गंगास्नान करीत आहेत. कुठे गेला सेक्युलॅरिझम? ९० सालच्या अडवाणींच्या यात्रेने निर्माण केलेले हे त्सुनामी धक्के आहेत. इतकी ही यात्रा ऐतिहासिक परिणाम करणारी झालेली आहे.

रणदीप सुरजेवाला काँग्रेसचे प्रवक्ते आहेत तरी त्यांना काँग्रेसचा इतिहास माहीत नाही. काँग्रेसमधील ज्येष्ठांना नेहरू-गांधी घराण्याने कसे कस्पटासमान वागविले, याचे अनंत किस्से आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांचे कर्तृत्त्व नेहरूंपेक्षा कमी नव्हते. ते नसते तर सगळ्या संस्थानांचे विलीनीकरण भारतात झाले नसते. काश्मीरचा प्रश्न नेहरूंनी हातात घेतला आणि कशी भळभळती जखम निर्माण करून ठेवलेली आहे, हे आपण रोज पाहतो. सरदार पटेलांनी निजामाचा माज काही दिवसांत उतरवला. त्या सरदार पटेलांचे भव्य स्मारक नरेंद्रभाई मोदी यांना उभे करावे लागले. नाही तर देशात कुठेही जा, नेहरू, इंदिरा आणि राजीव, याशिवाय तिसरे नाव नाही. नरसिंहराव पंतप्रधान होते, नंतर वार्धक्याने त्यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांचे दहन यमुनाकाठी होऊ नये, असा आदेश सोनिया गांधींनी दिला. यमुना काठ नेहरू-गांधी घराण्यासाठी राखीव आहे. हा सर्व किस्सा आपण संजय बारू यांच्या ‘द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकात वाचू शकतो किंवा याच नावाच्या चित्रपटातदेखील पाहू शकतो. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याला, जो एकेकाळी पंतप्रधान होता, बहुभाषाविद होता, कुशल राजनितीज्ञ होता, त्याला अशी हीन वागणूक देणे, ही काँग्रेसची परंपरा आहे. लालकृष्ण अडवाणी किंवा नुकतेच दिवंगत झालेले अटल बिहारी यांच्या काही कृतीबद्दल, मतांबद्दल, विचारधारेतील लोकांचेही मतभेद झाले, पण मनभेद कधी झाले नाहीत. त्यांचे मोठेपण कमी होईल, अशी हीन कृती कुणीही कधीही केली नाही.

सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तेव्हा पंतप्रधान होते, देवेगौडा. देवेगौडांविषयी सीताराम केसरी म्हणाले,“हा निकम्मा पंतप्रधान आहे.” असे म्हणून त्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला. पुढे काँग्रेसच्या एका बैठकीत दोन ओळींचा ठराव आणून त्यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. अपमानकारकरित्या दूर करण्यात आले. हा धक्का सहन न होऊन सीताराम केसरी रामवासी झाले. ही आहे, काँग्रेसची परंपरा. म्हणतात ना, काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍याच्या घरावर दगड मारू नयेत. ममता आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी, एवढी पात्रता त्यांची आहे, असे मला वाटत नाही. शत्रुघ्न सिन्हा सिनेनट. दुसर्‍याने लिहिलेले संवाद साभिनय सादर करणे, हे नटाचे काम. नट जेव्हा राजकारणातही नटबाजी करतो, तेव्हा त्याचे नाव होते शत्रुघ्न सिन्हा. ममता केव्हा, कुठे, काय बोलतील, हे बोलेपर्यंत कदाचित त्यांनाही समजत नसावे. तेव्हा त्यावर काही न लिहिणेच चांगले.

अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आता लोकसभेत दिसणार नाहीत. देशसेवा करण्याचे लोकसभा हेच एक माध्यम आहे, असे ते दोघेही मानत नाहीत. भाजपमधील त्यांचे स्थान, खास त्यांचेच म्हणून राहणार आहे. त्यांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. भाजपसारखा राजकीय पक्ष, जो एका विचारधारेवर चालतो, त्याने नेहमीच काळाबरोबर राहायला पाहिजे आणि काळाबरोबर राहायचे तर त्या काळाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या पिढीला पक्षात प्रतिनिधीत्व द्यावे लागते. समाज नेहमी गतिमान असतो. वीस वर्षांनंतर एक पिढी बदलते. नवी पिढी वेगळा विचार करणारी असते. मागच्या पिढीने जे धन दिले आहे, त्यात आपण अधिक भर घातली पाहिजे आणि ती आपल्या पद्धतीने घातली पाहिजे, असे तिला वाटते. म्हणून नव्या पिढीला स्वातंत्र्य द्यावे लागते, वाट मोकळी करून द्यावी लागते. निसर्गाचादेखील हाच नियम आहे की, वर्षातून एकदा झाडांची पानगळ होते. जुनी पाने जातात आणि नवीन पाने येतात. ज्या संस्थेला प्रदीर्घ काळ समाजात राहायचे आहे, तिला या निसर्गनियमानेच चालावे लागते. संघासारख्या संघटनेतदेखील बाळासाहेब देवरस निवृत्त होतात, रज्जूभय्या निवृत्त होतात आणि सुदर्शनजीदेखील निवृत्त होतात. संघ विचारधारेतून निघालेल्या भाजपलादेखील याच मार्गाने जायचे आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@