ऐतिहासिक; भारत बनला अंतरिक्ष महाशक्ती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |


 
 

नवी दिल्ली : भारताने आज अंतराळ इतिहासात ऐतिहासिक झेप घेतली आहे. अंतराळाशी संबंधित असलेली मिशन शक्ती ही मोहीम भारतीय शास्त्रज्ञांनी यशस्वी पार पाडली. क्षेपणास्त्राद्वारे अंतराळातील एक उपग्रह पाडण्यात डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. अवघ्या तीन मिनिटांत शास्त्रज्ञांनी लो अर्थ ऑर्बिटमध्ये ३०० किलोमीटर उंचीवरील उपग्रह यशस्वीरीत्या पाडला. ए-सॅट क्षेपणास्त्राने ही कामगिरी फत्ते केली, अशी कामगिरी करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीन नंतर चौथा देश ठरला आहे. याबातची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना दिली.

 

अवघ्या ३ मिनिटांच मोहीम फत्ते

 

पंतप्रधान मोदींनी मिशन शक्ती मोहिमेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, लो अर्थ ऑर्बिटमधील ३०० किमी अंतरावर असलेला उपग्रह अवघ्या तीन मिनिटात पाडून मोहीम फत्ते करण्यात आली.

 

भारताकडे अतरिक्ष युद्धाची क्षमता

 

मिशन शक्ती हे भारताकडे अंतरिक्ष युद्धाची ताकद असल्याचा पुरावा आहे. भारताने ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नसून देशाच्या सुरक्षेसाठी ही कामगिरी केल्याचे मोदींनी सांगितले. भारत हा शांतताप्रिय देश असून आम्हाला जगात शांतात ठेवायची असल्याचेही ते म्हणाले.

 

शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान

 

मिशन शक्ती ही मोहीम फत्ते करण्यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी महत्वाची कामगिरी बजावली. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मिशन शक्ती यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच या शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मिशन शक्तीसाठी वापरलेले संपूर्ण तंत्रज्ञान हे भारतीय बनावटीचे आहे.

 

लो अर्थ ऑर्बीटच टार्गेट का?

 

मिशन शक्ती मोहिमेअंतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राद्वारे लो अर्थ ऑर्बीट म्हणजे एलईओ उपग्रह पाडण्यात यश मिळवले आहे. एलईओ या प्रकराचे हे उपग्रह हेरगिरीसाठी वापरले जातात. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनला हा अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे समजते.

 

खरोखरच मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी आहे. यामागे शास्त्रज्ञांचे यश असले तरी, याला युद्धजन्य परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. हे क्षेपणास्त्र युद्धात वापरता येणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान व प्रामुख्याने चीनला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. पाकिस्तान आणि भारतमध्ये होणाऱ्या संघर्षात चीन पाकिस्तानच्या पाठीशी उभा असतो. अशावेळी जर युद्धजन्य परस्थिती उद्भवली तर एलओसीवर लक्ष ठेवणाऱ्या चीन व पाकिस्तानच्या सॅटेलाईट भारत नष्ट करू शकतो. डीआरडीओच्या संशोधकांनी केलेली कामगिरी अतिशय महत्वाची आहे. युपीए सरकारच्या काळात डीआरडीओला चालना मिळत नव्हती, मात्र स्व. मनोहर पर्रीकर हे ज्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री होते तेव्हापासून डीआरडीओला चालना मिळायला लागली. मागील काही दिवसांपासूनचे परिणाम आपण पाहतच आहोत.

- स्वाती कुलकर्णी

अभ्यासक
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@