नक्की कोणाशी लढायचे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |



क्षेपणास्त्राने अत्यंत गुप्त पद्धतीने किमान वेळात ३०० किमी अंतरावर असलेले लक्ष्य भारतीय तंत्रज्ञानाने उद्ध्वस्त करता येऊ शकते, ही भारतद्वेष्ट्यांसाठी चिंता वाढविणारी गोष्ट आहे.
 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही भारताने अणुचाचण्या केल्या. त्यानंतर जो गदारोळ केला गेला, त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या प्रकारचा आणि गंभीर गदारोळ सध्या पाहायला मिळतो आहे. म्हणूनच, देशाबाबतच्या भावनांचे प्रतीक ठरावे अशा वाजपेयींच्याच एका वाक्याचे स्मरण करणे आवश्यक वाटते. लोकसभेत त्यांनी हे उद्गार काढले होते. ते म्हणाले होते की, “सरकारं येतील आणि जातील, निवडणुकांत जय-परायज होत राहतील. मात्र, हा देश टिकून राहिला पाहिजे.आपल्या हयातीत अनेक निवडणुका लढून, हरून, जिंकून व तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषविणार्या वाजपेयींच्या न्रमपणाचे व त्यांच्यातल्या उत्कट राष्ट्रभक्तीचे हे प्रतीक आहे. हे सारे पुन्हा आठविण्याचे कारण म्हणजे, काल सकाळी पंतप्रधान मोदींनी मिशन शक्तीचे रहस्योत्घाटन केल्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया. क्षेपणास्त्राच्या साहय्याने ३०० किमी अंतरावर अंतरिक्षात असलेला आपलाच एक उपग्रह भारताने उद्ध्वस्त केला.

 

पंतप्रधानांनी यासाठी डीआरडीओ आणि त्यांच्या टिमचे तोंडभरून कौतुकही केले. हे घडते न घडते तोपर्यंत जे सुरू झाले आहे, त्यात राष्ट्रम्हणून आपण दोन पावले पुढे गेलो की, एका विशिष्ट राजकीय विरोधापायी आपण जी राष्ट्रीय कामगिरी साजरी केली गेली पाहिजे, त्यातही राजकारण करणार आहोत. एक मोठा दुटप्पी वर्ग आज देशभरात निर्माण झाला आहे, जो कोणत्याही प्रकारच्या राजकीय यशाचे श्रेय मोदींना द्यायला तयार नाही. विचारवंतांच्या म्हणून म्हणविल्या जाणार्या संस्था, माध्यमे, लेखकवृंद यात तो ठासून भरलेला आहे. कोणाची अशी मते असायला हरकत नाही. मात्र, अशी मते जेव्हा अत्यंत अविचारीपणे चुकीच्या व्यासपीठावर आणि चुकीच्या पद्धतीने मांडली जातात, तेव्हा मात्र त्याचा विचार वेगळ्या प्रकारेच केला गेला पाहिजे. मिशन शक्तीयशस्वी झाल्यानंतर त्याचे श्रेय पंतप्रधानांनी का घेतले, हे यश तर डीआरडीओचे होते, असा कांगावा सुरू झाला. जर हे मिशन फसले असते, हा उपग्रह पाडण्यात काही चूक झाली असती तर? अशा प्रकारच्या काही योजना आपल्याकडे फसल्याचीही उदाहरणे आहेत. प्रयोगाच्या क्षेत्रात अशा घटना घडतच असतात. त्यात यशापयश सुरूच असते आणि म्हणूनच त्याला प्रयोगअसे संबोधले जाते. वस्तुत: असे प्रयोग डीआरडीओसारख्या संस्थांमध्ये सुरूच असतात. मात्र, त्यामागे ठामपणे उभे राहायचे की नाही, याचा निर्णय सरकारलाच घ्यावा लागतो. कुठलाही राजकारणी आपल्या निवडणुकीच्या वर्षात असे प्रयोग करीत नाही.

 

कारण, प्रयोग फसला, तर त्याचे राजकीय खापर त्याच्यावरच फुटण्याची शक्यता मोठी असते. मोदींनी ही जोखीम घेतली आणि ती घेणे गरजेचेही होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे, पुलवामानंतर निर्माण झालेली स्थिती. पाकच्या कुरापती, त्या जागतिक व्यासपीठावर मांडण्याची आणि सहानुभूती मिळविण्याची त्यांची हातोटी कधी नव्हे ती पाकवरच उलटली. त्यानंतरचे कवित्व आजही सुरूच आहे. मात्र, ‘राष्ट्रम्हणून आपला कणखरपणा यावेळी जगासमोर आला. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जगाच्या पाठीवर आपण आपली मान उंच राखली.

 

परराष्ट्र धोरणहा मुळातच डावपेचांचा खेळ आणि तो स्वत:चेच मानसिक स्वास्थ कायम राखून खेळावा लागतो. न बोलता, काही वेगळेच वागून काही संदेश द्यावे लागतात. निवडणूक, पक्षीय राजकारण यापलीकडे जाऊन याचा विचार करावा लागतो. अणुसंपदा किंवा अंतरिक्षात सोडले जाणारे उपग्रह हे कशासाठी सोडले जातात, याची पुरेपूर कल्पना सगळ्यांनाच असते. अणुऊर्जेचावापर हा प्रामुख्याने ऊर्जेसाठी केला जात असला तरी, तो पाकिस्तानसारख्या घातकी राष्ट्रांमध्ये शस्त्र म्हणूनच पाहिला जातो. भारतासारख्या शांतिप्रिय देशात अणुऊर्जेचा वापर कृषी, वैद्यकीय, रडारप्रणाली या आणि अशा कितीतरी क्षेत्रात केला जातो. विज्ञान शाप की वरदानहा शालेय जीवनात येणारा निबंधाचा विषय. जो कोणी त्याचा वापर जसा करेल, तसा त्याचा वापर होऊ शकतो हे त्याचे साधे उत्तर. उपग्रह व त्यांचे वापर आपल्या देशात हवामानाचे बदल नोंदविण्यासाठी केले जातात. मात्र, अनेक राष्ट्रे याच उपग्रहाचा वापर हेरगिरीसाठी करतात. भारत हे करीत नाही असे मुळीच नाही. मात्र, उपयुक्त वाटत असलेल्या सगळ्याच गोष्टी आधी म्हटल्याप्रमाणे घातकही ठरूच शकतात.

 

मुद्दा एवढाच असतो की, त्या वापरतं कोण? परदेशनीतीमध्ये चर्चा-वाद या सगळ्या गोष्टी मौखिक किंवा लिखित स्वरूपात होत असल्या तरी, त्याच्या मागे बळ हे मिशन शक्तीसारख्या घटनेत असतं. आपण जसे असतो तसेच आपल्याला जग दिसते. त्यामुळे आजच्या क्षेपणास्त्राने उपग्रह पाडण्याच्या घटनेकडे अनेक देश अनेक अंगांनी पाहतील. क्षेपणास्त्राने अत्यंत गुप्त पद्धतीने किमान वेळात ३०० किमी अंतरावर असलेले लक्ष्य भारतीय तंत्रज्ञानाने उद्ध्वस्त करता येऊ शकते, ही भारतद्वेष्ट्यांसाठी निश्चितच चिंता वाढविणारी गोष्ट आहे. पुलवामाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शांततेच्या नावाखाली दादागिरी करणार्याह कुठल्याही देशाला या घटनेची चुणूक लागली असती तरी, हा पाकवरील हल्ल्याचा कट वगैरे गवगवा लगेचच सुरू झाला असता. आता मुद्दा असा की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ही सगळी जोखीम उचलली आणि चाचण्या यशस्वीदेखील केल्या. जिथे तुमची क्षेपणास्त्रे सुरू होतात, तिथे निरनिराळ्या हेरांचे कामदेखील सुरू होते. या सगळ्यांना चकवा देत हे मिशन पार पडले आहे. आता यात आनंद साजरा करायचा की मोदींनी आचारसंहिता पाळली की पाळली नाही, यावर काथ्याकुट करायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न. एका बाजूला राष्ट्र आहे आणि त्याची वाटचाल आहे. डीआरडीओने युपीएच्या काळात या चाचण्यांसाठी परवानगी मागितली होती का? असेल तर ती का दिली गेली नाही? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे मागितली तर ते राजकारणच ठरेल. हिंदुस्थानच्या पंतप्रधानाला किती आघाड्यांवर लढायचे आहे, याचाही अंदाज आजच्या चाचणीमुळे आला असे म्हणायला म्हणूनच वाव आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@