‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’तील बेकायदा निवडणुका - चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |

 

मुंबई : १२० वर्षांची परंपरा असलेल्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’तील कारभार आणि अन्य कामांत अनियमितता तसेच सावळा गोंधळ असल्याचा आरोप गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे. परिणामी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या विविध कलमांचे उल्लंघन करत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास संस्थान बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील बेकायदा निवडणुका आणि आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच आदेश दिले आहेत.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आणि धनंजय शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबत एक निवेदन सादर केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत उच्च व तंत्र शिक्षण खात्यास तपासणी करत तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या निवेदनात ज्या विविध बाबींचा ऊहापोह केला आहे, त्यात स्पष्ट केले आहे की, “मराठी ग्रंथसंग्रहालयाला स्वतःची एक ’घटना-नियमावली’ आहे. संस्थेचा एकूण कारभार हा ’घटना-नियम’ यांच्यातील त्रुटींचा गैरफायदा घेऊन केला जात असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत,” असे म्हटले आहे.

 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “संस्थेच्या तीन ’घटना-नियमावली’ सादर केल्या जात असल्या तरी १९८४ ची घटना मान्यताप्राप्त आहे. १९८९ ची घटना सोयीप्रमाणे दाखवली जाते आणि सध्या २०१३ ची ’घटना-नियमावली’ दाखविली जाते. ज्यास धर्मादाय आयुक्तांसमक्ष आव्हान दिले गेले असले तरी धर्मादाय आयुक्तांनी या प्रश्नांत लक्ष घालण्यात अक्षम्य दिरंगाई केली आहे, कारण ज्या चेंज रिपोर्टला आव्हान दिले असतानाही २०१६ मध्ये बेकायदेशीर निवडणुका घेत अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. निवडणूक अर्ज न भरताही एका संस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. उपाध्यक्षपदांचीसुद्धा निवडणूक घेण्यात आली नाही आणि त्यानंतर अध्यक्षाच्या सूचनेनुसार विद्यमान विश्वस्तांनी नेमणुका घटनाबाह्य ठरवल्या आहेत.

 

‘मुंबई तरुण भारत’ने केला पाठपुरावा

दै. ‘मुंबई तरुण भारत’ या एकूणच विषयांवर गेल्या तीन दिवसांपासून ‘वादाच्या भोवर्‍यात साहित्याची पंढरी’ ही वृत्तमालिका प्रकाशित करत आहे. तसेच याआधी दि. ८ फेब्रुवारी रोजी शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! हे वृत्तही प्रकाशित केले होते.


बिंग फुटेल

दादरसारख्या विभागात प्रॉपर्टीची किंमत गगनाला भिडलेली असताना आज मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील भाडेकरू हे विश्वस्त मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे तुपाशी आहेत आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची परिस्थिती उपाशीपोटी जीर्ण होत चालली आहे. या सर्व व्यवहाराची चौकशी झाल्यास दोषी विश्वस्त, कार्यवाहक आणि अन्य मंडळींचे बिंग फुटेल.

- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@