भूरिश्रवा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |



कुरुकुलातील भूरिश्रवा, वृष्णी घराण्याचा. श्रीकृष्ण व पांडव यांचे वैर कसे होते ते पाहूया. श्रीकृष्णाचा पिता वसुदेव. वसुदेवाचा पिता सूर. याला सिनी नावाचा चुलतभाऊ होता. कंसाची बहीण देवकी. हिचे जेव्हा स्वयंवर मांडले गेले, तेव्हा सिनी त्या स्वयंवराला गेला आणि वसुदेवाशी तिचा विवाह करण्यासाठी तो देवकीला पळवून घेऊन आला. पण, त्याचे हे धाडस कुरु घराण्याचा राजा सोमदत्त याला आवडले नाही. सोमदत्त हा पराक्रमी राजा व भूरिश्रवाचा पिता होता. सोमदत्ताने सिनीला युद्धाचे आव्हान केले. सिनीने त्याचा पराभव केल्यानंतर तो सोमदत्ताच्या छातीवर पाय ठेवून उभा राहिला. त्यावेळी सोमदत्त सिनीला शाप देत म्हणाला, “एक दिवस माझा मुलगा तुझ्या वंशजाच्या छातीवर असाच पाय ठेवून उभा राहील!” आता सिनीचा नातू सात्यकी हा भूरिश्रवासमोर युद्धासाठी आला, तेव्हा भूरिश्रवास ते सर्व आठवले. तो सात्यकीला म्हणाला, “तुला युद्धात हरविण्याची माझी कितीतरी दिवसांची इच्छा होती. ती आता पूर्ण होणार आहे. तुझे आजोबा सिनी यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला होता. त्याचा सूड मी आता घेईन.”

भूरिश्रवा आणि सात्यकी यांच्यात तुंबळ युद्ध झाले. दोघांनी एकमेकांचे घोडे मारले. ते दोघेही आता भूमीवर उभे राहून लढत होते. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे सर्व पाहात होते. सात्यकी हा अर्जुनाचा आवडता शिष्य. तो कृष्णाला म्हणाला, “सात्यकी खूप थकलेला दिसतो, त्याला युधिष्ठिरासोबत राहा, असे मी बजावले असताना तो इकडे कसा काय आला? हे काही चांगले नाही.” यावर कृष्ण म्हणाला, “याचा अर्थ तुला समजत नाहीय अर्जुन. युधिष्ठिराला नक्की असे वाटले असणार की तू मोठ्या संकटात सापडला आहेस म्हणून त्याने सात्यकीला तुझ्या मदतीसाठी पाठवले.” पण, हा भूरिश्रवा आता त्याला डोईजड होतो आहे. हे दोन्ही योद्धे काही समतोल नाहीत! इतक्यात भूरिश्रवाने सात्यकीस बेशुद्ध केले. भूरिश्रवाने सात्यकीचे डोके हाती धरून त्याच्या छातीवरती पाय ठेवला, त्याचे हे अन्यायी कृत्य पाहून सात्यकीचे सर्व सैन्य घोषणा देऊ लागले. कृष्णाने अर्जुनाला छेडले, “बघ हा भूरिश्रवा तुझ्या शिष्याचा आता वध करेल. तो बेशुद्ध पडला आहे आणि त्याच्यावरती असा हल्ला करणे चुकीचे आहे, असे मला वाटते.”

 

अर्जुन म्हणाला, “मला वाटते की, तो त्याच्या छातीवरती पाय देऊन फक्त आपल्या पित्याची प्रतिज्ञा पूर्ण करेल, पण त्याला मारणार नाही.” पण, भूरिश्रवाने इतक्यात त्याची तलवार उंच उगारली व तो सात्यकीवर अंतिम घाव घालणार होता. हे पाहून अर्जुनाने भूरिश्रवावर एक तीक्ष्ण बाण सोडला. त्या बाणाने भूरिश्रवाचा उजवा हात तुटला आणि तो हात भूमीवर पडला. भुरिश्रवा अर्जुनावर खवळला आणि ओरडून म्हणाला, “अर्जुना, तू हे योग्य केले नाहीस, तुला शरम वाटावी असे हे तुझे कृत्य आहे. दोन योद्ध्यांच्या मध्ये ज्याची हल्ल्यास तोंड द्यायची तयारी नाही, त्याच्यावर तू बाण सोडलास, आता तू युधिष्ठिरास काय तोंड दाखवणार? हे धर्माला धरून नाही, सर्व घराण्याला काळिमा आणणारे हे कृत्य आहे. मला तर वाटते की, तू हे असले कृत्य तुझ्या मनाने केलेले नसून तुझ्या त्या सारथ्याच्या मतानुसार केले आहेस. वृष्णी घराण्याचा माणूसच अशा खालच्या पातळीवर उतरेल. कृष्णाची अशी नालस्ती ऐकून अर्जुन खूप संतापला आणि म्हणाला, “भूरिश्रवा, कृष्णाविषयी असे वाईट बोलू नकोस. मला ठाऊक आहे तू त्याचा द्वेष करतोस. तू आणि सात्यकी यांच्यामध्ये मी येणारच नव्हतो, पण तू तर माझ्या या मित्राला, शिष्याला ठारच मारायला निघालास. त्याने माझ्याकरिता खूप काही केलंय. मग असे शांत बसून त्याचा वध होत असलेला मी कसा पाहू? ते पण तो बेशुद्ध असताना ? त्याच्यात तुझ्याशी लढायची ताकद नसताना? खरंतर मी तुझा शिरच्छेद करू शकत होतो आणि तू मला धर्म शिकवतोस ? माझा पुत्र अभिमन्यू जेव्हा रथहीन, शस्त्रहीन, काहीच संरक्षण नसलेला होता आणि त्या कौरव योद्ध्यांनी निर्दयीपणे त्याला मारला तेव्हा तू फक्त पाहात राहिलास. त्यावेळी कुठे होता तुझा धर्म? तेव्हा तू तुझ्या पुतण्यांना का नाही आवरले? का नाही धर्म शिकवला? आणि आत्ता पुन्हा त्याच अन्यायी मार्गाने या माझ्या मित्राचा वध होत असलेला मी पाहत बसू? मला तरी वाटत नाही की मी काही चूक वा अधर्माची गोष्ट केली. जो माझ्यासाठी लढला त्याचे मी रक्षण केले इतकेच.”

 

सर्व जण चिडीचूप ऐकत होते, भूरिश्रवाची ही अवस्था पाहून मात्र अर्जुनाला त्याची दया आली. तो म्हणाला, “मी क्षत्रिय असल्यामुळे मला हे करणे भाग पडले, पण तुझ्या या स्थितीला तो दुर्योधनच कारणीभूत आहे, हे मी जाणतो.” अर्जुनाचे हे बोलणे ऐकून भूरिश्रवाने दुसरा हात उंचावून त्याला मानवंदना दिली आणि त्याने कुश गवत भूमीवर पसरवून योगमार्गाने देह ठेवण्याची तयारी सुरू केली. सारे श्वास रोखून त्याच्याकडे पाहात असतानाच सात्यकीस जाग आली, उडी मारून तो उभा राहिला आणि आपली तलवार घेऊन भूरिश्रवाच्या अंगावर धावून आला. कृष्ण व अर्जुन यांनी त्याला आवरण्याचा यत्न केला. पण त्यांना न जुमानता सात्यकीने भूरिश्रवाचा शिरच्छेद केला. खरंतर भूरिश्रवाने जगण्याची इच्छा सोडली होती, तो नि:शस्त्र होता, त्याचा एक हात तुटलेला होता, तरीही सात्यकीच्या हातून हे पातक झाले. आजवर निर्दोष आयुष्य जगलेल्या सात्यकीसाठी ही खूप दुर्दैवाची बाब होती!

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@