तत्त्वशून्य राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019   
Total Views |


निवडणुकीच्या आखाड्यात सत्ता-समीकरणे बांधण्यासाठी उमेदवारांची मोट बांधण्याचे कार्य लोकशाहीच्या या उत्सवादरम्यान सर्वच राजकीय पक्ष करत असतात. मात्र, त्यात नैतिकतेचे आणि तत्त्वनिष्ठतेचे अधिष्ठान असावे अशी माफक अपेक्षा ही भारतीय मतदारांची असते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदार संघात ‘तत्त्वहीन’ राजकारणाचा अंक नाशिककर नागरिकांना पाहावयास मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ‘महाराष्ट्र सदन’ घोटाळ्यातील आरोपी आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले समीर भुजबळ यांना पक्षाने आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राजकीय क्षेत्र हे पावन असावे, निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा निष्कलंक असावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो कर्तृत्ववान असावा, हीच अपेक्षा मतदारांची आपल्या प्रतिनिधीकडून असते. या कोणत्या निकषात समीरभाऊ बसतात, हाच मोठा प्रश्न आहे. ते बाहुबली नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. हेच त्यांचे एक मोठे कर्तृत्व, जे त्यांना जन्मत: प्राप्त झाले आहे. बाकी २००९ ते २०१४ या पाच वर्षांत नाशिक मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्य करताना त्यांनी भरीव आणि थेट केवळ जनतेलाच (त्यांच्या स्वतःला नाही) फायदा होईल असे कोणते कार्य केले असल्याचे दिसून येत नाही आणि जे जे म्हणून कार्य केले, ते एकतर रखडले किंवा त्यात घोटाळा झाल्याचे नंतर उघडकीस आले. तरीही, केवळ प्रतिमा संवर्धन करण्यासाठी समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तत्त्वनिष्ठता असावी आणि इतरांचे जीवन फुलविण्याचे कार्य होत असलेल्या राजकीय क्षेत्रात, तर ती असावीच असावी ही माफक जाणीव पक्षाला ठेवता आली नाही का? नाशिक शहरात अनेक उमेदवार असताना जामीनप्राप्त उमेदवारच का, हा प्रश्न नाशिककर मतदार आणि राष्ट्रवादीचे निष्ठावंत यांना सतावत असणार यात शंका नाही. पण, ‘आमच्याच नाही, इतरही पक्षांत असेच गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या उमेदवारांना तिकीटवाटप झाले आहे,’ असे या पक्षाचे विषयाचे गांभीर्यच नष्ट करणारे स्पष्टीकरण असू शकत नाही. त्यामुळे सूज्ञ मतदार आपले मताचे दान अशा तत्त्वशून्य नाही, तर तत्त्ववादी उमेदवारांच्या पारड्यात टाकतील, अशी आशा करायला हरकत नाही.

‘पवन करे शोर’

 

सन २०१९ ची लोकसभा निवडणुकीतील मतदानयंत्रावरील उमेदवार यादी म्हणजे नाशिककर जनतेसाठी पोलीस दरबारी असणारी ‘वॉण्टेड लिस्ट’ असेल का, असा प्रश्न सध्या पडतो आहे. कारण, या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे पवन पवार यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. राजकीय आखाड्यात उतरून त्यांना पतित करण्याचा घाट वंचित आघाडीच्यावतीने येथे घालण्यात आलेला दिसतो. भीमा-कोरेगाव घटनेनंतर राज्यभर काही हिंसक प्रतिक्रिया उमटल्या, त्यात नाशिकमधील जेलरोड परिसरात उमटलेल्या प्रतिक्रियेचे जनक म्हणजे हे वंचित आघाडीचे हे पवन पवार... गल्लीच्या तोंडावर बसून भाईगिरी करणे, धमकविणे, हल्ला करणे, खंडणी मागणे यांसारखे अनेकविध ‘उद्योग’ करून आपली उपजीविका साधणारे उमेदवार देऊन वंचित आघाडीने सद्सद् विवेक, सदाचार, शालीनता यांसारख्या मानवी गुणांनाच उमेदवार निवडीत ‘वंचित’ ठेवले आहे की काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे असे उमेदवार खरंच खासदार म्हणून निवडून आले, तर त्या मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ज्यांच्या कार्याची पद्धतच मुळात असंविधानिक आहे, असे हे लोकप्रतिनिधी बनून मिरवण्याची स्वप्ने रंगवणारे संविधानिक पद्धतींत कसे नैतिक, कायदेशीर कामकाज पार पडणार, हा प्रश्न वंचितांच्या नेतृत्वाला उमेदवारी देताना का पडला नाही, हे एक मोठे कोडेच आहे. जनसामान्यांना न्याय देणारे, खर्‍या अर्थाने बहुजन समाजास दिशा देणारे आणि त्यांची बाजू शासन दरबारी पोटतिडकीने मांडणारे अनेक उमेदवार वंचित आघाडीला नाशिकमधून मिळाले असते. बहुजन समाजाच्या अनेक नेत्यांनी तशी समस्त नाशिकरांचे प्रश्न मांडण्याची परंपरादेखील नाशिकला आहेच. मात्र, केवळ ‘ठोकशाही’ला मानणारे आणि ‘लोकशाही’चा स्वत:ला हवा तो अर्थ काढणारे पवन पवारांसारखे उमेदवार का दिले, हाच मोठा प्रश्न यानिमित्ताने अधोरेखित होतो. त्यामुळे सध्या ‘सावन का महिना’ नसला तरी नाशिकमध्ये हा ‘पवन’ मात्र जोरदार ‘शोर’ करतोय. पण, नाशिकची हवा पाहता, मतदारही आपल्या मतपेटीतून हा ‘पवन’ ‘वंचित’ करतील की काय, असे म्हणायला वाव आहेच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@