नॅशनल पार्कमध्ये ४७ बिबट्यांचा संचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |



मुंबई बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४७ बिबट्यांचा संचार असल्याची बाब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'बिबट्या गणना अहवाल २०१८' च्या माध्यमातून उघड झाली आहे. २०१५ आणि २०१७ मध्ये राष्ट्रीय उद्यानात अनुक्रमे ३५ आणि ४१ बिबट्यांचा वावर होता. मात्र, २०१८च्या अभ्यासातून बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

गेल्या चार वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अधिवास करणाऱ्या बिबट्यांच्या गणनेचे काम केले जात आहे. उन्ह्याळ्याच्या दिवसांत उद्यानात ठिकठिकाणी कॅमरा 'ट्रॅप' बसवून हा अभ्यास पार पडतो. 'वाइल्डलाइफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया'चे संशोधक निकित सुर्वे वन विभागाच्या मदतीने हा अभ्यास करतात. कॅमरा ट्रॅपच्या माध्यमातून टिपलेल्या बिबट्यांच्या छायाचित्रांच्या आधारे त्यांच्या संख्येची नोंद केली जाते.


 

२०१८ मध्ये गणनेच्या अभ्यासासाठी उद्यान आणि त्याबाहेरील सुमारे १४० चौ.कि श्रेत्राचा समावेश करण्यात आला होता. उद्यान परिक्षेत्राबरोबरच आरे दूध वसाहत, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, आयआयटी-पवई, घोडबंदर गाव आणि नागला या परिसरात हा अभ्यास पार पडला. यानुसार २०१८ मध्ये ४७ बिबट्यांचे छायाचित्र सुर्वे यांना कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने मिळाले आहेत. यामध्ये १७ नर, २७ माद्यांचा समावेश असून ३ बिबट्यांच्या लिंगाची ओळख पटलेली नाही. याशिवाय ८ पिल्लांचे छायाचित्र टिपण्यात आले आहे. मात्र नैसर्गिक अधिवासात पिल्लांची जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याने त्यांचा समावेश गणनेत न केल्याची माहिती संशोधक निकित सुर्वे यांनी दिली.


 

 


२२ नवीन बिबटे

 


४७ बिबट्यांपैकी २५ बिबट्यांचे छायाचित्र २०१५ आणि २०१७ च्या छायाचित्रांशी जुळले आहेत. तर उर्वरित २२ बिबट्यांचे छायाचित्र नव्याने टिपण्यात आले आहेत. यामधील १९ बिबटे २ ते ४ या वयोगटातील आहेत. मात्र २०१७ मधील १६ बिबटे या अभ्यासात छायाचित्रित होऊ शकलेले नाही. यामागे नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू आणि स्थलांतर अशी कारणे असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

 

 
 

'आजोबा' नंतर 'एल '

उद्यानातील सहा बिबट्यांनी स्थलांतर केल्याची माहिती या अहवालामधून मिळाली आहे. यातील 'एल ५९' या नर बिबट्याने मालाड ते तुंगारेश्वर अभयारण्यापर्यंत स्थलांतर केल्याची बाब उघड झाली आहे. माळशेज घाट ते राष्ट्रीय उद्यान असा प्रवास केलेल्या 'आजोबा' या बिबट्यानंतर 'एल ५९' च्या रुपाने उद्यानातील बिबट्यांच्या स्थलांतराचा पुरावा संशोधकांच्या हाती लागला आहे. 'एल ५९' बिबट्या मे २०१७ मध्ये मालाड येथे आढळला होता. त्यानंतर २०१८ मध्ये तो तुंगारेश्वर अभयारण्याजवळील कामण-भिवंडी रस्त्यावर मृत्यावस्थेत आढळला. म्हणजेच त्याने या प्रवासात घोडबंदर रस्ता, वसईची खाडी (पोहून), दिवा-कामण-वसई रेल्वे मार्ग ओलांडल्याचे निष्पन्न झाले आहे.




 

'पुरी' सापडला

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत डिसेंबर महिन्यात सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या 'पाणी' या मादी बिबट्याच्या पिल्लाचा मागोवा घेण्यास संशोधकांना यश आले आहे. या बिबट्याचे नाव 'पुरी' असे असून मार्च रोजी त्याचे छायाचित्र राष्ट्रीय उद्यानात टिपण्यात आले. त्यामुळे या पिल्लाने चित्रनगरी परिसरातून स्थलांतर करुन उद्यानाच्या मध्यभागी स्वत:ची हद्द निर्माण केल्याची शक्यता सुर्वे यांनी वर्तवली आहे.

 
 
 
बिबट्यांच्या स्थलांतराची बाब समोर आली असल्याने त्यांचा स्थलांतराचा पट्टा संरक्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. उद्यानाच्या उत्तरेकडील भागामध्ये काही रस्ते आणि रेल्वे विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे हे प्रकल्प अंमलात आणताना सुरक्षात्मक बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना परवानगी देण्यात येणार आहे
- अन्वर अहमद
मुख्य वनसंरक्षक-संचालक
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
 
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


pasting
@@AUTHORINFO_V1@@