मलाला गप्प का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2019
Total Views |


 


पाकिस्तानातल्या दोन हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि बळजबरीने निकाह लावण्याचा धक्कादायक विषय समोर आला, तेव्हापासून मलालाची दातखीळ बसल्याचे पाहायला मिळाले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घटनेची दखल घेतली तरी मलालाच्या तोंडातून या घटनेविरोधात एक शब्दही फुटला नाही.


साधारण अडीच वर्षांपूर्वी कुख्यात दहशतवादी बुऱ्हान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यातल्या कित्येकांचे अश्रूभरले डोळे वाहताना दिसले. काश्मीरमधील तथाकथित अत्याचारग्रस्त मुस्लिमांसाठी कळवळा दाटून आलेल्यांमध्ये घरभेद्यांसहित पाकिस्तानच्या नोबेलविजेत्या मलाला युसूफझाईचादेखील समावेश होता. फुटीरतावादी आणि पाकपोषित अतिरेकी घुसखोरांच्या खोट्या हक्कांसाठी ही मुलगी तेव्हा मोठमोठ्याने जीभ चालवत होती. परंतु, या मुलीची वैचारिक पात्रता काय, तिला सदर विषयाचे ज्ञान किंवा निदान माहिती तरी किती याचा विचार केल्यास समोर शून्य आणि शून्यच दिसत असे. उल्लेखनीय म्हणजे, काश्मीरप्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेविरोधात जात मलालाने संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मध्यस्थीचीही मागणी केली होती. पण, काश्मिरातील हजारो हिंदूंच्या कत्तलीबद्दल वा पलायनाबद्दल तिने कधी ‘ब्र’ही काढला नव्हता. भारतातील डावे विचारवंत, बुद्धिजीवी आणि धर्मांध मुसलमान ज्याप्रकारे देशातल्या कोणत्याही हिंसाचारावर, अत्याचारावर तोंड उघडतात, पण गोध्रा रेल्वेस्थानकात जिवंत जाळलेल्या ६९ हिंदूंबद्दल अवाक्षरही उच्चारत नाहीत, तशीच तेव्हाची मलालाची भूमिका होती. आताही पाकिस्तानातल्या दोन हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि बळजबरीने निकाह लावण्याचा धक्कादायक विषय समोर आला, तेव्हापासून मलालाची दातखीळ बसल्याचे पाहायला मिळाले. अपहृत मुलींच्या बापाने पोलीस व प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली, न्यायाची मागणी केली, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घटनेची दखल घेतली तरी मलालाच्या तोंडातून या घटनेविरोधात एक शब्दही फुटला नाही. उलट तिच्या ट्विटरखात्यावर भारतीयांसह इतरांनी मलालाला याचा जाब विचारल्यावर तिने उत्तर देण्याऐवजी पळपुटेपणा करणेच पसंत केलेकदाचित पाकिस्तानसारख्या इस्लामी देशात हिंदू मुलींच्या नशिबी असाच दुर्दशेचा फेरा लिहिलेला असल्याचे मलालालादेखील मान्य असावे. तरीही जगभर स्त्रियांच्या हक्क, अधिकारांसाठी पर्यटन करत फिरणारी मलाला स्वदेशातल्या या भीषण प्रकारावर गप्प का, हा प्रश्न पडतोच. कारण, तिची कोणाकडून का होईना तयार करण्यात आलेली अतिशय थोर, महान वगैरे वगैरे प्रतिमा!

 

वस्तुतः पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतात राहणाऱ्या मलालावर मुलींनी शाळेत जाण्याच्या हट्टापायी कट्टर इस्लामी विचारसरणीच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला व त्यातून ती बचावली. हेच तिचे अफाट व अचाट कर्तृत्व, ज्यामुळे तिची नोबेल शांती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुढे कठीण व विपरीत परिस्थितीतील मुलींच्या शिक्षणाची तिला ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ केले गेले. नंतर मात्र ती आखाती देशातील दहशतवादावर बड्या बड्या राष्ट्रांची मर्जी सांभाळत त्यांनीच लिहून दिलेली भाषणे वाचू लागली. पण, त्यातला फोलपणाही लवकरच उघड होऊ लागला. दरम्यानच्याच काळात काही युरोपीयन पत्रकारांनी या दिवाळखोरीविरोधात लेखणी चालवली व काही तथ्येही समोर आणली. परिणामी, मोठमोठ्या इव्हेंटच्या स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या ग्लॅमरस कार्यक्रमांना आवर घातला गेला. मात्र, नंतरही मलाला युसूफझाईला आदर्श, धाडसी, खंबीर मुलगी म्हणून कुठल्या ना कुठल्या ठिकाणी मिरवले जातच होते. मुलींच्या शिक्षणाधिकार, मानवाधिकारावर बोलणाऱ्या मलालाचे कौतुकही होत असे. ते तिने दहशतवाद्यांविरोधात मांडलेल्या मतांमुळे की, ती मुसलमान असूनही जिहाद्यांविरोधात बोलल्यामुळे की, ती स्त्री असल्याने स्त्रियांची बाजू घेतल्यामुळे, हे कळायला काही मार्ग नाही. पण, बहुतेकांनी तिला स्त्रियांची, स्त्रीवादाची लढाई लढणारी म्हणूनच सातत्याने समोर आणले. मात्र, स्त्रीवादाची लढाई ही सगळ्याच प्रकारच्या अन्यायाविरोधात असते व त्यात जात, धर्म, पंथ, संप्रदाय वगैरे भेद विरघळून जातात, त्यांचा काही संबंध राहत नाही. परिणामी, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रत्येकाची ही जबाबदारी असते की, तिने समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी आपला आवाज समानतेने उठवावा. मलालाला मात्र ही गोष्ट पटत नसावी, म्हणूनच पाकिस्तानातील हिंदू मुलींविरोधातील क्रौर्यावर तिला काही बोलावेसे वाटले नाही. इथे तिचा धर्म वा देश दोन्हींपैकी एक नक्कीच आडवे येत असणार!

 

मलालाची ही भूमिका काही आजचीच नाही. हल्ला होऊनही शाळेत जाण्याच्या निर्धारावर ठाम राहण्याच्या पराक्रमानंतर मलाला ज्यावेळी पाकिस्तानबाहेर हसण्या- खिदळण्यात, खेळण्यात वेळ घालवत होती, त्याचवेळी जगात कितीतरी अमानुष घटना होत होत्या. पण, मलालाच्या दुर्दैवाने म्हणा किंवा जगाच्या सुदैवाने, त्या घटना मूलतत्त्ववादी मुसलमानांनीच घडवून आणल्या होत्या. म्हणून ती त्याविरोधात कधी बोलली नाही आणि जगालाही तिचा मुखवटा व चेहरा कळून चुकला. मलाला कॅमेऱ्यासमोर येऊन दहशतवादाविरोधात भाषणे ठोकत असे, तेव्हा आफ्रिकेतील शाळकरी मुलींचे अपहरण आणि ‘इसिस’ने याझिदी मुलींचा ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून केलेला भयाण छळही समोर येत होता. पण, मलालाला कधी त्यावर व्यक्त व्हावेसे वाटले नाही. पण, न्यूझीलंडमधील ख्राईस्ट चर्च शहरातील मशिदीत माथेफिरूने हल्ला करत काही जणांचा जीव घेतला तर मलालाला तत्काळ उमाळा आला. म्हणूनच मलाला कोणत्याही मुद्द्याकडे मुस्लीम दृष्टिकोनातून पाहते का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे जी गोष्ट मलालाची तिच पाकिस्तानातल्या अन् भारतातल्याही शांती-चर्चेच्या पैगामवाल्यांची! गोंडसवाण्या शब्दांनी सजवलेल्या मंचावर हजेरी लावत ‘अमन’ अन् ‘इश्का’चे तराने गाणारे आज हिंदू मुलींवरील अत्याचारानंतर चिडीचूप आहेत. संगीताला वा कलेला देशा-धर्माच्या सीमा नसतात म्हणणारे आज मूग गिळून बसले आहेत. भारतात येऊन पैसा कमवून जाणाऱ्या पाकिस्तानी नटव्यांनीही तोंडाला कुलूप लावल्याचे दिसते. असे प्रत्येकवेळी होतेच. मागे सानिया मिर्झालाही पुलवामा हल्ल्याबद्दल काहीच का बोलत नाही, असे विचारल्यावर या लोकांची मानसिकता कशी काम करते, हे समोर आलेच होते. मलालादेखील अशांपैकीच एक. फाळणीनंतर गेल्या ७० वर्षांत पाकिस्तानातल्या हिंदूंना संपविण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. हिंदूंची धर्मांतरे करून प्रार्थनास्थळे, मंदिरे तोडण्यात आली. यावरून पाकिस्तान हिंदूंसाठी नरकापेक्षाही वाईट झाल्याचे स्पष्ट होते. पण हिंदू स्त्री, पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तिथल्या कोणीच तोंड उघडले नाही, कदाचित त्यांच्या रक्तातच ही पाशवी वृत्ती दौडत असावी. मलालाला आपण त्यांच्याहून निराळे आहोत, हे सिद्ध करण्याची संधी आताच्या घटनेनंतर आली होती. पण, तिने ती दवडत आपणही त्याच कळपातले असल्याचे दाखवून दिले. म्हणूनच ती गप्प गप्प आहे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@