हरी निज रूप दिखाया…!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2019   
Total Views |
 



 
'…पण एक विचारु का ? रक्तपेढीच्या कामाशी याचा काय संबंध ?’
 
हा प्रश्न जवळ-जवळ विसाव्या व्यक्तीने विचारला होता. अर्थात हा प्रश्न तसा खूप स्वाभाविक होता. कारण रक्तपेढीचे मुख्य काम रक्तसंकलन, रक्तप्रक्रिया, रक्तसाठवणूक आणि रक्तवितरण हे आहे, यात तर काहीच शंका नाही. मग आम्ही हे काय करत होतो की ज्यामुळे असे प्रश्न आम्हाला विचारले जात होते ?
 
दि. १२ जानेवारी २०१३ ते दि. १२ जानेवारी २०१४ हे वर्ष होते स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे. विविध संस्थांनी या वर्षभरात स्वामीजींच्या विचारांचे प्रवर्तन घडून यावे याकरिता भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जनकल्याण रक्तपेढीनेदेखील आपल्या प्रभावक्षेत्रात अशा अनेक कार्यक्रमांची आखणी आणि यशस्वी अंमलबजावणी या वर्षभरात केली. या अनेक कार्यक्रमांपैकी रुग्णालयांमध्ये ’स्वामीजींचे तेजस्वी विचार अंकित केलेल्या प्रतिमा भेट देणे’ हा एक महत्वाचा कार्यक्रम होता. या प्रतिमा देत असताना रुग्णालय कर्मचाऱ्यांचा एकत्रित तासभराचा कार्यक्रम घेऊन समारंभपूर्वक त्या दिल्या जात होत्या. अशा वेळी स्वामीजींबद्दल बोलणारा कुणीतरी वक्ता उपलब्ध झाल्यास ठीकच अथवा आम्हा अधिकाऱ्यांपैकीदेखील काहींनी या विषयाची तयारी ठेवली होती. त्यामुळे रक्तपेढीचा हा पैलू ठाऊक नसलेल्या रुग्णालयांतील अनेक व्यक्तींना याचे आश्चर्य वाटत असे. वरील प्रश्न येई तो याच आश्चर्यातून. पुण्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सुमारे पन्नास- एक रुग्णालयांना या प्रतिमा भेट देण्याचे कार्यक्रम झाले. या केवळ प्रतिमा नव्हत्या तर ’पवित्र बनणे आणि दुसऱ्यांचे हित करणे, हेच साऱ्या उपासनेचे सार होय’ किंवा ’दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात ; बाकीचे सारे जिवंत असूनही मेल्यासारखेच होत’ यांसारखे एका नजरेत वाचता येण्यासारखे आणि एखाद्या वीजेप्रमाणे चटकन अंतरंगात चमकून जाणारे स्वामी विवेकानंदांचे विचारच आम्ही प्रतिमांच्या स्वरुपामध्ये रुग्णालयांना समारंभपूर्वक देऊ करत होतो. आजही हे विचार या सर्व रुग्णालयांमधून झळकताना दिसतील. या प्रतिमांबरोबरच रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेले ’अमृतस्य पुत्रा:’ हे स्वामीजींच्या विचारांचे सुंदर पुस्तक सुमारे तीनशे डॉक्टर्सना रक्तपेढीच्या वतीने भेट म्हणून दिले गेले. या वर्षात रक्तपेढीमध्ये किंवा जनकल्याणशी संबंधित रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करणारा प्रत्येक रक्तदाता तसेच रुग्णासाठी रक्तपिशवी नेण्यास आलेला रुग्णाचा आप्त ’स्वामी विवेकानंदांचा जीवनसंदेश’ ही छोटी पुस्तिका भेट म्हणून घेऊन गेला. त्या वर्षी सुमारे २२००० रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या व ३२००० रक्तघटकांचे वितरण झाले होते. याव्यतिरिक्त रक्तपेढीच्या भारत विकास परिषद पॅथॉलॉजी लॅबच्या मार्फ़तही आजुबाजुच्या जवळपास १५ गावांमध्ये मोफत रक्तक्षय तपासण्यांचे (anemia detection) व समुपदेशनाचे कार्यक्रम झाले होते. या लॅबशी संबंधित डॉक्टरांनाही काही पुस्तके भेट दिली गेली होती. एकंदरीतच या संपूर्ण वर्षभरात रक्तपेढीतील सर्वांनाच ’स्वामी विवेकानंद’ या नावाने अक्षरश: पछाडले होते.
 
अर्थात हे सगळं असलं तरीदेखील सुरुवातीला उपस्थित झालेला प्रश्न शिल्लक राहतोच. जनकल्याण रक्तपेढीने स्वत:चे मनुष्यबळ आणि साधने खर्ची घालुन हे सर्व करण्याचे कारण काय ? उत्तर म्हटलं तर खूप सोपं आहे आणि म्हटलं तर लक्षात यायला जरा कठीणही. या प्रश्नाचं उत्तर आहे, ’… हेच मुख्य काम आहे म्हणून !’ आता या उत्तरावरही पुन्हा प्रश्न तयार होणारच, हे लक्षात घेऊन काही गोष्टी मुद्दाम सांगायला हव्यात. राष्ट्र सर्वतोपरी मानून सर्व समाजाचे संघटन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक वारसा घेऊन जनकल्याण रक्तपेढीसारखा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे संघाच्या प्रत्यक्ष कामात काय किंवा रक्तपेढीसारख्या प्रकल्पात काय, ’सर्व समाज एका सूत्रात बांधणे’ हा विचार कायमच प्रधान राहिलेला आहे. त्यामुळे संघाची शाखा, संघविचारांतून उभी राहिलेली अन्य संघटने आणि संघाचे सेवाप्रकल्प या सर्व ठिकाणी हाच एक विचार स्वाभाविकपणे व्यापलेला दिसेल. प्रत्यक्ष काम करतानाची माध्यमे वेगवेगळी असू शकतात पण अंततोगत्वा ध्येय एकच आहे, ते म्हणजे राष्ट्रहितासाठी समाजाचे संघटन. हा विचार घेऊन जे जे म्हणून काम चालते – मग भलेही ते संघवर्तुळाच्या बाहेरचे असेल - ते सर्व काम आपलेच आहे, असे संघाने प्रथमपासूनच मानले आहे. भारतमातेच्या परमवैभवासाठी बलशाली युवकसंघटनेचं स्वप्न पाहणाऱ्या स्वामी विवेकानंदांचं आणि संघविचारांचं तर कूळ आणि आचार दोन्ही एकच आहे अशी प्रत्येक संघस्वयंसेवकाची श्रद्धा आहे. किंबहुना याच श्रद्धेने आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी संघाची पायाभरणी केली आहे. स्वामीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा प्रसार ही रक्तपेढीनेदेखील आपली जबाबदारी मानली ती या श्रद्धेमुळेच.
 
 
 
 
जिथपर्यंत जनकल्याण रक्तपेढीचा संबंध आहे, ’संपूर्ण स्वेच्छा रक्तदान, रक्तसुरक्षिततेसाठी तंत्रज्ञान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत विश्वासार्ह सेवा’ या अत्यंत स्वच्छ आणि सत्य अधिष्ठानावर रक्तपेढी प्रारंभापासून काम करते आहे आणि करत राहणार आहे. निवडलेले साधनही मूळ साध्याला साजेसे उदात्त असले पाहिजे, याची काळजी रक्तपेढीने कायम घेतली आहे. म्हणूनच रक्तदान चळवळीचे अन्यत्र सहजपणे आढळणारे व्यवहारीकरण इथे कधीच रुजु शकले नाही. व्यवहार आहे तो केवळ स्नेहाचा. कदाचित यामुळे जगरहाटीमध्ये आम्ही अव्यवहारीही ठरत असू. पण असे असूनही रक्तपेढीच्या यशाचा आलेख कायम चढता राहिलेला आहे. रक्तदानाच्या बदल्यात रक्तदात्याने कुठलीही अपेक्षा ठेवू नये, हा टोकाचा आग्रह धरुनही रक्तपेढीचे वार्षिक रक्तसंकलन आता पंचवीस हजाराच्या जवळ गेले आहे. रक्तसुरक्षिततेसाठी स्वयंचलित रक्तविघटनाबरोबरच नॅट (न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग), रक्तविकिरण यांसारखी जागतिक दर्जाची तंत्रज्ञाने वापरुनही रक्तघटकांचे प्रक्रियाशुल्क भल्याभल्यांना तोंडात बोट घालायला लावील इतके वाजवी ठेवण्यात रक्तपेढी यशस्वी ठरली आहे. मुख्य म्हणजे यानंतरही गरजूंना सवलती आहेतच. वरील सर्व तंत्रज्ञानांनी सिद्ध असलेले रक्तघटक थॅलेसेमिया, हिमोफ़िलिया आणि सिकल-सेल ॲनिमियाग्रस्त मुलांना पूर्णत: नि:शुल्क दिले जातात. दर वर्षी अशा गरजूंना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा आकडा आता पन्नास लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अर्थात हेतुची शुद्धता लक्षात घेऊन वेळोवेळी पाठीशी उभा राहिलेला समाज हाच यामागील खरा नायक आहे. यात सर्व निरपेक्ष रक्तदाते, समर्पित शिबिरसंयोजक, आश्वासक देणगीदार आणि लाखो हितचिंतक येतात. थोडक्यात, समाजाला एका सूत्रात बांधण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीने आपली कार्यकक्षा निश्चित केली असून त्यासाठी पूरक असलेल्या सर्व कामांमध्ये रक्तपेढी स्वत:ला झोकुन देत आलेली आहे. मग ते ’सेवासहयोग’चे ’वॉक फ़ॉर सेवा’ असो किंवा श्वेता असोसिएशनचे ’रन फ़ॉर व्हिटिलिगो’ असो ; देवदेवेश्वर संस्थानाचे धार्मिक कार्यक्रम असोत वा ’चारित्र्य प्रतिष्ठान’ चे सामाजिक उपक्रम असोत – हे सर्व कार्यक्रम आपलेच आहेत या भावनेने रक्तपेढी यात सामील होत आलेली आहे. वर उल्लेख केलेल्या ’स्वामी विवेकानंद सार्धशती’च्या निमित्ताने वर्षारंभालाच पुण्यात एका भव्य अभिवादन यात्रेचे आयोजन केले गेले होते. यात जनकल्याण रक्तपेढी म्हणून आम्ही तर सहभागी झालोच शिवाय आमच्या विनंतीवरुन पुण्यातील सहा रक्तपेढ्याही आपापली वाहने आणि कर्मचाऱ्यांसह यात सामील झाल्या आणि रक्तदान चळवळीच्या वतीने स्वामीजींना एक आगळीवेगळी मानवंदना या निमित्ताने दिली गेली. रक्तपेढीमार्फ़त असे सर्व उपक्रम होतात ते आपल्या ध्येयाबाबतच्या स्पष्टतेतूनच.
 
 
 
 
अर्थात असे असले तरी यामुळे माध्यम म्हणून स्वीकारलेल्या रक्तपेढीच्या कामाचे महत्व अजिबात कमी होत नाही. किंबहुना कित्येक आयुष्ये पुरुन उरणारे हे माध्यम आहे. माध्यमाचे महत्व काय असते ते एका प्रसिद्ध चित्रपटगीताच्या पुढील ओळींतुन लक्षात येऊ शकेल –
 
हरी अनंत हरीरूप अनंता, कैसे कोई ध्यावे ?
राग-रागनी के सूर-सूर में, हरी निज रूप दिखाया
 
संगीतासाठी समर्पित झालेल्या या गायकालाही हे भान आहे की अंतिम उद्दीष्ट ’हरीची प्राप्ती’ हेच आहे. पण अडचण अशी आहे की हरीचे रूप अनंत आहे. मग त्याचे ध्यान करावे कसे आणि त्याची प्राप्ती व्हावी कशी ? तर यावरचे उत्तरही त्यानेच शोधून काढले आहे. सप्तसूर आणि राग-रागिण्यांमध्येच त्याने हरीचे दर्शन घेतले आणि साधना चालु ठेवली. म्हणजेच लक्ष्य जर ’हरी’ असेल तर माध्यमही ’हरीरूप’च आहे.
 
जनकल्याण रक्तपेढीपुरतं बोलायचं झालं तर स्वेच्छा रक्तदान, रक्तसुरक्षितता आणि रुग्णसेवा या मूल्यांमध्ये पस्तीस-एक वर्षांपूर्वीच हरीने स्वत:चे दर्शन रक्तपेढीला घडविले आहे आणि त्याच हरीच्या साक्षीने आजही साधना चालु आहे, चालत राहणार आहे !
 
 
 
 
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@