होळीच्या रंगात मिसळला आनंदाचा रंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2019
Total Views |




‘चला, होळीच्या रंगात थोडा आनंद मिसळूया! यंदाची होळी ‘हॅप्पीवाली’ होळी साजरी करूया!‘ हे ब्रीदवाक्य घेऊन एक उपक्रम मी आणि माझ्या ‘हॅप्पीवाली फीलिंग’च्या टीमने राबवायचा ठरवला.


तुम्ही विचार करत असाल नक्की काय होता हा उपक्रम? तर उपक्रमाबाबत... आपण सगळे सण किंवा समारंभ आपल्या मित्र परिवारांसोबत, नातेवाईकांसोबत सहकुटुंब साजरे करतो. पण मनात आलं ज्यांच्या नशिबात दुर्दैवाने कुटुंबाचे प्रेमच नाही अशांसोबत आपण होळीच्या पुरणपोळीचा गोडवा वाटला, तर किती बरे होईल! या विषयाला अनुसरून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि युट्यूब चॅनेलवर अपलोड केला. (या चॅनेलच नाव Happy Wali Feeling Vijay Mane आहे) तसेच फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यात जास्तीत जास्त लोकांनी यंदाची होळी अनाथाश्रम, बालकाश्रम किंवा वृद्धाश्रमात साजरी करावी आणि तेथील प्रत्येकाच्या जीवनात आनंदी रंगाची उधळण करावी, असे निवेदन केले. मी यानंतर टीम आणि कुटुंबासोबत होळी साजरी करण्यासाठी बदलापूर येथील ‘सत्कर्म बालकाश्रमा’ची निवड केली. त्या संस्थेचे मकरंद वाढवेकर यासोबत फोनवर बोलून मी त्यांना माझी ‘हॅप्पीवाली होळी’ संकल्पना सांगितली. त्यांनाही ती खूप आवडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी होकार दिला. मग धुळवडीच्या दिवशी हॅप्पीवाली होळीचा मुहूर्त पक्का केला. टीम आणि कुटुंबासोबत लागलो कामाला. या सगळ्यात समाजमाध्यमांवरील पोस्टवरदेखील लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत होत्या. हा प्रयत्न जास्तीत जास्त जनांपर्यंत पोहोचावा यासाठी माझी फेसबुकवर मैत्री झालेली मैत्रीण माधुरी बाविस्कर व इतर काही मित्रमंडळींनी विशेष मेहनत घेतली. बघता बघता धुळवडीचा दिवस उजाडला आणि संपूर्ण टीम आणि पोस्टमुळे तयार झालेल्या नवीन चार मित्रांसोबत आश्रम गाठला. मुलांना उपक्रमाची माहिती बहुधा आधीच तेथील पदाधिकाऱ्यांकडून मिळाली असावी. त्यामुळे आमची गाडी आवारात आलेली पाहून मुलं पळत गेटजवळ आली. त्यांच्या डोळ्यातला अबोल आनंद अगदीच वाचता येईल इतक्या प्रखरतेने जाणवत होता. पण, आम्ही सगळे नवीन असल्याने त्यातील कोणीच बोलण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. दबक्या पावलात एकमेकांशी कुजबुज चालू होती. पण आम्ही पूर्ण तयारीने गेलेलो होतो. त्या चिमुकल्यांना आपलंस करायचं म्हणजे त्यांच्याशी मैत्री करायला हवी. याचा अभ्यास आम्ही आधीच केला. मग गाडीतून पहिल्यांदा माझ्या मुलाला आणि माझा मित्राच्या भाच्याला पुढे केले. या दोन छोट्यांशी त्या सगळ्यांनी पुढच्या पाच मिनिटांत गट्टी केली आणि त्यांच्या मागोमाग आमच्याबरोबरदेखील. तिथे अजून एक ग्रुप आला होता, ज्यांनी मुलांच्या आजच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यांचा नाश्ता होईपर्यंत आम्ही एका बाकड्यावर भांड्यांमध्ये सुके रंग ओतून ठेवले आणि आश्रमामधील म्युझिक सिस्टिमला उडत्या गाण्यांनी भरून नेलेला पेनड्राईव्ह जोडला. गाण्यांची धून ऐकून बच्चे कंपनी नाश्ता संपवून मैदानात हजर झाली आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. सगळे चिमुकले बेसावध असताना आम्ही नैसर्गिक सुक्या रंगांनी धुळवड सुरू केली आणि विशेष म्हणजे मुले पण त्या माहोलमध्ये लगेच मिसळली. मग पुढचे एक ते दीड तास आम्ही जो काय बेधुंद आनंद लुटला त्याला तोडच नाही. मग या आनंदात बच्चे पार्टीसोबत संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक इतकंच काय तर तिथे साफसफाई करणाऱ्या मावशी तसेच सिक्युरिटी मामा यांनी पण गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला. या सगळ्यात आमचा डोळा चुकवून मुलांनी फुगे आणि पिशव्या आणून आमच्यावर निशाणा साधला. पण पिशवी फुटली नाही, तर ती लागते आणि त्यामुळे दुखापत होऊ शकते, असे समजावून सांगितल्यावर त्यांनी पिशवी बंदी मान्यही केली. मग पुढे कितीतरी वेळ नाचगाणे, रंग, फुगडी खूप सारी नौटंकीही चालू होती.

 

अगदी नाचून दमायला झाल्यावर आम्ही थांबायचे ठरवले. इतक्यात मकरंदजींनी मुलांना काही इशारा केला आणि मुलांनी लगेच साफसफाई मोहीम सुरू केली. आश्रम परिसरातला केरकचरा पुढच्या दहा मिनिटांत गोळा करण्यात आला. ती मुले साफसफाईच्या कामाला लागलेली पाहून आमची टीमसुद्धा त्यांच्या सोबत त्या कामात रुजू झाली. त्यानंतर मैदान परिसरात असलेल्या नळाखाली मुलांनी हातपाय स्वच्छ धुतले आणि त्यानंतर मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आला. अगदीच अतिशयोक्ती करत नाही पण, मला तेथील सहा मुलांनी आपल्या हाताने बिस्कीट खाऊ घातले आणि माझ्या टीममधील प्रत्येकाचा असाच काही अनुभव होता. म्हणजे अर्ध्या दिवसाच्या त्या ओळखीत त्या मुलांनी आम्हाला आपलं मानून त्यांच्या घासातला घास खाऊ घातला, या पलीकडचा आनंद तो दुसरा काय असू शकतो. थोडी पेटपूजा झाल्यावर आम्ही पुन्हा धमाल-मस्ती चालू केली, मुलांसोबत काही खेळ खेळलो. त्यात या मुलांचा चांगलाच व्यायाम झाला. त्यानंतर मैदानातल्या त्याच नळाखाली आंघोळीपूर्वी मुलांच्या अंगावरचा रंग काढून एका-एकाला बाथरूममध्ये आंघोळीसाठी रवाना केले. सगळी बच्चे कंपनी भोजनालयात येईपर्यंत आम्हीदेखील फ्रेश झालो. मुलांच्या आजच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केली होती. मग सगळ्यांनी एकत्र मिळून आनंदाने पुरणपोळ्यांचा आस्वाद घेतला आणि शेवटी मनात नसताना आम्हाला त्यांचा निरोप घ्यावा लागला. आमची टीम गाडीत बसताना मुलं हळूहळू गाडीजवळ आली आणि भावूक नजरेने एकटक आमच्याकडे पाहत होती. त्यांच्या मनातली घालमेल आमच्या प्रत्येकाला त्यांच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होती. ती काही बोलणार या आधीच मी त्यांना म्हणालो, “ओय कार्टून गँग, असं तोंड पाडू नका. आम्ही प्रत्येक महिन्यात तुमच्यासोबत होळी खेळायला येऊ.” इतकं ऐकून त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुदकन हसू उमटले आणि आम्ही तेथून निरोप घेतला. संपूर्ण दिवस या धमाल मस्तीत कसा गेला हे कळलंच नाही. दिवसभर व्हॉट्सअॅप आणि फेसबुककडे विशेष लक्ष गेले नव्हते. गाडीत मग म्हटले, चला फेसबुक चाळू आणि ते उघडताच, मला ‘हॅप्पीवाली फीलिंग’ नोटिफिकेशन्स आली. माझ्या युट्यूब आणि फेसबुक निवेदनाला मान्यता देऊन श्रीराम काळे यांनी शेगावमधील गतिमंद मुलांच्या शाळेत, तर गोवर्धन पाटील यांनी येवला येथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत आणि राहुल पारधी यांनी पालघरमधील अनाथाश्रमात ‘हॅप्पीवाली होळी’ उपक्रम केले होते. आत्तापर्यंतचा हा सगळ्यात जास्त आनंदी क्षण होता हा माझ्यासाठी. शेगाव येथेही अशाच प्रकारे आनंदाची पखरण करणारे धूलिवंदन साजरे झाले. श्रीराम काळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. श्रीराम काळेंनी साजऱ्या केलेल्या धूलिवंदनाची गाथा त्यांच्याच शब्दात- शेवगाव येथील (गतिमंद)विशेष मुलांच्या शाळेत होळी आणि माझी कन्या दिव्या हिचा जन्मदिवस साजरा केला. दिव्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना एक वही आणि एक पेन तसेच खाऊ देण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कौतुक एक आत्मिक समाधान देऊन गेले. या प्रसंगी माझे मित्र शाम मोहिते व प्रा. वीरेंद्र बैरागी हे उपस्थित होते.

 

शाळेचे शिक्षक व संचालक उगलमुगले यांनी दिव्याला चित्रकलेचे साहित्य भेट दिले. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व धन्यवाद! अगदी छोटीशी गोष्ट पण मनाला किती समाधान आणि ऊर्जा देऊन जाते. पुन्हा काहीतरी चांगले करण्यासाठी उत्साह निर्माण करते. विना अनुदानित तत्त्वावर चालणारी निवासी शाळा किती अडचणींना आणि कोणत्या प्रसंगांना सामोरी जात असेल याबाबत कल्पना न केलेली बरी! पण आत्मविश्वास आणि समाजासाठी काही चांगले करण्याची उगलमुगलेंची जिद्द मनाला चांगलीच भावली. आम्ही शाळेच्या गेटपर्यंत येऊन पोहोचलो, तर ते आम्हाला निरोप देण्यासाठी थेट बाहेर आले. त्यामुळे शाळा, मुले आणि शिक्षक यांच्याविषयी एक आपुलकी निर्माण झाली. पुन्हा लवकरच काही चांगली आणि यथाशक्ती मदत करावी या हेतूनेच मी तेथून कधी बाहेर आलो, हे लक्षातही आले नाही. पुन्हा नव्याने भेटण्यासाठी, ही छोटीशी आनंददायी गोष्ट करण्यासाठी मला प्रेरणा दिली. माधुरी बाविस्करताई आणि ‘हॅप्पीवाली फीलिंग’चे विजय माने यांच्या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन मी यंदाची रंगपंचमी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली. असो, अशाच प्रकारे येवले येथेही गोवर्धन पाटील यांनी समाजभान राखत सण साजरा केला. त्यांच्या कार्याचे मनोगत माधुरी बाविस्कर यांच्या शब्दात.

 

शिवबाचे आम्ही आहोत मावळे,

त्यांची शिकवण आहे आमच्या मनामनात

सत्कार्यासाठी नेहमीच असतो पुढे आम्ही,

दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी नक्की येऊ एक साथ

 

अशाच सकारात्मक भावनेसोबत गोवर्धन पाटील यांनी आपल्या गावाजवळील ‘मायबोली निवासी कर्णबधिर शाळे’ची भेट घेतली, जी येवला, जिल्हा नाशिक इथे आहे. तेथील मुलांच्या एकूण संख्येचा आढावा घेतला आणि धूलिवंदनाला आहेत की नाही याचीही खात्री करून घेतली. सगळी माहिती काढून ते तयारीला लागले. मी त्यांना बोलले, जास्त दगदग करू नका आणि शक्यतो बिस्कीटं किंवा चॉकलेट्स देऊन आनंद वाढवला तरी चालेल... पण त्यांनी उलट मस्त जेवणाचा बेत आखला आणि मुलांचा आनंद द्विगुणित केला. मग काय तो दिवस उगवला आणि ते आपल्या सर्व मित्रमंडळींना घेऊन निघाले. जेवणासाठी वरण-भात, भाजी-पोळी, जिलेबी-भजी असा फक्कड बेतही आखलेला होताच. विशेष बाब म्हणजे त्यांच्या सर्व मित्रांनी पण खुशीने यात सहभाग घेतला.

 

शाळेतल्या मुलांनीसुद्धा एका रांगेत येऊन शिस्तबद्ध पद्धतीने आपापली ताटे भरून घेतली. कुठलीही गडबड नाही किंवा ढकलाढकली नाही. सगळं कसं शिस्तीत. दुसरी गोष्ट म्हणजे अन्न वाया जाऊ नये म्हणून मुलंदेखील लागेल तितकंच अन्न घेत होती. सगळीकडे स्वच्छता आणि सर्वजण मस्तपैकी आपल्या पारंपरिक पंगत पद्धतीत जेवायला बसली.सगळ्यांनी आनंदाने जेवण केले. तो आनंद आणि ती तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. खरंच, गोवर्धन पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे खूप कौतुक आणि आभार...! त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अशा उपक्रमात सहभाग घेतला आणि दाखवून दिले की, आम्ही शिवाजी महाराजांना नुसते जाणत, मानत नाही, तर त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारली आहे. आनंदी व्हायचे असेल, तर दुसऱ्याला आनंद द्यायला शिका. ही शिकवण त्यांनी मनामनात रुजवली. नक्कीच यातून प्रेरणा घेऊन अनेकजण असे स्तुत्य उपक्रम राबवतील, अशी आशा करते. तर पालघर येथे राहुल पारधी यांनीही अशीच आगळी वेगळी होळी साजरी केली. ते म्हणतात- तसा होळीचा दिवस असाच मित्रांसोबत उनाडक्या करत गेला असता, पण विजय माने यांची‘हॅप्पीवाली होळी’ची पोस्ट पाहून आम्ही मित्रांनी यंदाची होळी पालघरमधील आंबिस्ते अनाथाश्रमात करायची ठरवली आणि आश्रमातील कार्यकर्त्यांशी बोललो. होळीच्या दिवशी समोसे, चिवडा, चॉकलेट्स आणि पुरणपोळीसोबत सणाचा आनंद लहान मुलांना वाटला. त्यानंतर त्यांच्यासोबत लंगडीचा डाव साधला. या सगळ्यात इतकी जास्त मज्जा आम्हा सगळ्यांना आली की काही विचारूच नका. ही आजवर साजरा केली माझी सगळ्यात उत्तम होळी होती, जी मी कधीच विसरू शकत नाही. आम्ही मित्रांनी आता संकल्प केला आहे, यापुढे दरवर्षी होळी आणि सर्वांचे वाढदिवस याच पद्धतीने साजरे करायचे. सोशल मीडियावर फक्त हॅप्पीवाली होळीचे आवाहन केले आणि समाजातील अनेक गट, लोक स्वतःहून पुढे आले. सकारात्मक कारणामुळे जुळून आलेले हे समाजमन समाजाच्या कल्याणासाठीचे संजिवनीच आहे.

 

- विजय माने

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@