काँग्रेसवर चंद्रपूरचा उमेदवार बदलण्याची नामुष्की

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |


प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा ‘तो’ शोक कारणीभूत ठरल्याची चर्चा


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसवर ओढवलेली संकटांची नामुष्की काही केल्या कमी होताना दिसत नाही. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नाराजीनंतर काँग्रेसवर चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. तसेच, मराठवाड्यातील नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील स्वपक्षावर नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण व विदर्भातील एका काँग्रेस कार्यकर्त्यादरम्यान झालेल्या भ्रमणध्वनी संभाषणाची एक ध्वनिफीत सध्या गाजत आहे. काँग्रेसमधील सूत्रांन दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी चव्हाण व अनेकजण आग्रही होते. परंतु, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या सांगण्यावरून येथील उमेदवारी विनायक बांगडे यांना देण्यात आली. यानंतर येथील अनेक कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यांना उत्तर देताना, चव्हाण यांनी ‘माझे कोणीही ऐकत नाही, मीच राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहे’ असे उत्तर दिल्याने काँग्रेससह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

 

अशोक चव्हाण यांनी या सर्व वृत्तांचा इन्कार केला असला तरीही प्रदेशाध्यक्षपदावरील नेत्याच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसत असून यामुळे चंद्रपूरची उमेदवारी बदलण्यात आली आहे. रविवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत चंद्रपूरमध्ये बांगडे यांचे नाव बदलून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे चव्हाण यांच्या दबावापुढे अखेर केंद्रीय काँग्रेस झुकल्याचे दिसत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांची नाराजी, त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा भाजपप्रवेश व उमेदवारी, अहमदनगरसह अनेक जागांवरून सहयोगी राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे वितुष्ट, रत्नागिरीत बांदिवडेकर यांच्यावर थेट सनातन संस्थेशी संबंध असल्याचे आरोप यांसह अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस सध्या संकटांच्या मालिकेला सामोरी जात आहे. अशातच आता आधी घोषित केलेली उमेदवारी बदलण्याची वेळ हतबल काँग्रेसवर आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@