जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांचा राजीनामा

    25-Mar-2019
Total Views |


नवी दिल्ली : विमान वाहतूक व्यवसायात हेलकावे खात असलेल्या जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गोयल हे कंपनीच्या मुख्यप्रवर्तकांपैकी प्रमुख होते. कंपनीची आर्थिक बाजू कोलमडू लागल्यावर गोयल यांनी स्वतःहून राजीनामा देण्याचा प्रस्ताव घेतला आहे.

 

१९९३ साली नरेश गोयल यांनी त्यांच्या पत्नीसह जेट एअरवेजची सुरुवात केली होती. आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना भावूक पत्र लिहीले आहे. आपण कंपनीसाठी कुठलेही बलिदान देण्यास तयार आहोत, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. पदावरून दूर झाल्यानंतर गोयल यांच्याकडील ५१ टक्के समभाग एअर लाईन्समध्ये विलीन करू शकतात.

 

गोयल यांच्या राजीनाम्यामुळे कंपनीला आर्थिक डबघाईतून सावरण्यासाठीची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांची असणार आहे. कंपनीत सर्व समभागांच्या विलीनीकरणानंतर जेट एअरवेजला आपतकालीन निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीवर एकूण २५ बॅंकांतील सात हजार कोटींचा कर्जाचा बोजा आहे. एकेचाळीसहून अधिक विमाने पट्टा न दिल्याने उभी आहेत. कंपनीची स्थिती नाजूक मानली जात आहे.

 

कंपनीचा शेअर उसळला

नरेश गोयल यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारात जेट एअरवेजचा शेअर १५.४६ टक्क्यांनी उसळला. कंपनीला कर्जाच्या डबघाईतून बाहेरपडण्यासाठी आणि आर्थिक चणचणीतून बाहेर काढण्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याने शेअरमध्ये खरेदी दिसून आली. कर्जदारांसह सोमवारी झालेल्या बैठकीत गोयल यांच्या मालकीतील शेअर विलीनीकरण करून कर्जफेडण्यावर योजना आखली जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार कंपनीला दीड हजार कोटींची रक्कम लगेचच मिळू शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat