अखेर निरूपमांना हटवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019
Total Views |



मुंबई : मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविरोधात पक्षांतर्गत असलेल्या प्रचंड नाराजीची परिणती अखेर निरूपम यांना या पदावरून हटवण्यात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दक्षिण मुंबईचे माजी खासदार आणि निरूपम यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच, निरूपम यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

 

सोमवारी सायंकाळी काँग्रेसकडून या नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. गेली साधारण तीन वर्षे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या संजय निरूपम यांच्याबाबत काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. माजी केंद्रीय मंत्री गुरूदास कामत, माजी खासदार मिलिंद देवरा, प्रिया दत्त यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी निरूपम यांच्या कार्यशैलीबाबत कधी जाहीर तर कधी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. तसेच, या नेत्यांकडून निरूपमांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना असंख्य पत्रेही लिहिण्यात आली होती. मिलिंद देवरा व प्रिया दत्त यांनी तर लोकसभा निवडणुकाही न लढण्याचा पवित्रा घेतला होता. अखेर, हा पक्षांतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसने मुंबईचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

विशेष म्हणजे, निरूपम यांच्याविरोधात बंडाचा झेंडा अनेकदा फडकवणारे दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राहुल गांधी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र प्रसिद्ध करत या निर्णयाविषयी माहिती दिली.

 

निरूपमांच्या वाट्याला उत्तर-पश्चिम मुंबई

 

लोकसभा निवडणुकीसाठी संजय निरूपम यांना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने सोमवारी आपली दहावी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली. निरूपम हे खरेतर २००९ मध्ये मुंबई उत्तरमधून अवघ्या ५ हजार मतांनी विजयी झाले होते. परंतु, २०१४ मध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा तब्बल साडेचार लाख मतांनी दारूण पराभव केला. त्यानंतर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून लढण्यास निरूपम यांच्यासह काँग्रेसपैकी कुणीच तयार होत नव्हते. अखेर निरूपम यांना शेजारचा मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघ देण्यात आला असून त्यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांच्याशी होणार आहे.

 

उत्तर-पश्चिममध्येही गटबाजीचा फटका बसणार?

 

मुंबई उत्तर-पश्चिममधून २००९ ते २०१४ या काळात काँग्रेसचे दिग्गज नेते गुरूदास कामत यांनी प्रतिनिधित्व केले होते. कामत यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यापूर्वी कामत यांचाही निरूपम यांच्याशी वाद झाला होता व कामत यांनी अनेकदा निरूपम यांच्याविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती. कामत यांचे निधन झाले असले तरी आजही या मतदारसंघात काँग्रेसअंतर्गत कामत यांना मानणारा वर्ग प्रबळ असल्याने तो निरूपम यांना सहकार्य करेल का, असाच प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. तथापि, संजय निरूपम यांनी उत्तर-पश्चिममधून उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आपण येथून लढण्यास अनेक वर्षांपासून उत्सुक होतो, अशी प्रतिक्रिया दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@