खोटेनाटे आरोप करण्याची चढाओढ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2019   
Total Views |


 


भाजपला अनुकूल असे जे वातावरण आहे, त्यामुळे भाजपकडे अनेक नेते मोठ्या प्रमाणात वळत आहेत. महाराष्ट्रात तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक तरुण नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. विरोधक अनेक खोटेनाटे आरोप करीत सुटले आहेत आणि पुढील काळात आणखी करीत राहणार, हे स्पष्टपणे दिसत आहे.


लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने विविध पक्षांकडून जोरदार प्रचार मोहिमा आखल्या जात आहेत. निवडणुकीत उतरलेले विरोधी पक्ष अपप्रचाराचा अवलंब करून भाजपची बदनामी करण्यात गर्क आहेत. भाजपने सर्व विरोधकांच्या पुढे जे आव्हान उभे केले आहे, ते आव्हान पेलण्याची क्षमता विरोधकांमध्ये दिसत नसल्याने ते सैरभैर झाले आहेत. त्यातून खोटेनाटे आरोप करण्याचा सपाटा या पक्षांच्या नेत्यांनी लावला आहे. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अरविंद केजरीवाल यांच्यासह सॅम पित्रोदा यांच्यासारख्या व्यक्तीचाही समावेश आहे. गांधी घराण्याची तळी उचलण्यामध्ये ज्यांची हयात गेली, त्यांच्याकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार म्हणा! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि स्वत:ला राजकारण धुरंधर समजत असलेल्या शरद पवार यांनीही अपप्रचाराचा आधार घेतल्याशिवाय आपली काही खैर नाही, हे लक्षात घेतले असल्याचे दिसून येते. मोदी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची जी कृती केली, त्यास आपण दिलेला सल्ला कारणीभूत ठरला, हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. पण, या माजी संरक्षणमंत्र्यांना आपल्या वक्तव्यातील फोलपणा लक्षात आल्याने सारवासारव करून, ‘आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला,’ असा खुलासा त्यांना करावा लागला. राजकारणात मुरलेले शरद पवार राहुल गांधी यांची री ओढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून आरोप करणार नाहीत, अशी अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली आहे.

 
शरद पवार यांनीही आता स्वत:ला ‘चौकीदार म्हणविणारेच खरे चोर आहेत,’ असा आरोप केला. ‘देशाच्या चौकीदारानेच देश खाल्ला,’ असा आरोप करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पंतप्रधानांवर शरद पवार यांनी केलेले आरोप पाहता पवार हेही राहुल गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसल्याचे दिसून येतेराजीव गांधी यांचे निकटचे सहकारी आणि आता राहुल गांधी यांचे मार्गदर्शक असलेले सॅम पित्रोदा यांनी, भारतीय हवाई दलाने पुलवामा घटनेनंतर जो ‘एअर स्ट्राईक’ केला, त्याचे पुरावे सरकारने द्यावेत, अशी मागणी केली आहे. ‘एअर स्ट्राईक’ बाबत सरकारकडून, सेनादलाकडून जी माहिती देण्यात आली, त्यावर त्यांचा विश्वास नाही! त्यांचा विश्वास ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकी वृत्तपत्रावर! त्याचा हवाला देऊन सरकारला, हवाई दलाला खोटे पडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न या महाशयांनी केला. निवडणूक प्रचारास वेग येऊ लागला की, असे आरोप अधिक प्रमाणात होणार, हे उघड आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास ते कायमचे पंतप्रधानपदावर राहतील आणि देशामध्ये पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे केजरीवाल महाशयांनी म्हटले आहे. विरोधकांना आपला पराभव डोळ्यांपुढे दिसू लागल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत का?
 

आणीबाणीमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात असताना, ज्या नरेंद्र मोदी यांच्यासकट संघ परिवाराच्या असंख्य कार्यकर्त्यांनी लोकशाहीसाठी लढा दिला, इंदिरा गांधी यांची हुकूमशाही राजवट उलथवून टाकली आणि भारतीयांचा केवळ लोकशाहीवरच दृढ विश्वास असल्याचे दाखवून दिले, त्यांच्याबद्दल केजरीवाल यांनी काहीही बरळावे? मोदी सरकारविरुद्ध प्रचार करण्यासारखे हाती काहीच नसल्याने आणि जे काही आरोप केले जात आहेत, त्यावर जनता विश्वास ठेवण्यास तयार नसल्याने केजरीवाल असे आरोप करीत सुटले आहेत. योगायोग पाहा. केजरीवाल यांनी असा आरोप केला असतानाच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही, ‘मोदी आणखी पाच वर्षे सत्तेत राहिल्यास ते देशातील लोकशाही संपुष्टात आणून त्या ठिकाणी हुकूमशाही आणतील,’ असा आरोप केला. सर्व विरोधक भाजप, मोदी यांच्याविरुद्ध प्रचार करताना एका सुरात गात आहेत की काय असे वाटू लागले आहे! मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ अशी देशव्यापी मोहीम हाती घेतल्यानंतर त्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो प्रतिसाद पाहून विरोधकांचे पित्त पुन्हा खवळले. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि ज्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे, त्या प्रियांका गांधी यांनी, चौकीदार फक्त श्रीमंतांचीच चाकरी करीत असल्याचा आरोप केला. ज्या भाजप सरकारने देशातील गरीब जनतेच्या कल्याणाच्या विविध योजना हाती घेतल्या, देशातील शेतकर्‍यांच्या भल्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले, त्या सरकारवर प्रियांका गांधी यांच्याकडून जो आरोप करण्यात आला आहे, त्यावर जनता विश्वास ठेवेल? ज्या काँग्रेस पक्षाची हयात भ्रष्टाचारात गेली, ज्या पक्षाने घराणेशाही जोपासण्यापलीकडे काही केले नाही, ज्या पक्षाचे नेते अनेक गैरव्यवहारांत अडकले आहेत, तर काही जामिनावर आहेत, त्या पक्षाकडून असे खोटेनाटे आरोप केले जात आहेत हे जनता पुरते ओळखून आहे.

 

काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू घसरत चालल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्या पक्षाकडून भाजपवर करण्यात आलेला असाच एक खोटा आरोप. निवडणूक जवळ आली की कोणती तरी जुनी प्रकरणे शोधल्याचा आव आणायचा आणि आरोप करीत सुटायचे, असा काँग्रेसचा खाक्या आहे. कर्नाटकचे भाजप नेते येडीयुरप्पा यांनी भाजपमधील विविध नेत्यांना १८०० कोटी रुपये लाच दिली होती, असा भन्नाट आरोप काँग्रेसने केला. येडीयुरप्पा आणि भाजपने या आरोपाचे त्वरित खंडन केले. आरोप सिद्ध करण्याचे आव्हानही काँग्रेसला दिले. मात्र, भाजपने खरा आरोप केला तरी तो काँग्रेसला सहन होत नसल्याचे दिसून येते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगापासून आपल्या उत्पन्नाची माहिती दडवून ठेवल्याचा आरोप भाजपने केला आहे. आपले आरोप खोटे असल्यास आपल्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा, असे आव्हान भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिले. पण मूळ मुद्द्यावरून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी भाजप असे आरोप करीत असल्याचे सांगून काँग्रेसने त्या विषयास बगल दिली आहे. निवडणूक प्रचारास गती आली आहे. एकीकडे भाजप, नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे चेहरा नसलेले विरोधक असे चित्र दिसत आहे. विरोधक अजून ऐक्य निर्माण करू शकलेले नाहीत. ममता बॅनर्जी आता काँग्रेसला जवळ करतील, असे दिसत नाही. कारण, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले आहे. त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. विरोधक चाचपडत आहेत तर दुसरीकडे, भाजपला अनुकूल असे जे वातावरण आहे, त्यामुळे भाजपकडे अनेक नेते मोठ्या प्रमाणात वळत आहेत. महाराष्ट्रात तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक तरुण नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. विरोधक अनेक खोटेनाटे आरोप करीत सुटले आहेत आणि पुढील काळात आणखी करीत राहणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. असे असले तरी विरोधकांची दयनीय अवस्था पाहता, त्यांच्या विविध नेत्यांकडून जी विविध स्वप्ने पाहिली जात आहेत ती प्रत्यक्षात येण्याची मुळीच चिन्हे नाहीत, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@