ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |

 


नाशिक : संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले, ते ७३ वर्षांचे होते. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता तसेच त्यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. यासोबतच विविध गौरव ग्रंथांमध्ये त्यांचे संशोधन लेखनही प्रसिद्ध झाले आहे.

 

डॉ. पाठक यांचे 'कल्लोळ अमृताचे' हे ज्ञानेश्वरीवरील अभ्यासपूर्ण सदर दै. मुंबई तरुण भारतमध्ये ऑगस्ट २०१३ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत वाचकांच्याही विशेष पसंतीस पडले. डॉ. पाठक यांची ओघवती लेखन शैली आणि मार्मिक विश्लेषण यामुळे हा सदराचा वाचकवर्गही मोठा होता. १९७८साली पुणे विद्यापीठातून त्यांनी कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य या विषयावर पी.एचडी पूर्ण केली होती. निरंजनाचे माहेर, अंगणातले आभाळ (आत्मकथन), नाचू किर्तनाचे रंगी (प्रबंध) आणि येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ या त्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच त्यांना संत ज्ञानदेव पुरस्कार, चतुरंग पुरस्कार, संत विष्णुदास कवी पुरस्कार, डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

डॉ. पाठक यांच्या निधनाने अनेक जणांनी दुःख व्यक्त केले. राज्याचे शिक्षणमंत्री यांनी विनोद तावडे यांनी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासू वक्ते हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "संत साहित्याचे अभ्यासक आणि पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख डॉ. यशवंत पाठक यांच्या निधनाने मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासू वक्ते हरपले आहेत. आजची पिढी आणि संत साहित्य यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे डॉ. पाठक होते."

 

डॉ. यशवंत पाठक यांची ग्रंथसंपदा

 

चंद्राचा एकांत, आनंदाचे आवार, कीर्तन प्रयोग, पहाट सरी, चंदनाची पाखर, येणे बोधे आम्हा असो सर्व काळ, संचिताची गोजागिरी, ब्रम्हगिरीची सावली, नाचू कीर्तनाचे रंगी, मोह मैत्रीचा, अंगणातले आभाळ, आभाळाचं, अनुष्ठान, मनाच्या श्लोकाचे मर्म

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@