जीवन त्यांना कळले हो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |


 


पालकत्वाबद्दल 'भूमिका' हा शब्द वापरताना माझ्या मनात एक विचार आला. एकाच कलाकाराने वेगवेगळ्या नाटकांतून वा चित्रपटांतून वेगवेगळी पात्रे उभी करावीत, तसे मुलांच्या वाढत्या वयानुसार पालकांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रवेश करावा लागतो.


"तुझ्या लेखांमधले बहुतांश सल्ले पालकांनाच का असतात? मुले कधीच चुकत नाहीत का?" माझ्या लेखांचे नियमित वाचन करणाऱ्या आणि छान समीक्षकाची भूमिका पार पडणाऱ्या आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने मला विचारले. "आपल्या माध्यमातून मुलांना या जगात आणण्याचा निर्णय कोणाचा असतो?" मी प्रतिप्रश्न केला. यावर आमची चर्चा रंगली. त्यातून 'पालकत्व' ही आयुष्यभराची 'कमिटमेन्ट' आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. चुका करत शिकत राहणे ही मुलांची उपजत प्रवृत्ती. म्हणूनच, पालकांची भूमिका जास्त समजूतदार आणि आश्वासक असायला हवी. अर्थात, हा विचार करताना पालकांनी सतत परिपूर्ण, उत्कृष्ट असावे अशी अपेक्षा करणे वेडेपणाचे होईल. "There is no need to be perfect to inspire others. Let people get inspired by how you deal with your imperfections.'' Robert Tew यांचा हा विचार पालकांचे मुलांच्या आयुष्यातील कार्य योग्यपणे विशद करून सांगतो.

 

पालकत्वाबद्दल 'भूमिका' हा शब्द वापरताना माझ्या मनात एक विचार आला. एकाच कलाकाराने वेगवेगळ्या नाटकांतून वा चित्रपटांतून वेगवेगळी पात्रे उभी करावीत, तसे मुलांच्या वाढत्या वयानुसार पालकांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रवेश करावा लागतो. त्याचबरोबर आपला मूळ स्वभावदेखील जपावा लागतो. ही कसरत आहे खरी, पण 'पालकत्व'सुद्धा मानवाच्या विकासाची, आत्मोन्नतीची एक वाट नाही का? 'स्वतःच्या गरजा, इच्छा, अपेक्षा यापलीकडे जाऊन आपल्यावर अवलंबून असणाऱ्या जीवाच्या आनंदाचा, समाधानाचा विचार अधिक महत्त्वाचा मानून आपल्या आयुष्याचा मार्ग आखणे.' हे सर्वच आर्थिक-सामाजिकस्तरांतील, पालक करत असतात. हे साधताना आधुनिक काळातील, विभक्त कुटुंबातील, नोकरी/व्यवसाय करणाऱ्या, जगातील नवनवीन पर्यायांना सामोरे जाणाऱ्या पालकांसाठी कधीकधी खूप आव्हानात्मक होते. या प्रवासात काही वेळा 'आपण कमी पडतोय' अशी भावना पालकांच्या मनात येते, असा माझा केवळ व्यावसायिकच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातीलही अनुभव आहे. अशा वेळी स्वत:ला कमी न लेखता वारंवार संधी देऊन 'learn, unlearn आणि re-learn' करत राहणे महत्त्वाचे.

 

विकासाचे मानसशास्त्र हा केवळ गर्भावस्थेपासून सुरू होऊन वयाच्या अठराव्या वर्षापर्यंतच्या विकासाचा घेतलेला आढावा नसून माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे यात मुलांबरोबर कुटुंबातील, समाजातील सर्वांच्या उन्नतीचा विचार अंतर्भूत आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेले मानवी आयुष्याचे 'ब्रह्मचर्य,' 'गृहस्थ,' 'वानप्रस्थ' आणि 'संन्यास' हे चार आश्रम विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे अतिशय सविस्तर वर्णन करतात. प्रत्येक आश्रमाच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि अधिकार सामाजिक सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विस्ताराने वर्णन केलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रमात विद्या ग्रहण करून सक्षम बनण्याची जबाबदारी व उदरभरणासाठी कुटुंबावर, समाजावर अवलंबून असण्याचा अधिकार दिलेला आहे. पुढे गृहस्थाश्रमात स्वत:च्या, कुटुंबाच्या व काही अंशी समाजाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आणि सद्सद्विवेकाने निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो. वानप्रस्थाश्रम प्रामुख्याने पुढच्या पिढीवर निर्णयस्वातंत्र्य सोडण्याची जबाबदारी व आयुष्यातील बऱ्या-वाईट अनुभवांतून शिकलेले शहाणपण संयमितपणे संक्रमित करण्याचा अधिकार देतो. संन्यासाश्रमाद्वारे जीवनक्रमातील शेवटच्या टप्प्यावर मिळालेली संसाराच्या सर्व पाशातून मुक्त होऊन पूर्णत: आत्मोन्नतीच्या दिशेने वाटचाल करण्याची जबाबदारी व अधिकार ही मानवी आयुष्याच्या प्रवासाची परिसीमा आहे असे मला वाटते.

 

या आश्रमांपाठीमागचे तत्त्वज्ञान लक्षात घेतले, तर आजच्या काळातही ते किती अनुकूलपणे लागू पडतात हे लक्षात येते. व्यापक दृष्टीने पालकत्वाच्या संकल्पनेचा विचार केला, तर तो अधिकाधिक सर्वसमावेशक होत जातो. 'ब्रह्मचर्यामध्ये स्वतःचे, गृहस्थाश्रमात कुटुंबाचे, वानप्रस्थाश्रमात समाजाचे व संन्यासाश्रमात आपल्यामध्ये वसलेल्या वैश्विक ऊर्जेचे पालकत्व स्वीकारत जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने विकास साधणे' हा या संकल्पनेचा गाभा आहे. बा. भ. बोरकरांच्या कवितेमध्ये त्यांनी म्हटले आहे, 'मी-पण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो...' या ओळींमध्ये मला स्वतःपलीकडे पाहणारे, प्रसंगी अहंकार बाजूला ठेवणारे, पक्व फळाचे माधुर्य व मृदुता अंगिकारणारे आणि हे सारे सहज वृत्तीने स्वीकारणारे 'पालकत्व' दिसून येते.

 

- गुंजन कुलकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@