एक्स्पायरी डेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019   
Total Views |



स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसचीएक्स्पायरी डेटझालेली होती आणि तरीही त्याचा पक्ष बनवून जनतेची जी दिशाभूल करण्यात आली. त्यातून मग घराणेशाही उदयास आली. आता त्या घराणेशाहीची ‘एक्स्पायरी डेट’ उलटून गेली आहे. त्याचाही बोभाटा करणे आवश्यक आहे.


लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या फेरीतील मतदारसंघातले उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू झाले आहे आणि अजून अनेक पक्षांना आपले तेथील उमेदवारही निश्चित करता आलेले नाहीत. अशावेळी काँग्रेसचा जुनाच हुकमी पत्ता म्हणून राहुल गांधींनी आपल्या भगिनीला मैदानात आणले आहे. तसे बघायला गेल्यास प्रियांका गांधी पूर्वीदेखील मैदानात होत्या आणि अनधिकृतपणे पक्षकार्य करीत होत्या. त्यांनी मागील १०-१५ वर्षांत अमेठी व रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांत आई व भावासाठी पक्षाचे कार्य केलेले आहे. तेवढेच नाही, तर राहुलने गडबड केली की सारवासारव आणि सावरासावर करण्याचीही पराकाष्ठा केलेली आहे. त्याचा कधी उपयोग झाला नाही, ही गोष्ट वेगळी. पण, यावेळी राहुलनी अधिकृतपणे सरचिटणीसाचा दर्जा देऊन आपल्या भगिनीला उत्तरप्रदेशच्या राजकारणात उतरवले. कित्येक वर्षांपासून पुरोगामी माध्यमे व पत्रकार अशा निर्णयाच्या प्रतीक्षेतच होते. त्यामुळे अशा लोकांनी विनाविलंब प्रियांकाचा करिष्मा सांगायला सुरुवात केली. त्यांचा अपेक्षाभंग होऊ नये याची काळजी त्या महिलेला घेण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. रोज उठून मोदींना चार शिव्या हासडल्या, मग पुरोगामी व्यक्तींची पचनसंस्था व्यवस्थित काम करत असते. त्याला हातभार लावण्यासाठी प्रियांकांना काहीबाही बोलणे भाग आहे. साहजिकच पूर्व उत्तरप्रदेशचा दौरा त्यांनी सुरू केल्यावर असे काही चटपटा बोलणे भाग होते आणि त्यांनीही कोणाला निराश केले नाही. अकस्मात त्यांना राहुलच्या जुन्या गुरुजी दिग्गिराजांचे शब्द आठवले आणि त्यांची उत्पादित मालावर ‘एक्स्पायरी डेट’ असल्याची थिअरीही आठवली. त्यांनी मोदींना इशारा देऊन टाकला की, ‘मोदी सरकारचीही एक्स्पायरी डेट आलेली आहे.’ तमाम पुरोगामी पत्रकार खूश झाले आणि ‘एक्स्पायरी मॉलचालवणाऱ्यांची ही जाहिरात त्यांनी अगत्याने मुखपृष्ठावर छापून टाकली.

 

मोदींच्या भाषणात आपण पाच वर्षांत केलेले काम सांगताना नेहमी ७० वर्षांचा आधीचा कारभार आणि आपली कारकीर्द असा उल्लेख येत असतो. त्यावर शेरा मारताना प्रियांका म्हणाल्या, “७० वर्षांचे रडगाणे गाण्यालाही एक्स्पायरी डेट असते.” किती नेमके आणि बोचरे शब्द आहेत ना? खरेच आहे. तशी जगातल्या कुठल्याही सजीव वा उत्पादित गोष्टीला ‘एक्स्पायरी डेट’ असते. ती अवघ्या पाच वर्षे वापरलेल्या मोदी नावाच्या सरकारसाठी असेल, तर १२५ वर्षे वापरून निकामी झालेल्या काँग्रेस पक्षालासुद्धा असणार ना? की काँग्रेस पक्ष अजरामर असल्याचा काही वैज्ञानिक पुरावा आहे? ज्या पक्षाच्या सरचिटणीस म्हणून प्रियांका आता अधिकृतपणे राजकारणामध्ये आलेल्या आहेत, त्या पक्षाची ‘एक्स्पायरी डेट’ कधीच संपून गेली आहे. हे प्रियांकांच्या लक्षात कसे आलेले नाही? १९६७ पासून सामान्य मतदार काँग्रेसला भंगारात टाकायला उतावळा झालेला आहे. त्यासाठी आघाडीचे वा गठबंधनाचे विविध प्रयोग होऊन गेलेले आहेत. पण, प्रत्येकवेळी अधिकाधिक गलितगात्र झालेल्या काँग्रेसला नवी संजीवनी देण्यासाठी पुरोगाम्यांनी सतिव्रताचा आविष्कार केल्यानेच प्रियांका सरचिटणीस होण्यापर्यंत काँग्रेस तग धरू शकली. आपला पक्ष व त्याची उपयुक्तता कधीच कालबाह्य होऊन गेलेली आहे, त्याचा थांगपत्ता पक्षाध्यक्ष राहुलना लागलेला नाही आणि ते त्याच ‘एक्स्पायरी’ होऊन गेलेल्या मालाचा ‘मॉल’ थाटून बसलेले आहेत. तिथे नवनवे विक्रेते आणून ठेवल्यास आपला ‘एक्स्पायरी’ होऊन गेलेला माल पुन्हा जोरदार खपू शकेल, अशी त्यांची आशा आहे. काही पुरोगामी विचारवंत व पत्रकारांची तशीच अपेक्षा आहे. त्यामुळे प्रियांकांना मैदानात आणले गेलेले आहे. साहजिकच आपल्या दुकानातला माल कसा नवा आणि आधुनिक आहे, त्याचा त्यांनी प्रचार जरूर करावा. पण, ‘एक्स्पायरी डेट’ असले शब्द चुकूनही बोलायचे नसतात. हे त्यांना कोणी सांगायचे?

 

१९७०च्या दशकात युवक नेते म्हणून उदयास आलेले व युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले इंदिराजींच्या काळातील ‘युवक’ अजून काँग्रेसमध्ये मोक्याच्या जागा अडवून बसलेले आहेत. आनंद शर्मा, तारीक अन्वर, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद अशा युवकांची ‘एक्स्पायरी डेट’ काय असते? तेच अजून नागोबा बनून बसले आहेत. त्यांच्याकडे प्रियांकांनी कधी वळून तरी बघितले आहे काय? नरेंद्र मोदी राजकारणात वा निवडणुकांच्या आखाड्यातही नव्हते, त्या कालखंडातले हे नव्या दमाचे काँग्रेस नेते लोकसभा मंत्रिपदे भूषवून मोकळे झालेले आहेत. त्यांच्यावर कुठे ‘एक्स्पायरी’ची तारीख छापलेली आहे किंवा नाही, याची झाडाझडती प्रियांकाने घेतलेली आहे का? असले शब्द वापरण्यापूर्वी जरा आपल्या दुकानातला माल तपासून तरी घ्यायचा ना? पाच वर्षांपूर्वी खुद्द दिग्विजय सिंग यांनी एका काँग्रेस अधिवेशनात म्हटले होते, “राजीव गांधींनी राजकारणात आणलेल्या अनेक नेत्यांची आता ‘एक्स्पायरी डेट’ उलटून गेलेली आहे. त्यांनी बाजूला झाले पाहिजे.” अशा किती लोकांना राहुलनी उचलून कचऱ्यात फेकले आहे? सचिन पायलट वा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी निवडणुका जिंकून दिल्या आणि तिथे मुख्यमंत्री म्हणून कोणाला आणून बसवले गेले? जरा तिकडे वळून बघितले असते, तर प्रियांकांना ‘एक्स्पायरी डेट’ शब्दाचा अर्थ उमजला असता. अजून प्रत्येक मोठ्या समारंभात हाताला धरून मनमोहन सिंग यांना आणले व उठले-बसवले जाते. त्यांचे वय विशी-तिशीतले आहे का? राहुलच्या मागून पाय मुडपत चालणारे मोतीलाल वोरा पाळण्यातले आहेत का? एकूण काँग्रेसची राजकीय भूमिका वा नीती-धोरणे कुठल्या जमान्यातील आहेत? सगळा कारभार कालबाह्य झाल्यामुळेच मतदाराने शेवटी अख्खा माल उचलून भंगारात फेकून दिला, त्याला आता पाच वर्षे उलटून गेली आहेत आणि नवा विक्रेता ‘एक्स्पायरी डेट’च्या गोष्टी सांगतो आहे.

 

स्वातंत्र्यलढा वा त्यानंतरची दोन दशके झाल्यापासून काँग्रेसची ‘एक्स्पायरी डेट’ संपून गेलेली आहे. वास्तविक कॉँग्रेसला सर्वाधिक पूजनीय असलेल्या महात्माजींना ७० वर्षांपूर्वी ती ‘एक्स्पायरी डेट’ नेमकी वाचता आलेली होती. म्हणूनच त्यांनी तेव्हाच हा सगळा माल किंवा मॉल भंगारात काढण्याची शिफारस केलेली होती. पण, पणजोबा मोठा चतुर होता. त्याने त्याच भंगाराला रंगरंगोटी करून ‘काँग्रेस’ नावाच्या पक्षाचे दुकान थाटले आणि मागील ७० वर्षे नवा माल किंवा ताजा माल म्हणून ‘एक्स्पायरी डेट’ होऊन गेलेला माल दीर्घकाळ भारतीय जनतेच्या माथी मारला गेलेला आहे. असा कालबाह्य माल किंवा उपयुक्तता संपलेल्या गोष्टी वापरातून व व्यवहारातून वेळीच बाजूला केल्या नाहीत, तर व्यक्तीला वा समाजाला आपायकारक असतात. म्हणून तर ओरडून बोंबलून त्याची ‘एक्स्पायरी डेट’ संपली असल्याचे पुन्हा पुन्हा सांगावेच लागत असते. तशी बोंब ठोकण्याची कधी ‘एक्स्पायरी’ असू शकत नाही. कारण, वेळोवेळी कालचा ताजा माल आज कालबाह्य होऊन गेलेला असतो. त्याची सामाजिक जाणीव-जागृत ठेवण्यासाठीच बोंबा ठोकाव्या लागत असतात. मोदी तेच काम करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसची ‘एक्स्पायरी डेट’ झालेली होती आणि तरीही त्याचा पक्ष बनवून जनतेची जी दिशाभूल करण्यात आली. त्यातून मग घराणेशाही उदयास आली. आता त्या घराणेशाहीची ‘एक्स्पायरी डेट’ उलटून गेली आहे. त्याचाही बोभाटा करणे आवश्यक आहे. ज्या दिवशी उरलीसुरली काँग्रेस त्या घराणेशाहीच्या गुलामीतून मुक्त होईल, त्यादिवशीच अशा बोंबा ठोकण्याची ‘एक्स्पायरी डेट’ येईल; अन्यथा तोपर्यंत अशा काँग्रेस कालबाह्य झाल्याच्या बोंबा हा ताजा माल असेल आणि त्याची उपयुक्तता तितकीच प्रभावी असेल. प्रियांकांना जितक्या लवकर त्याचे भान येईल तितके बरे. अर्थात, ‘एक्स्पायरी’ झालेल्या वस्तू आपण होऊन कुठे बाजूला होतात? कोणी तरी ते काम करावे लागते. मोदी काय वेगळे करीत आहेत का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@