‘स्नेहादर’ जपणारी वृक्षपेंटिंग्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |


 


झाडांच्या आकारांतील नैसर्गिक तसेच ऋतुचक्राप्रमाणे बदलणारे रंग तेव्हा प्रतिनिसर्ग निर्मितीच्या भावनेने चित्रकर्तीने चितारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या वृक्षराजींनाच आनंद झालेला असेल. झाडांचे अन्कट आकार आणि रंगांतील निसर्गानुसारी लेपन हे स्नेहल यांच्या रंगचित्रांचं वैशिष्ट्य ठरावं.


झाड गूढ झाड गूढ,

ओल्या प्रकाशाची चूड...

 

कविवर्य बा. भ. बोरकर यांची झाडाचे महत्त्व सांगणारी कविता किंवावृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।हे संत तुकारामांच्या अभंगातील वृक्षांबद्दलचं नातं इतकं की, ‘सोय जाणील तो सोयरा’ असं आपल्याकडे पूर्वी बोललं जायचं... तीच आपली सोय वृक्षांकडून पाहिली जाते. म्हणून संत तुकारामांनी वृक्षांना ‘सोयऱ्यां’ची उपमा दिली. संत सावता माळी यांनी दैनंदिन आहारातील पालेभाज्यांनाच ‘विठाई’च्या श्रद्धेने अन् नात्याने पाहिले. ‘कांदा-मुळा-भाजी अवघी विठाई माझी’ म्हणत निव्वळ नात्यांचं श्रद्धेच्या रुपात कसं परिवर्तन होतं, ते सांगितलं. कवयित्री इंदिरा संत म्हणतात, ‘जरी वेधिले चार भिंतींनी, या वृक्षांची मजला संगत...’ असे हे वृक्ष म्हणजे एखाद्या साधकाप्रमाणे सत्पुरुषच असतात. त्यांच्यावर कुऱ्हाडीचा घाला घालणारा आणि त्यांना लहानपणापासून पाणी, खत इ. पुरवणारा... दोघांनाही त्याची सावली, फळं, फुलं, सारं-सारं देतात. किती मोठा त्याग असतो त्यांचा! मग ते सत्पुरुषच ना...! अशा उपकारकर्त्या वृक्षांचा ऱ्हास होतो आहे. मानवाने बेसुमारपणे जंगलतोड सुरू ठेवली आहे. वैराण वाळवंटांची संख्या वाढत आहे. म्हणून म्हणदेखील पडली आहे की, ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल.’ जळणाच्या लाकडापासून तर इमारतीच्या लाकडांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या वृक्षांमुळे जमिनीवरील वृक्षसंख्या कमी-कमी होत जाऊन जमिनीची धुप होऊ लागली आहे. मग हिरवळीचे वाळवंट होण्यास कितीसा वेळ लागणार?

 

 
 

या वैचारिक गर्ततेत चिंता आणि त्यानंतर चिंतन करून भावना व्यक्त न केल्या तरच नवल...! होय, मी चित्रकारांच्या भावविश्वात रमलेल्या एका चित्रकर्तीच्या प्रदर्शनाबद्दल लिहितो आहे. ज्यांच्या नावातच ‘स्नेह’ आहे आणि ज्या वृक्षमैत्रीच्या नात्याच्या घट्ट मैत्रीनं ‘पागल’ मी म्हणणार नाहीच, परंतु वेड्यापिशा झालेल्या आहेत. अशा एका प्रथितयश चित्रकर्तीच्या कलाप्रदर्शनाने ‘वृक्षमैत्री’च्या संवेदनाक्षम विषयाला आल्हाददायक स्पर्श झालेला आहे. पुण्यातील चित्रकार स्नेहल पागे यांचे ‘ओल्या प्रकाशाची चूड’ या मथळ्याखालील प्रदर्शन पाहण्याचा जरा दुर्मीळच असा योग आला. दि. २५ ते ३१ मार्च या कालावधीत जहांगिर कलादालनाच्या ‘हिरजी हॉल’मध्ये ‘Mysterious Tree’ सुरू होत आहे. झाडांच्या आकारांतील नैसर्गिक तसेच ऋतुचक्राप्रमाणे बदलणारे रंग तेव्हा प्रतिनिसर्ग निर्मितीच्या भावनेने चित्रकर्तीने चितारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या वृक्षराजींनाच आनंद झालेला असेल. झाडांचे अन्कट आकार आणि रंगांतील निसर्गानुसारी लेपन हे स्नेहल यांच्या रंगचित्रांचं वैशिष्ट्य ठरावं.

 

 
 

बऱ्याचदा वृक्षराजींप्रति आदरभाव, कृतज्ञताभाव व्यक्त करताना शब्दांची मदत घेतल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो, वाचतो, ऐकतो. मात्र, वृक्षांप्रति आदरभाव व्यक्त करताना रंगाकारांची मदत घेतली जाते, असे क्वचितच घडते. रंगलेपनातील वास्तववादीपणा, पुण्याच्या अभिनव कला आणि अमेरिकेतील ‘स्टुडिओ इन्कामिनाटी फिलाडेल्फियायेथे कलाशिक्षण घेताना केलेले आणि झालेले निसर्गाचे निरीक्षण, निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या त्यागी आणि व्रतस्थ जीवन जगणाऱ्या वृक्षाला सत्पुरुषाप्रमाणे आदरस्थानी मानून केलेले रंगलेपन हे दुर्गाबाई भागवतांच्या ‘ऋतुचक्राची’ आठवण करून देणारे आहे. त्यांचे प्रत्येक पेंटिंग म्हणजे त्या त्या वृक्षाचे एक हृदयस्पर्शी रंगगीत आहे, असे भासते. म्हणूनच स्नेहल यांची चित्रेही ‘स्नेहादर’ वाढविणारी आहेत. त्यांचे प्रदर्शन पाहावे असेच आहे.

 

 
 
 
- प्रा. गजानन शेपाळ 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@