भारताशी पुन्हा पंगा घ्याल तर महागात पडेल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |



वॉशिंग्टन डीसी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐरणीवर आणण्यात भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश मिळताना दिसत आहे. आता अमेरिकेनेही पाकिस्तानचे कान टोचण्यास सुरुवात केली असून भारतावर पुन्हा एक जरी दहशतवादी हल्ला झाला तरी पाकिस्तानला ते महागात पडेल, असा खरमरीत इशाराच अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेतील तसेच काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने पाकिस्तानची जोरदार कानउघडणी केली आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटनांविरोधात निर्णायक कारवाई करावी, अशी सूचना अमेरिकेने केली आहे. विशेषतः, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा आदी सक्रिय संघटनांवर कारवाई करण्याबाबत अमेरिका आग्रही असून भारतात पुन्हा एक जरी दहशतवादी हल्ला झाला, तरी पाकिस्तानसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील, असा गंभीर इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.

 

दहशतवाद्यांच्या खुलेआम फिरण्यावर प्रश्नचिन्ह

 

पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यानंतर देशांतर्गत दहशतवादी संघटनांवर कारवाई केल्याचे दाखवले जरी असले तरी ती कारवाई अपुरी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. हाफिज सईद आणि मसूद अझहरसारखे दहशतवादी पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने आता त्यांच्याविरोधात ठोस भूमिका घेतलीच पाहिजे, असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.

 

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

 

जम्मू-काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्यदलातील एक जवान हुतात्मा झाला. यश पाल (वय २४) असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. दुसरीकडे, सोपोर भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@