नव्या वळणावरचा महाराष्ट्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |


 

कधी नव्हे असा पेचप्रसंग सध्या शरद पवारांसमोर उभा आहे. बारामती मुलीला दिल्यानंतर आज स्वत:साठीच मतदारसंघ नाही, अशी त्यांची स्थिती आहे. ज्या तिसर्‍या आघाडीची स्वप्ने ते पाहात होते, तिचेही काही खरे नाही.

लोकसभा निवडणुकांची गडबड सुरू आहे. दर पाच वर्षांनी येणारी ही निवडणूक देशासाठी नवी नसली तरी यंदा जसे टोक दोन्ही बाजूंनी गाठले आहे, तसे ते गेल्या सत्तर वर्षांत शक्यतो झालेच नसावे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये जे झाले, त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेत होऊ शकते, असा समज करून घेऊन काँग्रेस आणि मोदीविरोधी पक्ष कामाला लागले होते. आघाड्या, महाआघाड्या यांना तर ऊतच आला होता. प्रत्येक जण आपापल्या मनात खुशीचे मांडे खात होता. पण, आज जे काही राजकीय वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचे चित्रच पूर्णपणे पालटले असल्याचे दिसते.

देशभरातील आघाड्यांमध्ये हव्या तेवढ्या बिघाड्या झाल्या असल्या तरी स्वत:ला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणविणार्‍यांच्या आशा अद्याप काही संपलेल्या नाहीत. देशभरात हे सारे घडत असताना तिसर्‍या आघाडीचे प्रमुखपद घेऊन, नाहीच जमले तर काँग्रेसच्या सहयोगाने सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे राखणार्‍या शरद पवारांना मात्र बारामतीपुरते जखडून ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाहून एक मातब्बर नेते या भागाने महाराष्ट्राच्या राजकारणाला दिले आहेत. पवार असो किंवा काँग्रेस, २०१४ साली कसेबसे का होईना या मंडळींनी स्वत:चे अस्तित्व राखले होते. मुळात ही लढाई राजकीय नाही. राजकीय नाही अशा अर्थाने की, या सगळ्या राजकारणाला सहकाराची कवचकुंडले लाभली आहेत. हा सरळसरळ आर्थिक मामला आहे. लक्षावधी लोकांचे रोजगार ते कित्येकांची आर्थिक सुबत्ता यावर अवलंबून आहे. यात मोठमोठाले साखर कारखाने आहेत, डेरी आहेत, सूत कारखाने आहेत. यामागे हजारो कोटींची उलाढाल आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे त्यात कितीतरी मोठ्या प्रमाणावर लोक गुंतले आहेत.

विखे-पाटलांच्या किंवा मोहिते-पाटलांच्या दोन पिढ्यांपूर्वी रोवल्या गेलेल्या या सहकार चळवळीचे बीज आजच्या राजकारणाला फळ देऊन गेल्याचे चित्र गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी गावोगावचे हे पाटील हेरले, त्याच्यामागे आपली ताकद उभी केली आणि त्यांच्या ताकदीचा पुरेपूर फायदाही घेतला. काँग्रेसमध्ये असेपर्यंत हा सिलसिला छान चालू राहिला. मात्र, राष्ट्रवादीची सुरुवात झाली आणि मूळ काँग्रेसमधल्या पवार विरोधकांना इथे त्यांची स्वत:ची ‘स्पेस’ मिळाली. केंद्रातल्या त्यांच्या मंत्रिपदाच्या मोबदल्यात महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसला मुख्यमंत्रिपद द्यावे लागले आणि इथेच अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावण्यापासून दूर फेकले गेले ते कायमचे. नंतर आपल्या अंगभूत कलागुणांच्या आधारावर चर्चेत राहण्याचे काम त्यांनी नक्कीच केले. पण, २०१४च्या लोकसभा निवडणूक निकालांच्या बदलत्या कलांनी अनेकांची राजकीय भवितव्ये कलंडून टाकली. यात पवार होते, तसे नारायण राणे होते, राजू शेट्टी होते. या सगळ्यांनाच आपले अस्तित्व टिकविण्यासाठी कमालीच्या कोलांटउड्या माराव्या लागल्या. या उड्या इतक्या चित्रविचित्र होत्या की, आज आपण नेमके कुठे जाऊन पोहोचलो आहोत, याचा त्यांना स्वत:लाच पत्ता नाही. भुजबळ कुटुंबीयांना तर तुरुंगाची हवादेखील खावी लागली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा बदलता सारीपाट खूप काही सांगणारा आहे.

इतरांच्या घरात फोडाफोडी करणारे शरद पवार सध्या कौटुंबिक कलहातच जखडून पडले आहेत. अजित पवारांच्या मुलाला निवडून आणणे, हीच आता त्यांच्या उर्वरित राजकीय कारकिर्दीची इतिकर्तव्यता राहिली आहे. ज्याला निवडून आणायचे आहे, त्या पार्थ पवारांनी आपल्या घराण्यातून मिळालेल्या कितीतरी गोष्टींचा ऊहापोह आपल्या भाषणात केला. या मुलाची प्रगल्भता पवारांना कळली नाही, असे नाही; पण घराणेशाहीचा शाप एकदा लागला की, तो कसा भोवतो त्याचे हे प्रतीक आहे. बारामती हा आपला लाडका मतदार संघ त्यांनी आपल्या कन्येला बहाल केला. मागील निवडणुकीत सुप्रिया सुळेंची खासदारकी सहज सुटली नव्हती. सुप्रिया सुळेंच्या विजयापेक्षा मोदींच्या आशीर्वादाचीच चर्चा यावेळी जास्त झाली. माढा लढविणार नसल्याचे जे कारण पवार सांगायला टाळत होते, ते मोहिते-पाटलांच्या भाजपप्रवेशाने उघड झाले. मोहिते-पाटील सोबत नसताना पवार निवडून येणे केवळ अशक्य आहे. मावळला जाऊन अजित पवारांच्या मुलाच्या प्रचाराला पवार जे बोलले, ते वरवर काहीही असले तरी ती त्यांची अगतिकताच होती. पार्थ या निवडणुकीत पडला तर सुप्रिया सुळेंची दिल्ली, मुंबईतल्या लब्धप्रतिष्ठांमध्ये मिरवूनही न झालेली राजकीय कारकीर्द, राष्ट्रवादी काँग्रेस पुढची वाटचाल असे कितीतरी प्रश्न पवारांसमोर आहेत. जितेंद्र आव्हाडांसारखे जे फुलबाजे पवारांनी गोळा केले आहेत, ते पेटताक्षणी संपणार, याची खात्री त्यांना आहे. पवार राजकारणातले मातब्बर, यात शंका नाही. पण, त्यांच्या घरातली जी मंडळी त्यांनी पुढे आणली, त्यांचा वकूब आणि पवारांचा वकूब यात जमीन-आस्मानाचा फरक आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांच्या राजकीय गोळाबेरजेला कधीच लागली नव्हती, अशी उतरती कळा आज लागली आहे. यातून जे काही घडेल ते पवारांचे राजकारण संपविणारे असेल. या सगळ्याला जबाबदार असलेला महाराष्ट्रातला एकमेव माणूस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करीत फडणवीसांची वाटचाल सुरू आहे. आज बाहेरून लोक आत घेतल्याने त्यांच्याबाबत होणारी टीका वाजवी असली तरी पक्षासमोरचे शत्रू एक एक करून संपत आहेत, हे नाकारता येणार नाही. नारायण राणेंसारखा आक्रस्ताळी माणूस एकाएकी शांत का आहे? राणेंच्या मागे उभे राहणारे आमदार राणेंना सोडून भाजपच्या वाटेवर आहेत. राजकारणाची म्हणून स्वत:ची एक चाल असते. जोपर्यंत राजकीय पक्ष त्या चालीशी जुळत नाही, तोपर्यंत राजकारणात अपेक्षित असलेले यश मिळू शकत नाही. उद्या तुम्हाला अपेक्षित असलेले बदल घडवून आणायचे असतील तर आधी तुम्ही सक्षम व्हावे लागते. पवारांसारखा मोठा मोहरा आज नामोहरम होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय काय घडेल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@