मोहनराव सोमण, एक दीपस्तंभ हरपला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |



निस्वार्थी दानाची परंपरा जपणाऱ्या मोजक्याच अपवादापैकी मोहनराव सोमन होते. संघकार्यासाठी राहते घर त्यांनी दान केले होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन.


मनमाड येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी मोहनराव सोमण यांचे काल पवई येथे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे,’ ही उक्ती सार्थ ठरविणारे जीवन मोहनराव जगले. त्यांच्या निधनाने मनमाडकर हेलावले. आपले राहते घर कोणत्याही अटी वा शर्थीशिवाय त्यांनी संघकार्यास दान दिले होते. संघाची कोणतीही पार्श्वभूमी नसणारे मोहनराव एक सामान्य मध्यमवर्गीय रेल्वे कर्मचारी होते. २ मुली व १ मुलगा असणाऱ्या मोहनराव यांचा ना संघकार्याशी संबंध होता ना ते स्वयंसेवक होते.सेवानिवृत्तीनंतर येथील महाराष्ट्र बँकेत ते निवृत्तीवेतन घेत असत. याच बँकेच्या शाखेत संघ स्वयंसेवक असलेले प्रमोद मुळे नोकरीस आहेत. ते सातत्याने मोहनरावांना बँकेच्या कामात मदत करत असत.

 

प्रमोद मुळे हे मनमाड शहरातसाप्ताहिक विवेक’ चे सेवाव्रती म्हणूनदेखील काम करतात. प्रमोद मुळे यांनी मोहनरावांना ‘विवेक’चे वर्गणीदार बनविले व तेथूनच मोहनरावांचा संघकार्याशी संबंध आला व ‘विवेक’च्या माध्यमातून ते संघ विचारांशी जोडले गेले ते कायमचेच.वाचन माणसाच्या जीवनावर फार मोठा परिणाम करत असते. अगदी असाच परिणाम ‘सा. विवेक’ने मोहनराव यांच्या जीवनावर केला. आपणदेखील या सेवायज्ञात आपल्या काही समिधा टाकल्या पाहिजे, असे त्यांना मनोमन वाटू लागले. त्यातच, अपंग असलेले वडील व आई मनमाड येथे राहतात, हे एका मोठ्या खाजगी कंपनीत अधिकारी असलेल्या सर्वेश या त्यांच्या चिरंजीवास काही पटत नव्हते. त्याने आईवडिलांना आपल्याकडे घेऊन जायचे ठरविले. हीच संधी साधून मोहनरावांनी आपले राहते घर व घरातील सर्व चीजवस्तू संघकार्यास दान म्हणून देण्याचा आपल्या मनातील विचार आपली पत्नी स्मिताताई यांना बोलून दाखविला व पतीच्या आनंदातच आपला आनंद मानणाऱ्या स्मिताताईंनीदेखील लगेच होकार दिला. मुलगा सर्वश, मुली माधुरी व तेजस्विनी तसेच जावई व सूनबाईंनीदेखील आईचाच कित्ता गिरवत तत्काळ आपली संमती दर्शविली आणि २५ लाख रुपयांचे घर व सुमारे १० लाखांच्या आसपास घरातील चीजवस्तू संघास देण्याचे ठरविले.

 

एका सकाळी प्रमोद मुळे यांना घरी बोलावून मोहनरावांनी हा विचार सांगितला. तो तत्काळ अंमलात आणला. अगदी उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातासदेखील समजू नये, अशा प्रकारे कोणतीही पूर्वअट अथवा प्रसिद्धी न करता १ डिसेंबर, २०१२ रोजी संघाचे दिलीप क्षीरसागर, बन्सीलाल आंदोरे, रमेश गायधनी, माधव परांजपे, नाना आहेर आदींच्या व मनमाडमधील मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत मोहनराव व त्यांच्या परिवाराचा घरगुती वातावरणात सत्कार केला व हस्तांतरणासाठीची प्रक्रिया पार पाडली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मनमाड सोडताना गावाला जातो तसे फक्त मोजके कपडे असलेली बॅग घेऊन त्यांनी गावाचा निरोप घेतला. आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, असे बोलणारे अनेक असतात पण कृतीत आणणारे दुर्मीळ असतात. मोहनराव आपल्या कृतीने आदर्श निर्माण करणारे ठरले. गेल्या ९ महिन्यांपासून मोहनराव अंथरुणास खिळून होते. शेवटचे काही दिवस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल दि. २० मार्च रोजी त्यांनी पवई येथे अखेरचा श्वास घेतला. कत्यांच्या जाण्याने एक दीपस्तंभ हरपला आहे. जीवन त्यांना कळले हो, या उक्तीप्रमाणे जीवन जगलेल्या मोहनराव यांच्या निधनाबद्दल रा.स्व.संघाचे प्रमोद मुळे, रमाकांत मंत्री, किशोर नावरकर, भाजपचे नितीन पांडे, वनवासी कल्याण आश्रमाचे चांदवडकर, विकास काकडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

 

अत्यंत महान व्यक्तिमत्त्व!

 

सोमण काका हे तसे संघाचे सक्रिय हितचिंतक. संघाविषयीचे साहित्य व प्रकाशने नियमित वाचायचे. कार्यक्रम/उत्सव यात उपस्थित असायचे. निवृत्तीनंतरचे शांत जीवन मनमाड येथे ते व्यतीत करीत होते. सोमणकाका यांनी त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवणाऱ्या मनमाडच्या संघ कार्यकर्त्यांना एक अनपेक्षित धक्का दिला. आपला स्वतःचा राहता बंगला त्यातील सर्व वस्तूंसह संघाला देण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. सोमणकाकांच्या या निर्णयाचा हा अनपेक्षित सुखद धक्का होता. संघकामाच्या पुण्याईची अशी अनुभूती मिळत असते. दि. १९ मार्च रोजीच प्रबोधन मंचाच्या कामासाठी नांदगाव तालुका प्रवासात दिवसातील शेवटच्या बैठकीसाठी मनमाड येथे त्याच वास्तूत जाण्याचा योग आला, तेव्हा या सर्व स्मृतींना उजाळा मिळाला. सोमणकाकांना विनम्र अभिवादन व श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!

 

दिलीप क्षीरसागर,

पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख,

रा. स्व. संघ

 

रेल्वेत सिग्नल विभागात अधिकारी पदावरून निवृत्त झालेले मोहनराव सोमण रेल्वेत कर्तव्यदक्ष अधिकारी तर होतेच पण सेवानिवृत्तीनंतर ‘सा. विवेक’मुळे ते संघकार्याशी जोडले गेले.त्यातून समाज व देशासाठी काहीतरी केले पाहिजे, ही उर्मी त्यांच्यात निर्माण झाली. एकदा सेवाकार्यासाठी जुने कपडे गोळा करायला काही कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले असता त्यांनी स्वतःचे नवेकोरे कपडे दिले होते व पुढे तर राहते घर संघकार्यास दान दिले व स्वतःच्या घरातून फक्त मोजके कपडे असलेली बॅग घेऊन निघाले. इतक्या निरपेक्ष वृत्तीने जीवन जगलेल्या या सेवाव्रतीच्या निधनाने ज्या पायांकडे बघून नतमस्तक व्हावे, असे पायच आपल्यातून दैवाने हिरावून नेले आहेत. मोहनराव सोमण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

रमाकांत मंत्री

सदस्य, विभागीय प्रचारक मंडळ

  
हर्षद गद्रे 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@