शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का आला ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाची घटना आणि संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा पुळका का आला, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महागठबंधनचा धुव्वा उडणार असल्याच्या भीतीने शरद पवारांनी आता ही वेगळी वाट स्वीकारली का, असाही सवाल भांडारी यांनी केला.

 

माधव भांडारी म्हणाले की, शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एल्गार परिषद आयोजित करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांची बाजू घेतली. या आरोपींवर कारवाई करणाऱ्या पोलीस आयुक्तांना आपण निलंबित केले असते, अशी भाषा त्यांनी वापरली. परंतु श्री. शरद पवार काही गोष्टी विसरू लागले आहेत. ते स्वतः केंद्रात मंत्री असताना आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्ताधारी असताना अशाच प्रकारे नक्षलवादाला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती व आज ज्यांना अटक केली त्यापैकी अनेकांना त्यावेळीही अटक केली होती. त्यापैकी काहीजण तर दीर्घकाळ तुरुंगात होते. त्यावेळी या कारवाईला त्यांनी विरोध केल्याचे कोठे वाचनात आले नाही किंवा ही कारवाई करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर पवारसाहेबांनी काही कारवाई केल्याचे वाचनात आले नाही. मनमोहनसिंग सरकारमध्ये पवार कृषीमंत्री असताना त्यांच्या समोर संसदेत या विषयावर चर्चा झाली होती व तेव्हाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शहरी भागात स्वयंसेवी संस्थांच्या आड दडून नक्षलवादी कारवायांना साथ देणाऱ्या संघटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी ज्या संघटनांची नावे संसदेत दिली होती त्यापैकीच काहीजणांवर सरकारने सध्या कारवाई चालू केली आहे. आपल्या उपस्थितीत आपल्या सरकारने दिलेली माहितीदेखील पवारसाहेब विसरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो.

 

त्यांनी सांगितले की, पुण्यातील एल्गार परिषदेमुळे सामाजिक वातावरण बिघडले व त्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमाची दंगल झाली. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवून जातीय भडका उडविण्याचा हा प्रयत्न होता. या प्रकरणी पोलिसांकडून तपास चालू असतानाच आरोपी वारंवार न्यायालयात धाव घेत असल्याने सातत्याने तपासाची न्यायालयासमोर चिकित्साही होत आहे. न्यायालयाने पोलिसांच्या तपासाला किंवा आरोपींना अटक करण्यात प्रतिबंध घातला नसताना पवार यांना मात्र नक्षलवाद्यांवर कारवाई हा सत्तेचा गैरवापर वाटतो, हे अजब आहे. हिंसेचे तत्वज्ञान बनवून सातत्याने हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गटांची पाठराखण शरद पवार का करत आहेत, याचेही त्यांनी उत्तर द्यावे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@