‘पाटीलकी’ भाजपच्या वाटेवर... मोहिते-पाटील पितापुत्र भाजपप्रवेश करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019
Total Views |

राधाकृष्ण विखेंच्याही नाराजीच्या चर्चेला उधाण



मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात तगडी घराणी असणाऱ्या विखे-पाटील व मोहिते-पाटील कुटुंबीयांनी आपल्या अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना रामराम करत भाजपची वाट धरली आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आधीच खिळखिळ्या झालेल्या पश्चिम महाराष्ट्ररूपी बालेकिल्ल्याला मोठी भगदाडं पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आधीच वाजतगाजत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माढ्याचे विद्यमान खासदार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते-पाटील हेही आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मंगळवारी मोहिते-पाटलांची कर्मभूमी अकलूजमध्ये मोहिते पितापुत्रांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधत बुधवारी मुंबईत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यावेळी रणजीतसिंह मोहिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुक्तकंठाने प्रशंसाही केली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मुंबईतील वानखेडे स्टेडीयमच्या गरवारे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोहिते-पाटील यांचा भाजपप्रवेश होईल, असे रणजीतसिंह यांनी सांगितले.

 

मोहिते-पाटील हे गेल्या तीन-चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. तसेच, माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी रणजीतसिंह मोहिते इच्छुक होते. परंतु, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अद्याप त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे वृत्त आहे. याच अस्वस्थतेतून रणजीतसिंह यांनी भाजपप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतरही या जागेचा तिढा सुटला नाही. राष्ट्रवादीच्या पहिल्या दोन याद्यांतही मोहिते-पाटील यांचे नाव न आल्याने या पिता-पुत्रांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आणि परिणामी त्यांनी भाजपप्रवेशाचा मार्ग निवडला आहे.

 

शरद पवारांच्या माघारीचे ‘खरे’ कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरूवातीला माढ्यातून लढण्याचे संकेत दिले आणि लगेचच आपले नातू पार्थ अजित पवार यांच्या मावळमधील उमेदवारीचे कारण पुढे करत माढ्यातून माघार घेतली. प्रत्यक्षात मोहिते-पाटील पितापुत्रांच्या नाराजीमुळे लोकसभेला निवडून येण्याची खात्री नसल्यानेच शरद पवार यांनी येथून माघार घेतली, असे आता दिसू लागले आहे. शरद पवार हे २००९ ते २०१४ या काळात येथून खासदार होते तर २०१४ पासून विजयसिंह मोहिते पाटील खासदार आहेत.

 

राधाकृष्ण विखेही भाजपच्या वाटेवर?

डॉ. सुजय यांनी भाजपप्रवेश केल्यापासून त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटीलदेखील भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल चर्चा आहेत. नगरमध्ये आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याची भूमिका घेत शरद पवारांवर टीका करणाऱ्या विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादी तीव्र नाराज आहे. अशातच विखे यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात व अन्य मंडळींनी विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे विखे यांची काँग्रेसमधील पुढील वाटचाल अवघड झाल्याचे दिसत आहे. तसेच, त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्तही अनेक माध्यमांतून प्रसिद्ध झाले परंतु, आपण राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्टीकरण राधाकृष्ण यांना द्यावे लागले. विखे-पाटीलांच्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतही मोठी बिघाडी झाल्याचे दिसत आहे.

 

राष्ट्रवादीला मोठे खिंडार

विजयसिंह मोहिते-पाटील हे अकलूज-माळशिरस भागातील मोठे प्रस्थ असून अकलूजच्या सरपंचपदापासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी वाटचाल केली आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्याची सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ग्रामविकास अशी अनेक महत्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत. तसेच, सहकारी संस्थांच्या माध्यमातून सोलापूरच्या या भागात त्यांनी आपले मोठे वर्चस्व निर्माण केले आहे. तसेच, त्यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते-पाटील हेही जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्वाचे नाव असून ते काही काळ राज्यसभेचे खासदार व विधानपरिषद आमदारही राहिले आहेत. अशा या तगड्या पिता-पुत्रांच्या भाजपप्रवेशामुळे भाजपची पश्चिम महाराष्ट्रातील बाजू अधिक भक्कम होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बालेकिल्ल्यात मोठे खिंडार पडणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@