बेरोजगारांची पोपटपंची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019
Total Views |




दोनच आठवड्यांपूर्वी ‘सीआयआय’ ने केलेल्या सर्वेक्षणातून ‘एमएसएमई’ क्षेत्रात २०१४ पासून सहा कोटी लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली. पण, धूळफेक करणार्‍या आकड्यांच्या मटक्यावर बोली लावणार्‍या हार्दिक पटेलसारख्यांच्या डोक्यात ही गोष्ट घुसूच शकत नाही. परिणामी ते ‘मैं हूँ बेरोजगार, मैं हूँ बेरोजगार’ची टिमकी वाजवताना दिसतात.

गेल्या तीन-चार वर्षांपासून काँग्रेसच्या पगारावर काम करणार्‍या हार्दिक पटेलने नुकताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा ‘हात’ हातात घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसकडून एखाद्या मतदारसंघाचा रमणा मिळाला तर बरा, हा एक उद्देश हार्दिकच्या या निर्णयामागे असावा. परंतु, हार्दिकच्या या कृतीतून मोदी सरकारविरोधात आंदोलने, मोर्चे, धरणे करण्यासाठी आपल्यामागे कोणाची यंत्रणा राबत होती, हेदेखील यातून उघड झाल्याचे दिसते. आता काँग्रेसमध्ये गेलेल्या हार्दिकने एकेकाळी “काहीही झाले तरी मी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही,” असे म्हटले होते. मात्र, आठवड्याभरापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मी माझ्या शब्दांशीही प्रामाणिक, इमानदार नसल्याचेच हार्दिक पटेलने दाखवून दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मी स्वतःच्या वचना-शपथांना कसे वार्‍यावर सोडतो, हे सिद्ध करणार्‍या हार्दिक पटेलने आता मोदींवर टीका करण्यासाठी नवीनच बहाणा शोधला. लक्झरी गाड्यांत अन् पंचतारांकित हॉटेलांतून वावरणार्‍या हार्दिकला आपण बेरोजगार असल्याची जाणीव झाली व त्याने आपल्या नावाआधी ‘बेरोजगार’ शब्द जोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेला उत्तर म्हणून नावापुढे ‘बेरोजगार’ लावल्याचेही हार्दिकने सांगितले.

मोदी सरकारने दिलेले रोजगारनिर्मितीचे आश्वासन पूर्ण झाले नसल्याची टीका काही राजकारण्यांकडून नेहमीच केली जाते. वस्तुस्थितीशी सामना करण्याची कुवत नसली की, मग जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल, अशीच ही विधाने असतात. २०१४ पासून ते आजपर्यंत काँग्रेससह सर्वच विरोधकांनी हा कित्ता चांगलाच गिरवला आणि तोंडाला येईल ते बरळण्याचे उद्योग केले. स्वतःच्या नावापुढे ‘बेरोजगार’ लिहिण्याची हार्दिक पटेलची नौटंकी आणि रोजगार अनुपलब्धतेबद्दलचा आरोपही याच बेतालपणाचा परिपाक. कारण, मोदी सरकारने राबविलेल्या मुद्रा योजना, स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया योजनेतून लाखो तरुण-तरुणींसह नवे काही करून दाखविण्याची जिद्द बाळगलेल्यांना उद्योग-व्यवसायाची संधी लाभली, हे एक वास्तव आहे. शिवाय आज देशात हजारो कोटींची पायाभूत सुविधांच्या उभारणीची, मेट्रो, रेल्वे, महामार्ग बांधणीची कामे सुरू आहेत, ते तिथे कोणीतरी राबत असल्यामुळेच ना? सोबतच काँग्रेसच्या ६०-६५ वर्षांतल्या अपयशाचे प्रतीक असलेल्या मनरेगातूनही कितीतरी कामे सुरू असून तिथेही कोणीतरी काम करतच आहे. पण, विरोधकांनी बुद्धीभेदासाठी फसवेगिरी करत देशातला युवक देशोधडीला लागल्याचा खोटारडेपणाच सदान्कदा चालवला व मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. एकदा का मोदी विरोध सुरू केला की, त्याने केलेले चांगले काम दुर्लक्षणीयच होते ना? म्हणूनच हार्दिक असो वा अन्य कोणी, रोजगाराबाबतचा केलेला आरोप केवळ प्रपोगंडा ठरतो, तथ्य नव्हे.

हो, एक मात्र नक्की की, काँग्रेसच्या काळात जसे आयते बसून सगळ्याच सोयी-सुविधा ओरबाडायला मिळायच्या, तो प्रकार मात्र बंद झाला. प्रत्येक क्षेत्रात मेहनत अन् कष्ट करणे अनिवार्य झाले. दळल्या पीठावर रेघोट्या ओढण्याची स्वप्ने पाहणार्‍यांना मात्र हे कसे रुचेल? म्हणूनच अशा रिकामटेकड्यांनी आता ‘बेरोजगार, बेरोजगार’चा थयथयाट चालवला असावा. वस्तुतः रोजगार म्हणजे, त्यात सर्वप्रकारची कामे येतात, जिथे काम करणार्‍याला पैशाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो, तर नोकरी म्हणजे सरकारी वा भविष्यनिर्वाह निधी योजना लागू असलेले कर्मचारी. अर्थातच बिनडोकपणा ठासून भरलेल्यांना या गोष्टी कळत नाहीत किंवा कळत असूनही वळत नसाव्यात. म्हणून ते इपीएफओची आकडेवारी दाखवून अखंड बडबडताना दिसतात. मात्र, दोनच आठवड्यांपूर्वी ‘सीआयआय’ म्हणजेच ‘कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ने केलेल्या सर्वेक्षणातून ‘एमएसएमई’ अर्थात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्रात २०१४ पासून सहा कोटी लोकांना रोजगार दिल्याची माहिती समोर आली. सेवा, पर्यटन, वस्त्रोद्योग, धातू, अवजड अभियांत्रिकी, दळणवळण, परिवहन आदी क्षेत्रांत रोजगार वाढल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. पण, धूळफेक करणार्‍या आकड्यांच्या मटक्यावर बोली लावणार्‍या हार्दिक पटेलसारख्यांच्या डोक्यात ही गोष्ट घुसूच शकत नाही. परिणामी ते ‘मैं हूँ बेरोजगार, मैं हूँ बेरोजगार’ची टिमकी वाजवताना दिसतात. विशेष म्हणजे, ‘मै हूँ चौकीदार’ची अशाप्रकारे टवाळी करणार्‍यांना पाठिंबा देणार्‍यांत ‘आय अ‍ॅम अ बॅन नक्सल’ची पाटी गळ्यात अडकविणार्‍यांचाच पाठिंबा असतो. यावरूनच ही शेपटी वळवळत कुठे कुठे जाईल, त्याचा अंदाज बांधता येतो.

एकीकडे हार्दिक पटेलचा बेरोजगारीचा तमाशा चालू असतानाच तिकडे ‘आजीसारखे नाक दिसते’च्या निकषावर भलत्याच फॉर्मात आल्याचे वाटणार्‍या प्रियांका गांधींनीही मोदींविरोधात तोंड उघडले. अर्थात लोकशाहीने दिलेले भाषणस्वातंत्र्य त्यांना आहेच, पण टीका तरी सत्याला धरून असावी ना? पण प्रियांकांना तेही जमल्याचे दिसत नाही. म्हणूनच उत्तर प्रदेशात दारोदार फिरताना, मठ-मंदिरांना भेटी देताना प्रियांका गांधींनीदेश संकटात असल्याने मी घराबाहेर पडले,’ ‘गरीब नव्हे तर श्रीमंतच चौकीदार ठेवतात,’ ‘मोदी सरकारची आणि त्यांच्या भाषणांची एक्स्पायरी डेट संपली,’ अशा शब्दांत टीका केली. तसे पाहता प्रियांका गांधींच्या बोलण्यात तथ्य असल्याचेच दिसते. कारण, गांधी कुटुंबीयांतील कोणाही व्यक्तीचा देश हा आपला पिता, पुत्र वा पत्नीच असते. प्रियांका गांधींनाही असेच वाटत असावे, म्हणूनच रॉबर्टरूपी आपला ‘पतीदेश’ जमिनीच्या गैरव्यवहारामुळे संकटात आल्याचे समजताच त्याला वाचवण्यासाठी ही आधुनिक सावित्री पुढे सरसावली असावी. पण, पुराणकाळातली ती सावित्री अन् तिचा पतीही पुण्यवान असल्याने दोघांवरही ईश्वर प्रसन्न झाला. इथे मात्र तसे मुळीच नाही. निरनिराळ्या घोटाळ्यांच्या पापराशीच निर्माण केलेल्यांना जनतारूपी ईश्वर अन् कायदारूपी चित्रगुप्तही चांगलाच ओळखतो. त्यामुळे कोणी वाचण्याची शक्यता दूरदूरपर्यंत अजिबात दिसत नाही. चौकीदार श्रीमंतच ठेवतात, हे खरेच आणि देशातली जनता सार्वभौम असल्याने ती तितकीच श्रीमंत आहे अन् याच जनतेला वर्षानुवर्षे गरिबीत खितपत ठेवण्याचा, कुजवत ठेवण्याचा चोरटेपणा काँग्रेसनेच केला. आता मात्र इथल्या जनतेला आपली श्रीमंती कळली असून पंतप्रधानांनी ती ओळखूनच स्वतःला ‘चौकीदार’ घोषित केले. पण, प्रियांकांना ही जनता अजूनही आपल्या घराण्यापुढे लाचारपणे उभी राहावी, असे वाटते.

सोबतच ज्यांचे स्वतःचेच नामोनिशाण मिटण्याची वेळ आली, त्यांनी काय मोदी सरकारच्या ‘एक्सपायरी’ची भाषा करावी? प्रादेशिक पक्षांपुढे कटोरा घेऊन गेले तर तोळामासा झालेल्या प्रियांकांच्या पक्षाला कोणी सन्मानजनक जागांचे दान टाकताना नव्हे, तर दोन-चार जागा भीक म्हणून सोडताना दिसतात! म्हणूनच प्रियांकांनी भाजपविरोधात पोपटपंची करण्याऐवजी २३ मे नंतर होणार्‍या आपल्या पक्षाच्या बेरोजगारीची चिंता करावी, भाजपची नव्हे! भाजप २ जागांपासून २७२ जागांवर पोहोचलेला प्रचंड इच्छाशक्तीने भरलेला पक्ष आहे, त्यामुळे प्रियांकांनी मोदी सरकारऐवजी आपल्या गाठोड्यातले उरलेसुरले गोटे सांभाळण्याकडे लक्ष द्यावे! कारण, जनता त्यांना कधी खड्यासारखे बाजूला काढून फेकेल, हे प्रियांकांनाही समजणार नाही.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@