योगेश सोमण यांची 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस'च्या संचालकपदी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019
Total Views |


मुंबई : मुंबई विद्यापीठाचा 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस' या नाट्यशास्र विभागाच्या संचालकपदी योगेश सोमण यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली. सोमण हे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते म्हणून मागील २५ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहेत.

 

मुंबई विद्यापीठाचा अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस हा विभाग शास्रशुद्ध नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक मानला जातो. यापूर्वी डॉ. मंगेश बनसोड हे या विभागाचे प्रभारी संचालक म्हणून गेल्या साडेतीन वर्षांपासून काम पाहत होते. दरम्यान, सोमण यांच्या निवडीचे सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे.

 
 

योगेश सोमण हे मागील २५ वर्षांपासून मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. मराठी, हिंदी चित्रपट तसेच नाटकात त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा मी विनायक दामोदर सावरकरहा एकपात्री प्रयोग खूप गाजला आहे. यासोबतच अनादि मी अवध्य मी’ ‘एकदा पाहावं न करूनया नाटकांनीदेखील मोठे यश मिळविले.

 

सोमण यांच्याकडे मराठीतील प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक अभिनेते म्हणून पाहिले जाते. यासोबतच एक रोखठोक नागरिक म्हणून ते आपली भूमिका बजावत असतात. उत्तम वक्ते व लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आजपर्यंत त्यांनी 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक, आनंदी गोपाळ, आसूड, माणुसकी, दृश्यम, फास्टर फेणे' अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच 'माझं भिरभिरं' हा चित्रपट दिग्दर्शित केला असून लेखक म्हणून 'दिली सुपारी बायकोची' हा चित्रपट त्यांच्या नावावर आहे.

 

"अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसच्या संचालकपदी निवड झाली, याचा आनंद आहे. मी मागील २५ वर्षांपासून नाट्यक्षेत्रासाठी झगडत असून विविध नाट्य कार्यशाळा घेत आलो आहे. आजपर्यंत ही कामे मी शिक्षण क्षेत्राच्या बाहेर राहून करत होतो. मात्र, आता प्रत्यक्षात शिक्षण क्षेत्रात राहून मला नाट्यक्षेत्रासाठी काम करायला मिळणार असल्याचा सर्वात जास्त आनंद आहे. विद्यार्थी घडविणे, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे, ही माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट असल्याने अकॅडमीच्या संचालकपदी निवड केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे मी आभार व्यक्त करतो. या पदाला न्याय मिळवून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन."

- योगेश सोमण

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, लेखक व अभिनेते 
 
 
 
 
 
  
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@