महागठबंधनाची सर्कस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019
Total Views |


 

महागठबंधनाची पुडी सोडणार्‍या सगळ्यांना एकाचवेळी मोदींनाही रोखायचेय आणि काँग्रेसलाही शिरजोर होऊ द्यायचे नाही. सवत रंडकी झाली पाहिजे, म्हणतात ते हेच. म्हणूनच उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमध्ये काँग्रेसला कोणी विचारत नाहीसे दिसते. पण ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पुढे तर हे पक्ष या सर्कशीत एकमेकांविरोधात अनेक कोलांटउड्या मारताना दिसतील, हे नक्की.

कर्नाटकात कुमारस्वामींच्या शपथविधीवेळी दौलत की बेटी मायावती आणि राहुलबाबाच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी कपाळाला कपाळ लावून दाखविलेल्या स्नेहाची पुरेपूर चर्चा झाली. मात्र, सात महिन्यांपूर्वी बालमैत्रिणीसारख्या वागणार्‍या मायावतींच्या बहुजन समाज पक्ष आणि सोनियांच्या काँग्रेसमधील संबंध दरम्यानच्या काळात इतके विकोपाला गेले की, दोन्ही पक्षांनी एकमेकांची औकात काढायला सुरुवात केली. 
काँग्रेसला बाजूला सारत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मायावतींच्या हत्तीने अखिलेश यादवांच्या सायकलवर स्वार होणे पसंत केले व परस्पर जागावाटपही करून टाकले. काँग्रेसला म्हणण्यापेक्षा गांधी घराण्याला उत्तर प्रदेशातील ८० पैकी केवळ अमेठी व रायबरेली या दोन जागा सोडत बुआ-बबुआने तर कहरच केला. परिणामी भाजपविरोधात देशपातळीवर एकास-एक उमेदवार देण्याच्या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, बुद्धीजीवी, विचारवंत म्हणविणार्‍यांनी पाहिलेल्या स्वप्नांना चूड लागायला सुरुवात झाली. एवढा अपमान होऊनही मायावती आणि अखिलेश यादवांना उपरती होऊन ते आपल्याला आघाडीत घेऊन सन्मानजनक जागावाटप करतील, अशी आशा काँग्रेसला होतीच. परंतु, वाट पाहूनही या दोन्ही पक्षांकडून कोणतीही हालचाल झाली नाही, तेव्हा मात्र काँग्रेसने तिरकी चाल खेळत उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७ जागा सप-बसप आघाडीला सोडल्याचे समोर आले. अशाप्रकारे तुम्ही आम्हाला दोन जागा तर आम्ही तुम्हाला सात जागा सोडल्याचे दाखवत काँग्रेसने सप-बसपला खिजवण्याचाच प्रकार केला.


काँग्रेसचा हा डाव मात्र मायावतींना पसंत पडला नाही व त्यांनी तत्काळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आमची काँग्रेसशी कुठलीही आघाडी नसल्याचे व काँग्रेस सर्व जागा लढण्यास स्वतंत्र असल्याचे सांगून टाकले
. सप-बसप आणि काँग्रेसमधील या नाट्यातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते,ती म्हणजे भाजप वा नरेंद्र मोदींना नेमके कसे सामोरे जायचे, हेच या पक्षांना कळत नाही. मोठा गाजावाजा करून केलेली महागठबंधनाची घोषणा ही सोडलेली पुडीच ठरली व प्रत्येकजण स्वतःचाच स्वार्थ पाहू लागला
वस्तुतः बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष वा काँग्रेस या सर्वांचीच मदार देशातल्या विशिष्ट समुदायांच्या मतांवर आहे. वर्षानुवर्षे हा मतदार या पक्षांना मतदान करत आला आणि यंदा मात्र अशा सगळ्याच पक्षांची आघाडी साकारली तर फाटाफूट होणारी मते एकाच उमेदवाराला मिळतील व ती भाजपच्या उमेदवारापेक्षा अधिक असतील, या उद्देशाने महागठबंधनचे सूत्र मांडले गेले. बंगळुरूतील सभा आणि कोलकात्यात ममता बॅनर्जींनी जमवलेल्या नेत्यांच्या गर्दीतून हे सूत्र प्रत्यक्षात येईल, असा भास निर्माण झाला. पण वस्तुस्थिती निराळीच होती. भाजपविरोधात एकत्र येणार्‍या या सगळ्याच पक्षांना मोदींचा पराभव व्हावा असे वाटतेच, पण त्याचवेळी काँग्रेस शिरजोर होऊ नये, अशी इच्छाही ते मनोमन बाळगतात. कारण काँग्रेसची मतपेढी आपल्याकडे खेचूनच तर या लोकांनी सत्ता उपभोगलेली असते. मग भाजपविरोधात आघाडी करत एकच उमेदवार दिला तर आपला हक्काचा मतदार पुन्हा काँग्रेसमागे जाण्याची भीती या पक्षांना व त्यांच्या प्रमुखांना सतावते. तेव्हा या लोकांनी काँग्रेसचे पाय ओढणे चालू केले. मोदी नको अन् काँग्रेसही नको, अशी विचित्र परिस्थिती उद्भवलेल्यांना म्हणूनच अजूनही महागठबंधनाचे तोरण काही बांधता आले नसल्याचे दिसते. बरं, हे एकाच राज्यात आहे असेही नाही, ही सुंदोपसुंदी अन्य राज्यांतही आहे.


रविवारीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी बिहारमधील जागावाटपाबाबत चर्चा केली, मात्र ही मुलाखतही निष्फळच ठरली. उत्तर प्रदेशप्रमाणेच बिहारमध्येही काँग्रेस अगदीच तोळामासा झालेला पक्ष, पण तरीही त्याने राजदकडे ११ जागा मागितल्या. तेजस्वी यादव यांनी मात्र काँग्रेसची ८ जागांवर बोळवण करायला तयार असल्याचे सांगितले. राहुल गांधींनी केलेल्या बोलणीतून हाती काही लागत नसल्याचे पाहून मग जुळवाजुळवीत निपुण असलेले पटेलांचे अहमदही सक्रिय झाले. पण त्यातूनही काही निष्पन्न होत असल्याचे दिसत नाही. खरे म्हणजे बिहारमध्ये लालूप्रसादांच्या राजदसह माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्याही महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेतकाँग्रेसला जर अधिक जागा दिल्या तर आपल्या मनसुब्यांची वासलात लागेल, असेही या पक्षांना वाटते. शिवाय काँग्रेस बलवान झाली तर आपल्या अस्तित्वाला नख लागू शकते, याचीही चिंता आहेच. म्हणूनच लोकांना दाखवायला एका व्यासपीठावर येत कितीही हात उंचावले तरी ते हात एकात एक गुंफले जात नाहीत. अन् तरीही ही मंडळी आम्ही भाजपविरोधात लढणार व जिंकणार, असे छातीठोकपणे सांगताना दिसतात. पण या लोकांच्या अशा घोळामुळे संभ्रमात पडलेले कार्यकर्ते मोदीविरोधासाठी मतदाराला आमच्याच पक्षाला मते द्या, असे सांगू शकतील का, हा प्रश्न निर्माण होतो. उत्तर प्रदेशात महागठबंधनाचा प्रयोग बारगळलेला असताना व बिहारमध्येही पाळणा हलण्याची कोणतीही चिन्हे नसताना तिकडे पश्चिम बंगालमध्येही अशीच स्थिती असल्याचे दिसते. केरळात कित्येक वर्षांपासून माकपशी झगडा करत आलेली काँग्रेस बंगालमध्ये मात्र डाव्यांशी पाट लावू इच्छिते. पण, काँग्रेसची ही इच्छाही पूर्ण होण्याची शक्यता नाही. कारण इथे दोन्ही पक्षात आघाडीच्या संदर्भाने चर्चा सुरू असतानाच माकपने राज्यातल्या ४२ पैकी २५ उमेदवारांची यादीही जाहीर करून टाकली. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसशी तर राहुल गांधींच्या काँग्रेसची आघाडी होणे शक्यच नाही.


ममतांची मनिषा पंतप्रधान होण्याची आहे अन् समोर राहुल गांधी असल्यावर ते होणे अशक्यच
, हेही त्या जाणून आहेत. परिणामी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसह तृणमूलनेही नकार दिल्याने काँग्रेसला उरल्यासुरल्यांच्या जोरावरच राज्यात दोन हात करावे लागतील, हे निश्चित. महागठबंधनाची भलीमोठी चर्चा होऊनही हे असे का होते, याचा विचार करता काही गोष्टी स्पष्ट होतात. त्या म्हणजे या प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिक नेतृत्वाला एका बाजूला नरेंद्र मोदींसह भाजपला तर रोखायचे आहेच, पण त्याचवेळी स्वतःचेही महत्त्व वाढवायचे आहे; अन् काँग्रेस बरोबर असली तर ते होणार नाही, हेही त्यांना कळते. म्हणूनच काँग्रेसला ठेंगा दाखविण्याचा शहाणपणा हे पक्ष करताना दिसतात. उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगालमधील एकंदर घडामोडींतून त्याची साक्षच पटते. अर्थातच यातून मार्ग सुकर होत आहे तो भाजप व नरेंद्र मोदींचाच, हेही लक्षात घेतले पाहिजे. पण सवत रंडकी झाली पाहिजेचा हट्ट धरून बसलेल्यांना हे कोण सांगणार? असो. तरीही ही फक्त सुरुवात आहे. कारण येत्या दोन-अडीच महिन्यांत महागठबंधनाची ही सर्कस अजूनच जोमाने उड्या-कोलांटउड्या मारत जनतेचे मनोरंजन करताना दिसेल, हेही खरेच.


माहितीच्या
महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@