विविध खंडांची प्राकृतिक वैशिष्ट्ये (अंक तिसरा)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
मागील लेखात आपण दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका या खंडांची माहिती घेतली असून एकूण पाच खंडांची माहिती आपली घेऊन झाली आहे. या लेखात आपण उरलेल्या दोन खंडांची माहिती घेऊन खंडे हे प्रकरण संपवू.
 

आकारानुसार सहाव्या क्रमांकावर येते ‘युरोप खंड.’ याचे क्षेत्रफळ हे सुमारे १ कोटी, १८ लाख चौरस किलोमीटर आहे. याच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर आणि उत्तर ध्रुव, पूर्वेला आशिया खंड, दक्षिणेला भूमध्य समुद्र आणि आफ्रिका खंड, तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. अनेक वैविध्यपूर्ण भूशास्त्रीय वैशिष्ट्ये या खंडात आहेत. या खंडाचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘आल्प्स पर्वत.’ (Alps). ‘आल्प्स’ हा वलीचा पर्वत (Fold mountain) आहे. लक्षावधी वर्षांपूर्वी युरोप आणि आफ्रिकेच्या काँटिनेंटल प्लेट्स एकमेकांवर आदळल्यामुळे ही पर्वतरांग तयार झाली आहे. आपण गेल्या एका लेखात बघितलेल्या क्रेटॅशियस कल्पामध्ये (इंग्रजीमधील ‘पिरिएड’ या शब्दाला मराठीमध्ये ‘कल्प’ हे नाव वापरता येईल. याचप्रमाणे पिरिएडपेक्षा मोठ्या असलेल्या एराला महाकल्प, तर पिरिएडपेक्षा लहान असलेल्या एपोकला लघुकल्प असेही संबोधता येईल. या संज्ञा मला मराठी विज्ञान परिषदेच्या एका लेखात सापडल्या. या संज्ञांबद्दल त्यांचे आभार!) या पर्वताच्या निर्माणाला प्रारंभ झाला. पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर ‘मोंट ब्लांक’ (Mont Blanc) हे आहे. तसेच या पर्वतात चार हजार मीटरपेक्षा जास्त उंची असलेली सुमारे १०० शिखरे आहेत. ‘आल्प्स’शिवाय या खंडातील रशिया या देशात ‘उरल पर्वत’ (Ura) आहे. हा पर्वत रशियामधील आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यावर सुरू होऊन कझाकस्तानमधील उरल नदीपर्यंत आला आहे. ही पर्वतरांग युरोप आणि आशिया खंडांच्या सीमेवर बसली आहे. कॉकॅशस पर्वतरांग (Caucasus) ही अजून एक पर्वतरांग या दोन खंडांच्या सीमेवर बसली आहे. ही पर्वतरांग काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्या मधल्या भागात पसरली आहे. याच पर्वतरांगेत ‘माऊंट एलब्रूस’ (Mount Elbrus) हे युरोपमधील सर्वात उंच शिखर आहे.

 

 
 
 
पर्वतांनंतर युरोपमधील दुसरे अगदी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar). हा पाण्याचा केवळ १४ ते १५ किलोमीटर लांबीचा अरूंद पट्टा युरोप व आफ्रिकेला अटलांटिक महासागराजवळ वेगळे करतो. या सामुद्रधुनीमार्गे अटलांटिक महासागरातून थेट भूमध्य समुद्रात येता येते. यामुळेच हिला ‘पश्चिमेचे द्वार’ (Gate of the West) असेही म्हणतात. या सामुद्रधुनीची खोली सुमारे ३०० ते ९०० मीटर आहे.जिब्राल्टरपेक्षाही अरूंद असा पाण्याचा दुसरा एक पट्टा युरोप खंडाला आशिया खंडापासून वेगळे करतो. या पट्ट्याला ‘डार्डानेल्सची सामुद्रधुनी’ (Strait of Dardanelles) असे म्हणतात. ही सामुद्रधुनी तर फक्त दीड ते सहा किलोमीटर रूंद आहे आणि सरासरी फक्त ५५ मीटर खोल आहे. असे असूनसुद्धा ही सामुद्रधुनी हा जगातला एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. या खंडामध्ये अनेक नद्या आहेत. ऱ्हाईन, डॅन्युब, थेम्स, व्होल्गा यांसारख्या नद्यांतून या खंडाला जलपुरवठा होतो. यांमध्ये व्होल्गा (Volga) ही नदी सर्वात मोठी आहे. ही नदी म़ॉस्कोजवळ उगम पावून कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळते. या नदीवर जगातील काही मोठी धरणेही बांधण्यात आली आहेत. नद्यांनंतर या खंडातील भूकंपशीलता आणि ज्वालामुखीयता बघू. या खंडात अनेक ज्वालामुखी आहेत. वर उल्लेख केलेले ‘माऊंट एलब्रूस’ हे शिखर किंवा हा पर्वत म्हणजे एक निष्क्रीय ज्वालामुखीच आहे. याशिवाय इटली या देशात ‘माऊंट व्हेसुवियस’ (Mount Vesuvius), ‘माऊंट एटना’ (Mount Etna) यांसारखे सक्रिय ज्वालामुखीही आहेत. तसेच आईसलँड या देशात हिमनदीखालीही सक्रिय ज्वालामुखी (Sub-glacial Volcanoes) आहेत. याचबरोबर अनेक शक्तिशाली भूकंपही या खंडात झालेले आहेत.
 
 

 
 

आता बघूया शेवटचे खंड. ते म्हणजे ऑस्ट्रेलिया. हे जगातील सर्वात लहान खंड आहे. याचे क्षेत्रफळ हे सुमारे ८६ लाख चौरस किलोमीटर आहे. हे असे एकमेव खंड आहे, ज्याच्या एकसंध भूभागावर एकच देश (ऑस्ट्रेलिया) पसरलेला आहे. या खंडामध्ये न्यूझीलंड तसेच टास्मानिया या बेटांचाही समावेश होतो. याच्या उत्तरेला इंडोनेशिया आणि पापुआ व नवीन गिनीची बेटे, पूर्वेला प्रशांत महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, आणि पश्चिमेला हिंदी महासागर आहे. हे खंड दुसऱ्या कोणत्याही खंडाला थेट जोडलेले नाही. या खंडातही अनेक भूशास्त्रीय वैशिष्ट्ये आहेत. ऑस्ट्रेलिया खंडाचा पूर्व भाग हा प्रशांत अग्निचक्राचा पूर्व भाग आहे. त्यामुळे खंडाच्या पूर्व भागात अनेक भूकंप झालेले असून जगातील काही सर्वात सक्रिय ज्वालामुखीही या भागात आहेत. न्यूझीलंडमध्ये अनेक विनाशकारी भूकंप झालेले आहेत. २०१६ साली उत्तर कँटरबरी (North Canterbury) येथे झालेला ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आणि इतर अनेक मोठे भूकंप या गोष्टीची पुष्टी करतात. भूकंप आणि ज्वालामुखीयतेशिवाय खंडामध्ये वालुकामय खडकाचा (Sandstone) एक सुंदर पर्वत आहे. याचे नाव आहे ‘उलुरू’ (Uluru). हा पर्वत स्थानिक आदिवासींसाठी पूजनीय आहे. याची उंची सुमारे ८६३ मीटर असून याच्या पायथ्याचा परिघ सुमारे ९.४ किलोमीटर आहे. याची निर्मिती पर्वताच्या आसपासच्या भागाची फार धूप झाल्यामुळे आणि तो भाग खाली बसल्यामुळे झाली आहे. ‘माऊंट कोशिउझको’ (Mount Kosciuszko) हा ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात उंच पर्वत आहे. हा पर्वत सुमारे सव्वादोन हजार मीटर उंच आहे. खंडाच्या पश्चिम भागात ‘माऊंट ऑगस्टस’ (Mount Augustus) नावाचा पर्वतदेखील आहे. यात सोन्याचे मोठ्या प्रमाणात साठे सापडल्यामुळे सन १८९४ मध्ये सोने खनन मोठ्या प्रमाणावर झाले. पर्वत बघितल्यानंतर खंडाच्या पूर्व भागात असलेली ‘ग्रेट बॅरियर रीफ’ (Great Barrier Reef) ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ रांग आहे. ही रांग सुमारे २ हजार, ३०० किलोमीटर लांब आहे आणि ती अवकाशातूनही दिसते.

 

 
 
 
याशिवाय समुद्राशी निगडित अजून एक सुंदर वैशिष्ट्य खंडातील व्हिक्टोरिया राज्यात आहे. एका समुद्रकिनाऱ्यावर किनाऱ्यापासून समुद्रात थोडे आत चुनखडीचे स्तंभच्या स्तंभ आहेत. यांना ‘दी ट्वेल्व्ह अपोस्टल्स’ (The Twelve Apostles) असे नाव आहे. हे स्तंभ कधी काळी किनाऱ्याचाच भाग होते. पण सतत जमिनीची धूप झाल्यामुळे हे स्तंभ आता एक-एकटे समुद्रात उभे आहेत. लाटांमुळे या स्तंभांचीही धूप होऊन अनेक गुहा या स्तंभांमध्ये तयार झाल्या आहेत. या खंडात मुर्रे, डार्लिंग यांसारख्या नद्या आहेत. त्यांत ‘मुर्रे’ (Murray) नदी ही सर्वांत लांब आहे. हिची लांबी सुमारे २ हजार, ५१० किलोमीटर आहे. या खंडाची जी काँटिनेंटल प्लेट आहे, तीच प्लेट भारताचीही आहे, म्हणूनच या प्लेटला ‘इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट’ (Indo-Australian Plate) असेही म्हटले जाते. अर्थात, या गोष्टीवर एकमत नाही. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आणि न्यूझीलंड या देशाच्या आसपास समुद्राखाली जी काँटिनेंटल प्लेटची हालचाल होते आहे, त्यामुळे या भागातून एक नवीन खंड निर्माण होण्याचे अनुमान काढले गेले आहे. शास्त्रज्ञांनी या खंडाला ‘झीलँडिया’ (Zealandia) असे नाव दिले आहे. असेही अनुमान काढले गेले आहे की, या खंडामध्ये आजवर कधीच न सापडलेले खनिजांचे तसेच, खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठेही असतील. त्यामुळे हे खंड उदयास आल्यानंतर जगात या खंडावरील संपत्तीवरील मक्तेदारीसाठी जबर स्पर्धा सुरू होईल, यात शंका नाही. सध्या हे खंड जवळजवळ पूर्णपणे पाण्यात बुडालेले आहे, तर बालीचा पिरॅमिड (Bali's Pyramid) या ठिकाणी हे हळूच पाण्याबाहेर डोकं काढून बघत आहे. अर्थात, पूर्ण खंड पाण्याबाहेर आल्यावर आत्ताचे हे बेट या खंडावरील एक उंच शिखर असेल. तर, आपण आपल्या पृथ्वीवरील सातही खंडांच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांची थोडक्यात माहिती घेतली.हे प्रकरण आता इथेच संपवून पुढील लेखापासून आपण ‘भूजल’ या प्रकरणाचा अभ्यास सुरू करू.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@