सर्वसामान्यांचं मन जपणारा नेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019
Total Views |


 


२०१६ च्या मे महिन्यात दिल्लीत एका बैठकीसाठी गेले होते. या प्रवासात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घ्यावी, असं मनात आलं. माझ्याकडे त्यांचा व्यक्तिगत मोबाईल नंबर होता. त्यावर एसएमएस करून परवानगी विचारली. ते मेसेज वाचतील पण रिप्लाय करणार नाहीत, हे अनुभवाने माहीत होतं. त्यानुसार, परवानगी विचारणाऱ्या मेसेजला उत्तर आलं नाही पण चक्क फोन आला. "सकाळी बरोबर ८ वाजता ये," म्हणाले आणि फोन ठेवून दिला. मी ठिक आहे, म्हणेपर्यंत फोन ठेवलेला होता. तेवढ्यात माझ्या मनात आलं की, "कामाच्या गडबडीत मुख्य दरवाजावरच्या सिक्युरिटीला जर माझ्या येण्याची सूचना दिली गेली नाही तर आपल्याला प्रवेश मिळणार नाही. म्हणून मी दुसरा मेसेज पाठवला की, "सिक्युरिटीला कळवण्याची व्यवस्था कराल ना?" अर्थातच त्यावरही उत्तर आलं नाही. मात्र सकाळी संरक्षणमंत्र्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचले तेव्हा सिक्युरिटीच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावाची नोंद होती.

 

संरक्षणमंत्र्यांसमवेत नाश्ता करण्याची आणि अनौपचारिक गप्पा मारण्याची संधी या भेटीने दिली. "फोटो काढूया का?," विचारल्यावर अगदी सहजपणे होकार दिला. आमच्या गप्पा चालू असताना त्यांच्या बंगल्याबाहेरच्या हिरवळीवर मोर फिरताहेत, हे माझ्या लक्षात आलं. पण असं एकदम उठून मोर बघायला कसं जायचं, असं वाटून मी बसून राहिले. बंगल्यातून बाहेर पडल्यावर मात्र मेसेज केला. "तुमच्या बंगल्यातले मोर पाहायचे होते. राहून गेले. फोटो पाठवता येतील का?" त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे मेसेजला उत्तर आलं नाही. मात्र ४/५ दिवसांनी मला दिलीप करंबेळकरांचा फोन आला. ते म्हणाले, "मनोहर पर्रिकरांच्या कार्यालयातून तुला फोन येतो आहे. तुझा फोन लागत नाहीय. जरा फोन कर." मी नंबर घेतला. त्यांच्या खाजगी सचिवांचा नंबर होता. फोन केल्यावर ते म्हणाले, "तुम्हाला मोराचे फोटो पाठवायचे आहेत, असं भाईंनी सांगितलं आहे. तुमचा मेल आयडी देता का?"

 

क्षणभर माझा कानांवर विश्वासच बसेना. आनंद तर झालाच पण त्यातून पर्रिकरांमधला माणसं जपण्याच्या गुणाचं दर्शन झालं. मी मेल आयडी दिला आणि काही वेळातच माझ्यापर्यंत मोराचे फोटो पोहोचले. त्या दिवशी माझ्या फेसबुक वॉलचं कव्हर त्या फोटोने सजलं. काहींनी तेव्हा विचारलंही की, "हा कुठला फोटो?" मी उत्तर दिलं नाही.

 

...आज हे सांगावंसं वाटलं.

 

अश्विनी मयेकर

कार्यकारी संपादक, सा. विवेक

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@