‘जीवितनदी’ एक प्रवाही चळवळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
पुण्याच्या मुळा-मुठा नद्यांना एकेकाळी असलेलं स्वच्छ, शुद्ध आणि प्रवाही रूप पुन्हा मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेली ‘जीवितनदी’ संस्था ही ‘नदी पुनरुज्जीवन’ या पर्यावरणातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेची जननी ठरली आहे. २०१४ साली स्थापन झालेल्या या एका सकारात्मक पर्यावरण चळवळीचा प्रवास जाणून घेऊया ‘जीवितनदी’च्या संस्थापक सदस्या शैलजाताई देशपांडे यांच्याकडून...
 

नदी पुनरुज्जीवनहा प्रकल्प आपण हाती घ्यावा असं का आणि कधी वाटलं? ‘जीवितनदी’ संस्थेचा जन्म कसा झाला?

 
शैलजाताई : ‘जीवितनदी’चे आम्ही सर्व कार्यकर्ते हे पर्यावरणतज्ज्ञ प्रकाश गोळे यांनी स्थापन केलेल्या ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चे विद्यार्थी आहोत. आम्ही सर्व मंडळींनी वेगवेगळ्या वर्षी ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा ‘Natural Resourse Management’चा डिप्लोमा कोर्स केला असल्यामुळे आम्ही अगोदर एकमेकांना फारसे परिचित नव्हतो. या कोर्समध्ये मिळणारं ज्ञान हे इतकं परिणामकारक असतं की, पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झालेले एकेक ‘अस्वस्थ आत्मे’ इथून बाहेर पडतात. २०१४ साली एक घटना अशी घडली की, आमचा एक सहकारी निरंजन उपासनी याने आपल्या मुलाचा वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘इकॉलॉजिकल सोसायटी’च्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मुळा-मुठा अभयारण्याच्या ठिकाणी बोलावलं. आम्ही १०-१५ जणं तिथे पोहोचलो आणि त्या समारंभात निरंजनने त्याच्या मनातली इच्छा आम्हाला बोलून दाखवली. तो म्हणाला की, “आज माझा मुलगा वर्षाचा झाला आहे. तो जेव्हा दहा वर्षांचा होईल तेव्हा मला त्याला अशी एक भेट द्यायची आहे की, तो मुळा-मुठा नद्यांमध्ये आनंदाने पोहू शकेल.” ही घटना घडली, त्याच्या महिनाभरच अगोदर ऋषितुल्य असलेले आमचे गुरु प्रकाश गोळे यांना देवाज्ञा झाली. गोळे यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग कुठेतरी व्हायला हवा असं प्रकर्षाने वाटायला लागलं. आम्ही सर्व पुण्याचे रहिवासी असल्यामुळे ज्या मुळा-मुठा नद्यांच्या काठी आपलं पुणे शहर वसलं आहे, त्या नद्यांची झालेली दुरवस्था दूर करून त्यांना स्वच्छ, शुद्ध आणि प्रवाही बनवण्यासाठी काही करता येईल का, यावर विचारमंथन सुरू झालं. रोज जाता-येता नदीची दुरवस्था बघून आम्ही अस्वस्थ व्हायचोच, पण “शी ! किती घाण नदी!” अशी लोकांच्या तोंडची वाक्य ऐकून आणखी अस्वस्थ व्हायला व्हायचं. अशा वाक्यांमधून लोकांचा नदीशी संबंध किती तुटला आहे, हे जाणवायला लागलं. असे आम्ही काही ‘अस्वस्थ आत्मे’ नंतर नदीकाठीच एकत्र जमायला लागलो आणि मृतप्राय झालेल्या नदीला जीवंत कसे करता येईल, याचा विचार करू लागलो. आम्ही ‘Volunteers Forms’ तयार करून कोणाकोणाला कुठल्या कुठल्या प्रकारचं काम करायला आवडेल, त्याचं एकत्रीकरण केलं. तेव्हापासून संस्थात्मक रचनेचा पाया घातला गेला, असं म्हणता येईल. तेव्हापासून पुढचे सहा महिने आम्ही फक्त नदीकाठी एकत्र जमून काय करता येईल, यावर विचारमंथन केलं. गोळे सरांनी १९८२-८३ साली मुठा नदीच्या जैवविविधतेचा अभ्यास करून तयार केलेला शोधनिबंध आम्ही संदर्भासाठी घेतला आणि प्रत्यक्ष मुठा नदीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मुठा नदीच्या प्रदूषणाचा अभ्यास असलेले डॉ. प्रमोद मोघे, नदीच्या पुरातत्त्वीय इतिहासाचा अभ्यास असलेले डॉ. शरद राजगुरू अशा तज्ज्ञांकडून आम्ही माहिती घेऊ लागलो. मुठा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत तिच्यात कसे कसे बदल होत गेले आहेत, याचा काळजीपूर्वक अभ्यास केला. ‘नदी परिसंस्था’ या संकल्पनेचे वेगवेगळे आयाम या अभ्यासात कळत गेले. जानेवारी २०१४ साली आम्ही हे सगळं अभ्यासात्मक आणि चिंतनात्मक काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर दीड वर्षांनी, म्हणजेच सप्टेंबर २०१५ मध्ये आम्ही पहिल्यांदा मुठा नदीचा उत्सव साजरा केला. लोक नदीपर्यंत यावेत, हा या उत्सवाचा हेतू होता. ‘जीवितनदी’ या संस्थात्मक चळवळीचा जन्म तेव्हा झाला असं म्हणता येईल.
 
 
 

 
 
 शैलजाताई देशपांडे
 

‘जीवितनदी’ अंतर्गत कोणकोणते उपक्रम केले जातात? आणि त्यांना लोकांचा प्रतिसाद कसा आहे?

 
शैलजाताई : ‘जीवितनदी’चा पहिला सुरू केलेला उपक्रम म्हणजे ‘रिव्हर वॉक’ जो गेली तीन वर्षे अखंड सुरू आहे. या उपक्रमामध्ये लोकांना मुठा नदीच्या किनारी बोलावून नदी परिसंस्थेची, तिच्या सध्याच्या परिस्थितीची आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची माहिती ‘जीवितनदी’च्या स्वयंसेवकांकडून दिली जाते. सकाळच्या वेळात सुमारे दीड तास सिद्धेश्वर घाटापासून ओंकारेश्वरच्या पुलापर्यंत हा ‘रिव्हर वॉक’ असतो. लोकांना नदीच्या जवळ आणणं, हा ‘रिव्हर वॉक’ आयोजित करण्यामागचा हेतू आहे. नदी पुनरुज्जीवनाचं महत्त्व लोकांना कळत होतं, पण ‘आम्ही याच्यात प्रत्यक्ष सहभागी कसं व्हायचं’ हा लोकांपुढे एक प्रश्न होता. यातून एका नव्या उपक्रमाचा जन्म झाला तो म्हणजे ‘विषद्रव्यरहित जीवनशैली’चा प्रचार-प्रसार. ‘National Chemical Laboratory’ने केलेल्या अभ्यासानुसार मुठा नदीचं ७० टक्के प्रदूषण हे घरगुती सांडपाण्यामुळे होतं, हे एक भीषण वास्तव आहे. आपण घरगुती स्वच्छतेसाठी जे साबण, डीटर्जंट, टूथपेस्ट, फ्लोअर क्लीनर इ. रसायनं वापरतो, ती सर्वात जास्त प्रमाणावर नदी प्रदूषणाला कारणीभूत आहेत. मग या रसायनांचा वापर कसा कमी करता येईल आणि त्याला पर्यायी उटणे, दंतमंजन, राख अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर स्वच्छतेसाठी कसा करता येईल यावर आम्ही कार्यशाळा, इ. घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. नदी पुनरुज्जीवनासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही, तर आपल्या घरातूनच आपण प्रदूषणाला आळा घालू शकतो, हे कुठेतरी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तिसरा नुकताच सुरू केलेला उपक्रम म्हणजे ‘दत्तक घेऊया नदीकिनारा’ (Adopt River Stretch). मुठा नदीच्या वेगवेगळ्या भागांतले नागरिक, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी त्यांच्या भागातला नदीकिनारा दत्तक घेऊन त्या किनाऱ्याची नियमित स्वच्छता करायची, अशी ही संकल्पना होती. त्याप्रमाणे सर्वप्रथम अदिती देवधर हिच्या पुढाकाराने विठ्ठलवाडीचा किनारा दत्तक घेतला गेला. आत्ता मुठा नदीवर चार, मुळा नदीवरचे दोन आणि मुळा-मुठा नदीवर एक असे सात नदीकिनारे दत्तक घेतलेले आहेत. त्या त्या किनाऱ्याच्या जवळ राहणारे लोक आठवड्यातून एक दिवस एकत्र येऊन किनाऱ्याची स्वच्छता आणि नदी-पुनरुज्जीवनासाठी इतर उपक्रम करतात. अदिती देवधर हिने ‘नदीची गोष्ट’ (Story of River) चित्रमय स्वरूपात तयार केली आहे. तिचं फिरतं प्रदर्शन आम्ही शाळा-महाविद्यालयांमध्ये, घाटांवर भरवतो. अलीकडे अहिल्यादेवी शाळेतील विद्यार्थिनी १५ दिवसांतून एकदा ओंकारेश्वर पुलावर या नदीच्या गोष्टीचे फलक हातात घेऊन उभ्या असतात आणि जाणाऱ्या-येणार्‍यांना नदीची काळजी घेण्याचं आवाहन करत असतात. या सगळ्या उपक्रमांना सुरुवातीला स्वाभाविकपणे अगदी थंड प्रतिसाद होता. मात्र, आज चार वर्षानंतर ‘जीवितनदी’ हे नाव पुण्यात प्रत्येकाला माहितीचं झाले आहे.
 

नदी पुनरुज्जीवनाच्या या मोहिमेत शासनापर्यंत पोहोचण्याचा आपण कितपत प्रयत्न केलात आणि शासनाकडून काही सहकार्य खरंच होत आहे का?

 

शैलजाताई : शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही अगदी सुरुवातीपासून केला. आम्ही पहिला ‘मुठाई उत्सव’ केला तेव्हाच आम्ही पुण्याच्या आयुक्तांना जाऊन भेटलो होतो आणि शासन आणि ‘जीवितनदी’ने एकत्र मिळून नदी पुनरुज्जीवनाचं काम हाती घेऊया, असं सुचवलं होतं. अर्थात, तेव्हा आम्हाला फारसा सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाला. ‘रिव्हर वॉक’ आणि ‘दत्तक घेऊया नदीकिनारा’ उपक्रम जेव्हा जोरदार सुरू झाले तेव्हा कचरा उचलणाऱ्या महानगरपालिकेच्या कामगारांशी आमचा सततचा संपर्क येत गेला. पण अधिकारी पातळीवर आम्ही अजून पोहोचलो नव्हतो. या वर्षीच्या दिवाळीत मात्र एक आशावाद जागृत करणारी घटना घडली. दिवाळीच्याच दिवशी आम्ही विठ्ठलवाडी घाटावर ‘दिवाळी पहाट’चा छोटासा कार्यक्रम केला. पुणे महानगरपालिकेवर नुकतेच नव्याने नियुक्त झालेले अधिकारी ज्ञानेश्वर मोळक आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी आमचं कार्य अगदी उत्सुकतेने समजून घेतलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचा पाठिंबा आम्हाला मिळायला लागला. पुण्यात आणि पुण्याच्या जवळपास पर्यावरणक्षेत्रात काम करणाऱ्या आम्ही २० संस्था एकत्र आलो आणि डिसेंबरमध्ये मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी, रामनदी या सगळ्या नद्यांवर आम्ही ‘भारतीय नदी दिवस’ साजरा केला. तेव्हा महानगरपालिकेचं भरपूर सहकार्य मिळालं. त्यानंतर पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी, आयुक्त, इतकंच नव्हे, तर खुद्द महापौरांनासुद्धा आम्ही नदीफेरीला आमंत्रित केलं आणि ते आवर्जून आले. यामुळे झालं काय की, महानगरपालिकेला ‘जीवितनदी’ संस्थेबद्दल एक आत्मविश्वास निर्माण झाला. ‘जीवितनदी’ला प्रशासनाशी जोडण्यात ज्ञानेश्वर मोळक यांचा मोठा वाटा आहे. आता याच्यापुढे एकत्र मिळून नदी पुनरुज्जीवनाचं काम व्यापक स्वरूपात कसं करता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

 

भारतातल्या नद्या स्वच्छ, शुद्ध आणि प्रवाही राहाव्यात यासाठी शासनाकडून आणि नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत?

 
शैलजाताई : नदी ही एक जीवंत आणि प्रवाही अशी प्रणाली आहे, याचं पुरेसं ज्ञान आपल्याकडे अजून नाही. यादृष्टीने शासनाकडून एक अपेक्षा अशी आहे की, शालेय अभ्यासक्रमामध्ये ‘नदी परिसंस्था’ हा विषय अंतर्भूत करायला हवा आणि त्याचं प्रत्यक्ष ज्ञान मुलांना द्यायला हवं, जेणेकरून लोकांचा नदीशी तुटलेला संपर्क पुनर्प्रस्थापित होईल. दुसरी एक अपेक्षा म्हणजे कुठलीही विकासकामं करताना नुसत्या नदीचा (Water Body) विचार न करता संपूर्ण नदी खोऱ्याचा (Catchment Area) सर्वांगिण शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. नागरिकांकडून अपेक्षा म्हणायची झाली, तर जीवनशैलीतला बदल ही मुख्य अपेक्षा आहे. आज लोकसंख्या जरी वाढलेली असली तरी, गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे ‘गरज’ आणि ‘हाव’ यांच्यातला फरक ओळखून आपण नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर केला, तर नदीसारखे अमूल्य जलस्रोत आपोआपच स्वच्छ, सुंदर आणि प्रवाही राहतील.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@