आशय समजून घेताना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2019
Total Views |


 


खरे म्हणजे पूर्वी ज्यांनी नवयुगाची मुहूर्तमेढ रोवली, त्याची फळे जशी सर्वसामान्यांना मिळाली, तशीच ती राज्यकर्त्यांनाही मिळाली. या बदलाचे व्यक्तीमत्व म्हणून जे प्रतिक भारतीय जनमानस पाहू इच्छित होते, ते आज फक्त मोदींमध्येच दिसते. नाविन्याचे, तंत्रज्ञानाचे प्रतिनिधीत्व करणारे म्हणून मोदी आजच्या पिढीला भावतातही. लोकांना ते आपले आयकॉन वाटतात.


राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी शनिवारी कला, संगीत, पर्यावरण, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत उत्तुंग झेप घेतलेल्या मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविले. मात्र, देशभरात सर्वाधिक चर्चा झाली ती कर्नाटकातील १०६ वर्षीय ‘वृक्षमाता’ सालुमरादा थिमक्का यांची! राष्ट्रपतींनी थिमक्कांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले आणि त्याचवेळी एक अद्भुत घटना घडली व राष्ट्रपतीही मोहरले. आतापर्यंत अशा पुरस्कार प्रदान कार्यक्रमात पाश्चात्त्यांच्या नाना प्रथा-परंपरांना अनुसरलेले एलिट, मॅनर्स वगैरे पाहत आलेल्या देशवासीयांसमोर थिमक्कांनी अस्सल भारतीयत्वाचे दर्शन घडवत चक्क राष्ट्रपतींच्या मस्तकावर हात ठेवत आशीर्वाद दिला. मोदीकाळात ‘पद्म’ किंवा अन्य नागरी पुरस्कार सर्वसामान्यांत राहूनही तळमळीने कार्य करणाऱ्यांना द्यायला सुरुवात झाली. सैफ अली खान वा तत्सम कचकड्यांऐवजी गावखेड्यात, दुर्गम भागात राहणाऱ्या असामान्यांचे कर्तृत्व देशाला माहिती होऊ लागले. शनिवारी ‘वृक्षमाता’ थिमक्का यांच्या माध्यमातून इथल्या माणसातल्या याच खऱ्याखुऱ्या संस्कृतीची, संस्काराची अभिव्यक्ती झाली. मात्र, ही नवी अभिव्यक्ती स्वतःच्या मोठेपणातच मश्गुल असलेल्यांना याआधी आणि आताही ना कळली, ना दिसली, हेही खरेच. पण रसायनशास्त्रात जसे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायू असतात, तशा त्या व्यक्ती आणि त्यांच्या अभिव्यक्ती कुठेतरी राबत होत्याच. आता त्या लोकांसमोर आल्या, सालुमरादा थिमक्काही त्यापैकीच एक. म्हणूनच साध्यासुध्या वाटणाऱ्या पण आपल्या क्षेत्रात मानदंड प्रस्थापित करणाऱ्या थिमक्कांच्या अकृत्रिम कृतीतील आनंद व सौंदर्य देशभरातल्या लहानथोरांसह सर्वांनी अनुभवले, नावाजले.

 

सर्वसामान्य माणसे आपल्या छोट्या छोट्या हालचालींतून, हावभावांतून गहन संदेश देत असतात. मोठमोठ्या विद्वानांच्या वा बुद्धीजीवींच्या गूढ चर्वितचर्वणापेक्षा तो साधा सरळ दिसत असला तरी तेच खरे जनमानस असते. वृक्षमाता थिमक्का यांच्या आशीर्वादाच्या कृतीमागे असाच एक निश्चित अर्थ आहे, जो ओळखला पाहिजे. वस्तुतः ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचा गेल्या ७२ वर्षांतला प्रवास थक्क करणारा आहे. १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकानेच देशउभारणीत आपले योगदान दिले. हा एकूणच कालखंड भारतासाठी एक राष्ट्र म्हणून संघर्षमय असाच होता. केंद्रीय सत्तेपासून राज्यपातळीवरील सत्तेचा कारभार हाकणारे व देशातल्या सर्वसामान्य जनतेतही आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणारे आहोत, ही भावना रुजलेली होती. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, दूधासाठी किंवा अन्नधान्यासाठी रेशन दुकानासमोर लागलेल्या रांगा, निवारा अन् वस्त्रांचे अपुरेपण हेही तेव्हाचे वास्तव होते. नंतर जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा देशही निरनिराळ्या क्षेत्रात भरारी घेऊ लागला. भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, आयआयटी, आयआयएम, एम्स या देशपातळीवर कार्य करणाऱ्या संस्था, भाक्रा-नांगल, हिराकूडसारखी मोठमोठी धरणे, राष्ट्रीयीकृत बँका, हरितक्रांती, धवलक्रांती, संगणकप्रणालीचे स्वागत, पेट्रोलियम क्षेत्रात कार्यरत कंपन्या, खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाचे धोरण, महामार्ग-मेट्रो प्रकल्प, उडान योजना, मनरेगा, जनधन योजना, थेट अनुदान हस्तांतर, उज्ज्वला योजना, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया आदी प्रत्येकच घटना, प्रसंगांतून देश प्रगतीच करत आला. अर्थातच यात आतापर्यंत देशावर सत्ता गाजवणाऱ्या सर्वांचे काही ना काही योगदान होते, जे कोणीही नाकारू शकणार नाही.

 

म्हणूनच मागे वळून पाहता या कालावधीत देश म्हणून आपण एका विशिष्ट अशा टप्प्यावर येऊन उभे असल्याचे दिसते, पटते. देश म्हणून, राष्ट्र म्हणून आपण नक्कीच काही यश मिळवल्याचे, अभिमानास्पद कामगिरी केल्याचे पाहायला मिळते. देशात मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग निर्माण झाला, ते याच ७२ वर्षांचे फळ होय. याच मध्यमवर्गाच्या हाती सर्वाधिक खरेदी क्षमता असल्याचा प्रत्ययही नेहमीच येतो. प्रचंड संख्येतील मध्यमवर्गामुळेच अर्थचक्राची गती निरंतर सुरू असल्याचे, त्यातूनच उद्योग-व्यवसाय वाढत असल्याचे दिसते. हे कोणीतरी कधीतरी काहीतरी पेरल्यामुळेच तर झाले आहे ना? दुसरीकडे भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या वा नव्याने नावारूपाला आलेल्या ‘आसियान’, ‘सार्क’ समुहांतील राष्ट्रांकडे पाहता तिथली स्थिती बिकट असल्याचेच दिसते. पाकिस्तान, बांगलादेश, ब्रुनेई आदी देशांत मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी घातलेला गोंधळ, श्रीलंका, म्यानमारमध्ये वंश आदींच्या नावाखाली उसळलेला हिंसाचार, माजलेले अराजक त्या त्या देशात लोकशाही मूल्ये रुजली नसल्याचेच दाखवतात. इतकेच नव्हे तर आज चीनसारखा अजस्त्र देश आशियातील कितीतरी देशांवर आर्थिक ताकदीच्या वा लष्करी बळाच्या जोरावर वर्चस्व गाजवताना, आपल्या ताब्यात ठेवताना दिसतो. भारतात मात्र यापैकी काही झाले नाही. आपली नेतेमंडळी कितीही भ्रष्टाचारी, लाचखोरी वा दलाली करणारी असली तरी इथे गेल्या ७२ वर्षांत अराजक निर्माण झाले नाही. चीन आजूबाजूच्या नेपाळ, भूतान वा मालदीव आदी देशांना ज्याप्रकारे अंकित करताना दिसतो, तशी हिंमत त्याने भारताबद्दल ना कधी केली ना कधी करू शकतो, तसा विचारही तो करू शकत नाही. हे कसे झाले असेल? देशावर ज्या कोणी राज्य केले त्यांच्यामुळेच ना? त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे, राबवलेल्या धोरणांमुळेच ना?

 

दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यानंतर देश एका मोठ्या आवर्तनातून परिवर्तनाच्या दिशेने वेगाने दौडू लागल्याचेही आपल्याला माहिती आहेच. परिणामी मागल्या पिढीने जे दुःख, कष्ट भोगले ते गेल्या काही काळापासून ओसरायला सुरुवात झाली. आता तर राहणीमानाचा, दळणवळणाचा, सोयी-सुविधांचा पट इतका काही बदलला की, सध्याच्या पिढीला आपल्या वडीलधाऱ्यांच्या काळात ‘अमूक होते किंवा तमूक नव्हते’ हे ऐकले की आश्चर्य वाटते. खरे म्हणजे पूर्वी ज्यांनी नवयुगाची मुहूर्तमेढ रोवली, त्याची फळे जशी सर्वसामान्यांना मिळाली, तशीच ती राज्यकर्त्यांनाही मिळाली. अन् या बदलाचे व्यक्तीमत्व म्हणून जे प्रतिक भारतीय जनमानस पाहू इच्छित होते, ते आज फक्त मोदींमध्येच दिसते. नाविन्याचे, तंत्रज्ञानाचे प्रतिनिधीत्व करणारे म्हणून मोदी आजच्या पिढीला भावतातही. लोकांना ते आपले आयकॉन वाटतात. वृक्षमाता थिमक्का यांच्या राष्ट्रपतींना आशीर्वाद देण्याच्या कृतीतही तोच आशय दडलेला आहे; फक्त तो आपण समजून घेणे गरजेचे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@