दिग्विजयाचा वारसदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2019
Total Views |



मनोहर पर्रिकर गेले. पर्रिकरांचे निधन ही घटना टाळण्यासारखी नाही, याची कल्पना सगळ्यांनाच होती. गेल्या वर्षी लिलावती इस्पितळात दाखल झाल्यापासून ते आज त्यांची प्राणज्योत मालवेपर्यंत राजकारण, समाजकारण याची जाण असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्यासाठी काही ना काही भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांचा कर्करोग बरा होणारा नाही, हे कळल्यानंतर व्यक्त होणारी जनसामान्यांची हळहळ कदाचितच कोणा राजकारण्याच्या नशिबी आली असावी. हे नशीब त्यांना लाभले, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे. प्रमोद महाजन असो किंवा मनोहर पर्रिकर, हे नेते अकाली काळाच्या पडद्याआड गेले. भविष्यातील भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देण्याची क्षमता असलेली ही माणसे होती. महत्त्वाचे म्हणजे केवळ राजकारणातल्याच नाही तर राजकारणाबाहेरील लोकांनाही तसे वाटत होते. भाजपला आजच्या सारखे अच्छे दिन आलेले नसण्याच्या काळात या मंडळींनी सत्तास्थापनेचे शिवधनुष्य उचलले आणि त्यावर स्थिर प्रशासनाची प्रत्यंचाही चढवून दाखविली. बाहेरून पाहणार्या माणसाला ही साधारण घटना वाटू शकते. नेहमीचे राजकारण म्हणून कोणी त्याकडे नाक मुरडूनही पाहू शकेल पण, एका विशिष्ट राजकीय विचाराला निष्कंप निष्ठा वाहिलेल्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी विजयाचा संदर्भबिंदू होण्याचे, राजकीय विजयाचे वारसदार होण्याचे काम पर्रिकरांनी केले. आपणही सरकार स्थापू शकतो, ते उत्तमप्रकारे चालवू शकतो, विकासाच्या परिभाषेत राजकारणाची मांडणी करू शकतो, असा विश्वास त्यांनी पुढच्या पिढीतील राजकीय कार्यकर्त्यांसाठी निर्माण केला.

 

पर्रिकरांचे व्यक्तिमत्त्व अजून एका अर्थाने महत्त्वाचे होते. राजकारण्यांची म्हणून एक प्रतिमा झालेली आहे. माध्यमांनी ती अधिक रंगविली असली तरी त्याला राजकारण्यांचे वागणेही तितकेच जबाबदार आहे. पर्रिकरांनी त्याला छेद दिला. पवई आयआयटीसारख्या ठिकाणाहून उच्चविद्याविभूषित होऊनही राजकारणात जावे, काही बदल घडवून दाखवावा, असे त्यांना वाटले आणि त्यांनी ते करूनही दाखविले. काँग्रेस आणि मगोपसारख्या पक्षांमध्ये फिरत असलेली सत्तेची ढाल पर्रिकरांनी भाजपकडे खेचून आणली. आपल्याकडे पैसा हवा, गॉडफादर हवा, भ्रष्टाचार करून त्यापासून नामानिराळे राहाता येण्याचे कसब हवे, या जनमानसात रुजलेल्या संकल्पनांवर मात करीत पर्रिकर राजकारणात यशस्वी झाले. सत्तेच्या मागे लागणारे खूप परंतु, मृत्युपंथाला लागल्यावर स्वत:च्या क्षमतेची पारख करणार्या माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत सत्ता सोडायला तयार नव्हती, याला नियतीचा काव्यगत न्याय म्हणावा की, पर्रिकरांमधल्या राजकारण्याची चिकाटी?

 

पर्रिकर दिल्ली सोडून गोव्याला आले. गोव्यात त्यांनी स्थापलेले सरकार हा वेगळ्याच चर्चेचा विषय झाला होता पण पर्रिकरांना त्याची फिकीर नव्हती. त्यांनी आपल्या कामात स्वत:ला झोकून दिले होते. गोव्यातले पूल, प्रशस्त आणि रूंद रस्ते, एक ना अनेक कामे त्यांनी झपाट्याने पूर्ण केली. मागे संख्याबळ किती आहे? आपली खुर्ची जाणार नाही ना? असल्या प्रश्नांना त्यांच्याकडे थाराच नव्हता. विजयाच्या उन्मादाचा तर लवलेशही नाही. निवडणूक संपली की कामाला लागायचे, असा हा माणूस. शिक्षण मंत्रालय हे तसे मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवत नसलेले खाते पर्रिकरांनी आपल्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात स्वत:कडे ठेवले होते. या आणि अशा कितीतरी गोष्टी पर्रिकरांविषयी सांगता येतील. कार्यमग्न जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, ही उक्ती सार्थ करीत पर्रिकरांनी जगाचा निरोप घेतला. मूल्य ही सांगण्याची नव्हे तर जगण्याची गोष्ट आहे, असा संदेश आपल्या वागण्यातून देणारे पर्रिकर भारतीय राजकारणातले एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव स्मरणात राहतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@