धडा कोणी शिकवावा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
२०१४ ही निवडणूक हिंदूविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीची होती, तशी २०१९ ची निवडणूक देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीची असेल. इतके जरी लक्षात घेतले तरी, मग या दिवाळखोरांना धडा कोण शिकवणार, असा प्रश्न मनात येणार नाही. कारण, त्याचे उत्तर आपण म्हणजे सामान्य नागरिक आहोत. आपल्याच हाती जी मताची शक्ती आहे किंवा अस्त्र आहे, त्याचा उपयोग अशा लोकांच्या विरोधात करण्यापासून आपल्याला कोणी रोखलेले नाही.
 

राहुल गांधींपासून केजरीवालांपर्यंत सगळे भारतीय सैन्याच्या वा सुरक्षादलाच्या कृतीवर शंका घेतात आणि पाकिस्तानला मदत करतात. त्याचा अनेकांना संताप येतो आणि मग सरकार त्यांना धडा का शिकवत नाही, असाही प्रश्न विचारला जातो. सरकारला हे शक्य असते, तर ‘टुकडे टुकडे टोळी’ इतकी मोकाट हिंडू फिरू शकली नसती. हे सरकारला शक्य नसते. कारण, सरकारला प्रत्येक गोष्ट कायद्याच्या मर्यादेत राहून करावी लागत असते. कोणालाही देशद्रोही ठरवून तुरूंगात डांबता येत नाही किंवा गोळ्या घालून मारता येत नाही. निदान आज तरी तशी सुविधा मोदी सरकारला उपलब्ध नाही. जवाहरलाल नेहरू वा इंदिराजींच्या जमान्यात तशी सुविधा होती आणि त्यांनी अतिशय मुक्तपणे त्याचा वापर केला. हे भले त्यांच्या पणतू-नातवाला ठाऊक नसेल. पण, त्याच पूर्वजांचे गोडवे गाणाऱ्यांना पक्के ठाऊक आहे. इंदिराजींची १९७० च्या दशकात नक्षलवाद कसा मोडीत काढला किंवा नेहरूंनी काश्मिरात ‘आझादी’ असा शब्द बोलणाऱ्या शेख अब्दुल्लांना किती वर्षे तुरूंगात सडवलेले होते, ते वयोवृद्ध पत्रकार नागरिकांना ठाऊक आहे. कारण, त्यांच्या गळ्यात मानवाधिकाराचे लोढणे बांधलेले नव्हते आणि राज्यसभेची बेडी त्यांच्या पायात नव्हती. जे नरेंद्र मोदींच्या मार्गातले मोठे अडथळे आहेत. पण, म्हणून देशाला इजा करू शकणाऱ्या अशा लोकांना धडा शिकवणे अशक्य अजिबात नाही. तो धडा सरकार मात्र शिकवू शकत नाही. ज्यांना अशा देशविरोधी वक्तव्ये किंवा कृतीचा राग येतो, त्यांना हा धडा शिकवणे सहजशक्य आहे. तो धडा मतदानातून शिकवता येत असतो. ऐन निवडणुकांच्या मोसमात जे देशाला घातक कृती वा वक्तव्ये करीत आहेत, त्यांना मतदानातून नामशेष व नामोहरम करणे सामान्य मतदाराच्या हाती आहे. कारण, ही सगळी मंडळी अखेर मतांची लाचार असतात. त्यांना मतातूनच धडा शिकवता येत असतो.

 

पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी भाजपला वा एनडीएला सत्ता मिळवून दिली, असा दावा केला जातो. त्यात अजिबात तथ्य नाही. मोदींना सत्ता सामान्य मतदाराने मिळवून दिलेली होती. ज्याप्रकारे मनमोहन व सोनियांनी देशाचे दिवाळे वाजवले होते, त्यामुळे विचलित झालेल्या मतदारानेच देशात राजकीय क्रांती घडवली आणि सत्तांतराचा प्रयोग यशस्वी केला होता. तेव्हा त्याला ‘हिंदुत्वाचा विजय’ मानले गेले. त्याचा अर्थ, स्वत:ला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवणाऱ्यांना तरी कितीसा उमगला होता? लोकांनी अयोध्येत मंदिर उभारले जावे म्हणून मते मोदींना दिली नव्हती, तर ऊठसूट हिंदूंना ‘गुन्हेगार दहशतवादी’ म्हणवणाऱ्यांना कोट्यवधी हिंदूंनी धडा शिकवला होता. त्यांच्या हिंदूविरोधी भूमिकेला असे नाकारले की, राहुल गांधींना इटलीतील आजी विसरून देशाच्या कानाकोपऱ्यातील देवळांच्या पायऱ्या झिजवणे भाग पडलेले होते. काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करणारा अहवाल अ‍ॅण्टोनी समितीने सादर केला. त्यात आपण हिंदूंचे शत्रू ठरल्याने पराभूत झालो. ‘अल्पसंख्याकांचा पक्ष’ अशी काँग्रेसची प्रतिमाच आपल्याला बुडवून गेली, असा निष्कर्ष त्या समितीने काढला होता. ते सगळ्या जगाला दिसत होते आणि त्यावर कोणी कुठली कारवाई केलेली नव्हती. सत्ता काँग्रेसच्या हाती होती आणि हिंदूंना कुठेही दाद मिळणार नाही, असे वाटत होते. तेव्हा मोदी कोणाच्या मदतीला आलेले नव्हते. कोट्यवधी मतदारांनीच आपल्या बळावर त्या प्रश्नाचे उत्तर मतातून दिलेले होते. त्यातून राहुल गांधी धडा शिकले आणि रातोरात ‘जानवेधारी हिंदू’ होऊन गेले. त्याचा अर्थच जे आज कोणी पाकिस्तानधार्जिणे बोलत आहेत किंवा पाकला लाभदायक ठरेल अशी कृती करीत आहेत, त्यांना कायदा वा सरकार धडा शिकवू शकत नाही. तो धडा मतदार शिकवू शकतो. जो कोणी पाकप्रेमाने उचंबळला आहे, त्याला राजकारणात नामोहरम करणे हाच त्यावरचा उत्तम उपाय किंवा धडा असू शकतो.

 

२०१४ ही निवडणूक हिंदूविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीची होती, तशी २०१९ ची निवडणूक देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीची असेल. इतके जरी लक्षात घेतले तरी, मग या दिवाळखोरांना धडा कोण शिकवणार, असा प्रश्न मनात येणार नाही. कारण, त्याचे उत्तर आपण म्हणजे सामान्य नागरिक आहोत. आपल्याच हाती जी मताची शक्ती आहे किंवा अस्त्र आहे, त्याचा उपयोग अशा लोकांच्या विरोधात करण्यापासून आपल्याला कोणी रोखलेले नाही. शिवाय हे सगळेच राजकीय पक्ष सत्तेचे व पर्यायाने मतांचे लाचार असल्याने त्यांना मतांची भाषा कळते. ऊठसूट मुस्लीम अल्पसंख्यांकाची मते कुठे जातील त्याची चर्चा चालते. कारण, मुस्लिमांची मते एकगठ्ठा पडतात, हा अनुभव आहे. त्यामुळेच मुस्लिमांच्या धर्मभावना किंवा अन्य कुठल्याही श्रद्धांना धक्का लागू नये, याची प्रत्येक राजकारणी काळजी घेत असतो. त्याच्या उलट हिंदूंना कोणीही कशाही लाथा घालाव्यात किंवा शिव्याशाप द्यावेत, असा प्रघात आहे. २०१४ नंतर तो काहीसा कमी झाला आहे. त्यामुळेच मग हिंदूंच्या ऐवजी देशाला वा राष्ट्रप्रेमाला शिव्याशाप सुरू झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी जितक्या आवेशात हिंदूंना वा हिंदू धर्माला दोषी ठरवले जात होते, तितके आता होत नाही. कारण, दुखावलेला हिंदू मतांनी मारतो, हे लक्षात आलेले आहे. मात्र, राष्ट्रप्रेमाला लाथा घातल्या म्हणून काही बिघडणार नाही, असा समज रूढ झाला आहे. यावेळी त्याला धडा शिकवावा लागणार आहे. बारकाईने बघितले, तर एक गोष्ट लक्षात येईल. आजकाल संघ, सैन्य, सरकारी संस्था किंवा राष्ट्रवाद यावर हल्ले होतात. कारण, हिंदूंना बोलण्याचे धैर्य अशा टोळ्यांनी गमावले आहे. प्रत्यक्षात त्यांचे लक्ष्य हिंदूच आहे. कारण, आता राष्ट्र म्हणजेच हिंदुत्व हे सत्य अशा विरोधकांनीही स्वीकारलेले आहे. मग हिंदूंना खच्ची करायचे, तर राष्ट्रप्रेम वा राष्ट्रभावनेला खिळखिळी करण्याची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.

 

जिहादी दहशतवादी वा पाकिस्तानविषयी आपुलकी आणि भारतीय सेनादलाचा द्वेष त्यातून आलेला आहे. त्यांना कायद्याच्या चौकटीतून बगल देण्याची सोय असल्याने अशा गुन्हेगारांना कायदा रोखू शकत नाही की सरकार कारवाई करू शकत नाही. कायद्याच्या मर्यादा सांभाळून ही हरामखोरी चाललेली असते. असे गुन्हे न्यायालयात सिद्ध करणे अशक्य असल्याने गद्दारी उजळमाथ्याने चाललेली असते. त्यासाठी कायदे, राज्यघटना यांचाच आधार घेतला जात असतो. म्हणूनच सरकारचे हातही बांधलेले असतात. मात्र, मतदार वा जनता यांची शक्ती कायद्याच्या जंजाळात गुंतलेली नसते. तिला अशा लोकांना चोख उत्तर देता येते. तुम्ही भारतीय सेनेवर शंका घेता? तुम्ही पाकिस्तानधार्जिणे वागता? तुम्ही दहशतवादी जिहादला पाठीशी घालता? मग तुम्हाला मत नाही, असा बडगा मतदाराने उचलला, तर त्याला कोणी कायदा आक्षेप घेऊ शकत नाही. गरिबी, शेतकरी समस्या किंवा बेरोजगारी वगैरे प्रश्नांना पुढे करून मते मागायची आणि मते मिळाल्यावर मात्र देशद्रोही कारवायांची पाठराखण करायची, असा हा फसवेगिरीचा धंदा झालेला आहे. त्याला मतदार रोखू शकतो. मागील काही वर्षांत किंवा महिन्यांत ज्यांनी देशप्रेमाची टवाळी केली वा पाकिस्तानला पूरक वक्तव्ये केली वा भूमिका घेतल्या, त्यांना मत नाकारूनही भागणार नाही, तर असे लोक आपापल्या मतदारसंघात किंवा प्रभावक्षेत्रात पराभूत होतील, याची मतदाराने व्यवस्था केली तरी, यांना चांगला धडा शिकवला जाऊ शकतो. जसे मागील मतदानानंतर हिंदूंना दुखावणे संपुष्टात आले तसेच, मग २०१९ नंतर राष्ट्रवाद राष्ट्रप्रेमाची हेटाळणी संपुष्टात येऊ शकते. ते काम कायद्याने होण्याची अपेक्षा गैरलागू आहे. आपापल्या भागात जागी देशविरोधी बकवास करणाऱ्यांना संपवण्याचा चंग मतदाराने बांधावा. धडा शिकणारे शिकतील. पण शिकवणारे आपण पुढाकार घेणार आहोत का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@