शोकांतिकेचा प्रारंभ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |



२०१९ची निवडणूक २०१४ प्रमाणेच अनेकांच्या भुवया उंचवणारी होती, तशीच यावेळीही अनेकांना धक्का देणारी असेल. आता ज्या काही शोकांतिका सांगितल्या जात आहेत, त्या सगळ्याच शोकांतिकांच्या अंताचा हा काळ आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.


‘नियतीचा काव्यगत न्याय’ ही जरा वाचायला, ऐकायला काव्यगत गोष्ट वाटत असली, तरी ती प्रक्रियादेखील खरोखरच काव्यात्मकच आहे. एखाद्याबरोबर आज जे घडत आहे, त्याची पापे जेव्हा त्याला फेडावी लागतात, तेव्हा काय काय घडत जाते, त्याचे हे आणि कशा अकल्पनीय घटनाक्रमाने गोष्टी घडत जातात, हे सगळे खरोखरच विचार करायला लावणारे असते. साधारण महिन्याभरापूर्वी युवा मोर्चाच्या जाहीर कार्यक्रमात युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांना ‘शकुनी’ म्हटले. पवारांना ठाकरे, अण्णा हजारे, गो.रा. खैरनार या मंडळींनी जी विशेषणे लावून संबोधले, त्या तुलनेत हे फारच साधे विधान होते. पण, लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गलिच्छ प्रकारे प्रमोद महाजनांच्या दुर्दैवी निधनावर कौटुंबिक भाष्य करणारी होर्डिंग्ज लावली. राजकारणात कुटुंबीयांना ओढण्याची पद्धत नसते, पण तरीसुद्धा इथे ते केले गेले. पवारांच्या सावलीत मोठ्या झालेल्या लहान लहान झुडुपी नेत्यांनी तर शिमगा साजरा करावा तसा टिवटिवाट केला. ज्या पवारांच्या नावाने ही सगळी मंडळी मोठी झाली, त्यांनी आपले शेपूट हलवून विरोधी दिशेने भुंकून आपली इमानदारीही या निमित्ताने सिद्ध करून घेतली. आता मात्र जरा शुकशुकाटच आहे. दोन आकडी संख्या कधीही पार न करू शकलेल्या आमदार, खासदारांचा पक्ष चालविणार्‍या पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘आशावादी’ मात्र चांगलेच ठेवले.

 

नव्वदीच्या राजकीय अस्थिरतेच्या दशकात देवेगौडांचेही दैव फळफळले, गुजरालही पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र, ‘आशावादी कार्यकर्त्यांचे’ साहेब हुलकावण्यांचेच मानकरी ठरले. आताची चर्चा पवारांनी निवडणूक न लढविण्याची असली तरीही तिचे कारण मात्र कौटुंबिकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या किंवा प्रसिद्ध करायला लावल्या गेलेल्या पहिल्याच यादीत आलेले नाव सगळ्यांच्याच भुवया उंचविणारे आहे. पवारांनी आपल्या पूर्वी न लढण्याचे, नंतर लढण्याचे आणि आता पुन्हा न लढण्याचे कारण स्पष्ट केले आहे. या तिन्ही कारणात त्यांनी चाणाक्षपणे खरे कारण सांगितलेले नाही, हे पक्के. पवारांनी आयुष्यभर भाट उत्तम सांभाळले.

 

पवारांच्या बाबतीत काही झाले की, ‘साहेब कसे सुसंस्कृत’ यांच्या झांजा सगळीकडे वाजायला लागतात. यात पत्रकार आहेत, कवी आहेत, लेखक आहेत. संपादक, कलाकार वगैरेही आहेत. निरनिराळ्या सेंटर्सच्या शिष्यवृत्त्यांवर ही मंडळी वर्षभर पोसली जातात. पवारांना जे सांगायचे नव्हते ते त्यांच्या अशाच एका भाटाने जगाला ओरडून सांगितले आहे. पहिल्या श्रेणीतले निष्ठावंत इमानदारीत शेपूट हलवून दाखवतील आणि गप्प बसतील. स्वत:ला ‘विचारवंत’ मानणारी मंडळी मात्र ज्या काही प्रकारच्या बौद्धिक कसरती करतात, ते रंजकच मानावे लागेल. काय हा भला माणूस आणि कसा कुटुंबकलहाने ग्रासला, अशी ही गचाळकथा एका उत्तम थोतांडाचा नमुना आहे.

 

कुटुंबकलहाने केवळ अशाच राजकारण्यांना ग्रासले, ज्यांनी राजकारणाच्या नावावर कुटुंबकबिल्यांचे बस्तान कायम बसविण्याचा प्रयत्न केला. पवारही त्याला अपवाद नाहीत. कुठल्याही निवडणुकीत आपली क्षमता सिद्ध न करू शकलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना पवारांनीच राजकारणात आणून रुजविले. ज्या बारामतीच्या विकासाच्या रम्य आणि सुरस कथा देशभर सांगितल्या जातात, तोच पवारांचा परंपरागत बारामती मतदार संघ सुप्रिया सुळेंसाठी सोडून पवार माढ्याला निघून गेले होते. इतके करूनही बारामतीहून सुप्रिया सुळे अपेक्षित मताधिक्याने निवडून आल्या नव्हत्या, उलट मोदींकडून मिळविलेल्या आशीर्वादाची चर्चाच त्यावेळी अधिक रंगली होती. आता पवारांना माढ्यातही रस नाही, कारण तिथली राजकीय परिस्थिती आता पूर्णपणे बदलून गेली आहे. ज्यांच्या जीवावर पवारांनी मागच्या खेपेला मिरासदारी केली, त्या मोहिते-पाटलांची साथ आता सोबत आहे की नाही, याचीच खात्री देता येत नाही, अशी स्थिती आहे. ‘जाणत्या राजा’चे संबोधन मिरविणार्‍या माणसासमोर अशी परिस्थिती यावी आणि त्यातही त्यांच्या भाटांना धोरणीपणा दिसावा यापेक्षा वेगळा बुद्धीमांद्य तो काय असावा?

 

२०१४ ची निवडणूक विरोधकांच्या वाट्याला काय घेऊन आली होती, हे अनेक उत्साही लोकांना कळले नव्हते. चिदंबरम, कपिल सिब्बल यांसारख्या लोकांनी ते उत्तम ओळखले होते आणि त्यामुळे ते निवडणुकीच्या भानगडीत पडले नाही. पवारांना तेव्हाही त्रिशंकू, मध्यावधी आणि कसली कसली स्वप्ने पडत होती. 2019 चेही तसेच आहे. आताचे सर्व्हे, उद्याचे सर्व्हे काहीही सांगत असले तरीही आणि एअर स्ट्राईकच्या पूर्वीची स्थिती माध्यमांनी काहीही रंगविली असली तरी या देशात एक लाट नक्कीच आहे आणि ती गेल्या चार वर्षांत धारदार होत गेली आहे. कधी नव्हे अशा प्रकारचे एक ‘राष्ट्रीय भान’ भारतीय जनमानसात निर्माण झाले आहे. हे भान पोकळ अस्मितेचे नाही. त्याला ऐहिक उपलब्धींची किनारही आहे. यात तरुण आहेेत, महिला आहेत, नोकरदार आहेत, उद्योजकही आहेत. नरेंद्र मोदी या सगळ्याचा नैसर्गिक चेहरा झाले आहेत. ही सगळी मंडळी मोदींच्या मागे उभी राहतील. जनमताचा रेटा निवडणुकीपूर्वी अनुभवण्याचा हा काळ आहे. राज ठाकरेंसारखा लोकांना आवडणारा नेता एअर स्ट्राईकवर टीका करीत असतो आणि त्याचवेळी त्याच्या पक्षाचा एकमेव आमदार त्याच्याच पक्षातून निसटत असतो.

 

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सांगली. आज काँग्रेस तो जिल्हाही मित्रपक्षाला द्यायला तयार आहे. पवार निवडणूक लढविणार नाहीत. मायावतींनीही आपल्या पक्षाला स्पष्टपणे बजावले आहे की, त्या केवळ प्रचारावर लक्ष केंद्रित करतील. महाराष्ट्रात जातीयतेचा शिमगा माजविणारे प्रकाश आंबेडकरही त्यांच्या वंचित आघाडीच्या यादीत नाहीत. बाहेर ही मंडळी काहीही आव आणत असली तरी देवेंद्र फडणवीस पवारांच्या बाबतीत म्हणाले तसे ही सगळी मंडळीही वार्‍याची दिशा ओळखून आहेत. २०१९ची निवडणूक २०१४ प्रमाणेच अनेकांच्या भुवया उंचवणारी होती, तशीच यावेळीही अनेकांना धक्का देणारी असेल. आता ज्या काही शोकांतिका सांगितल्या जात आहेत, त्या सगळ्याच शोकांतिकांच्या अंताचा हा काळ आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@