भारताबद्दलच्या आकर्षणाचे रूपांतर ‘सदिच्छाशक्ती’त व्हावे : खा. विनय सहस्त्रबुद्धे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |



अनय जोगळेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

 

मुंबई : भारताबद्दल सध्या जगभरात प्रचंड कुतूहल आणि आकर्षणही आहे. पण, याचबरोबर भारत म्हणजे काय, याचे जागतिक पातळीवर आकलन निर्माण करणे आज अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी भारताबद्दलच्या कुतूहलाचे, आकर्षणाचे रूपांतर अनेकमितीय गोष्टींचा पाठपुरावा करणार्‍या सदिच्छाशक्तीत (सॉफ्ट पॉवर) करणे गरजेचे आहे,” असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. ते आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक, दै. मुंबई तरुण भारतच्या विदेशनीतीसाप्ताहिक स्तंभाचे लेखक अनय जोगळेकर यांच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजेया पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मे २०१४ ते जानेवारी २०१९ या काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशादर्शक परराष्ट्र धोरणांवरील तसेच, अमेरिकन निवडणुका, ब्रेग्झिट यांसारख्या संबंधित विषयांवरील अनय जोगळेकर यांच्या दै. मुंबई तरुण भारतसह इतर दैनिक, मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे संपादन करून परममित्र पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाइन यांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचबरोबर व्यासपीठावर वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, ‘परममित्र पब्लिकेशन्सचे राम जोशी, शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्वस्त सुरेश देवळे, सुनील जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले.

 

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी वसुधैव कुटुम्बकम्ही संकल्पना प्रत्येक भारतीयामध्ये अंगभूतच असल्याचे सांगत, “नकाशातला शेजारी देश हा आपला प्रत्येकवेळी मित्रच असतो असे नाही,” असे म्हणत पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. अनय जोगळेकर यांच्या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, “बदलती जागरुकता आणि रोजच्या जीवनातले वैश्विकीकरण लक्षात घेता, परराष्ट्र संबंधांच्या प्रगल्भीकरणासाठी अनय जोगळेकर यांच्या या पुस्तकाचे वेगळे महत्त्व आहे. तसेच, विकासाचे राजनयन करणार्‍या भारताची इतर विकसनशील देशांना, त्यांच्या विकासाच्या वाटेत समन्वय निर्माण करण्यासाठी भारताचीभूमिका अगत्याची वाटते,” असे त्यांनी सांगितले. डिप्लोमसीची जागा पिप्लोमसीने अर्थात लोकनयनाने घेण्याची गरज त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविली. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात आपला परराष्ट्र धोरणांशी संबंध नाही, असा विचारही भारतीयांना करून चालणार नसल्याचे ते म्हणाले. अनय जोगळेकर यांचे पुस्तक जाणीवजागृतीसाठी महत्त्वपूर्ण असून परराष्ट्र नीतीसारखा गुंतागुंतीचा विषय संदर्भ, संशोधन आणि रंजक शैलीत मांडल्याबद्दल त्यांनी अनय जोगळेकर यांचे विशेष कौतुकही केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अनय जोगळेकर यांचे अभिनंदन करत, “आता अभिनंदन बोलतानाही अभिमान वाटतो,” असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात गोखले म्हणाले की, “पाकिस्तानप्रेरित दहशतवाद यापुढे भारत कदापि सहन करणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला यावेळी चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे होते आणि ती कामगिरी आपल्या वायुदलाने फत्ते केली आहे आणि त्याबाबत मला भारतीय वायुदलाचा अभिमान वाटतो.

 

चिनी उत्पादनांचा भारतात वापर, विक्री टाळून ती भारतात कशी उत्पादित करता येतील, याचा विचार करायला हवा,” असा सल्लाही गोखले यांनी दिला. आपल्या सैन्यात जवानांची जात, धर्म, राज्य आम्ही विचारत नसून प्रत्येक जवान हा केवळ भारतीयच असल्याचे सांगत आम्हाला आता संरक्षण सेना म्हणू नका, तर सशस्त्र सेना म्हणा,” असेही बहुमोल विचार गोखले यांनी मांडले.

 

या प्रकाशन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या इस्रायलच्या मुंबईतील वाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाइन यांनीही भारत-इस्रायल संबंधांच्या विस्तारणार्‍या क्षितिजांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “इस्रायलच्या पूर्वेला आम्ही लोकशाही राष्ट्र म्हणून भारताकडे बघतो, तर भारत आपल्या पश्चिमेला इस्रायलकडे लोकशाही राष्ट्र म्हणून पाहतो,” असे सांगून हे इस्रायलचे लुक ईस्टधोरण असून भारत हा द. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचेही ते म्हणाले. डिजिटल डिप्लोमसी, स्मार्टफोनरुपी प्रत्येकाच्या हाती असलेले हत्यार, लोकांचे लोकांशी संबंध यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी भाष्य केले. अनय जोगळेकर यांचे तोंडभरून कौतुक करताना, “भविष्यात अनय जोगळेकर मंत्री किंवा मुख्यमंत्रीही होऊ शकतील,” असे विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला.

 

पुस्तकाचे लेखक म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना अनय जोगळेकर यांनी त्यांना लिहिते करणार्‍या सर्व वृत्तपत्र, संपादक मंडळींचे, आपल्या परिवाराचे प्रथमत: मन:पूर्वक आभार व्यक्त केले. भारताच्या बदलेल्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, “चौथ्या औद्योगिक क्रांतीने देशांसह व्यक्तिगत जीवनात, त्यांच्या जागतिक आकलनातही आमूलाग्र बदल घडवून आणले. व्यापार, संरक्षण, पर्यटन तसेच, इतर क्षेत्रांतही परराष्ट्र व्यवहारांमुळे वाढ झाली आहे. त्यामुळे भारताचा, भारतीयांशी जगाशी संबंध आज मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. यामध्ये मोदींच्या परराष्ट्रनीतीचे मोठे योगदान असून त्याचे प्रतिबिंब सर्वच क्षेत्रात दिसून येते.” २०१४ साली शपथविधी सोहळ्यात सार्कदेशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यापासून ते ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या व्यासपीठावर भारतीय परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीपर्यंत परराष्ट्रसंबंधांच्या मोदीनीतीमुळे झालेले पॅराडाईम शिफ्टअनय जोगळेकर यांनी आपल्या मनोगतात थोडक्यात अधोरेखित केले. हे पुस्तक म्हणजे गेल्या पाच वर्षांतील नरेंद्र मोेदींचे विविध दौरे, २० हून अधिक देशांशी असलेलेद्विपक्षीय संबंध आणि महत्त्वाच्या जागतिक घटनांचा भारतावर होणारा परिणाम या विषयांवरील वृत्तपत्रील लेखाचे संकलन एकत्रिकरण असून ते मराठी वाचकांना समृद्ध करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल,” असे मत आपल्या प्रास्ताविकात उदय साळुंखे यांनी व्यक्त केले, तर माधव जोशी यांनी परराष्ट्र नीतीचा अभ्यास करताना या संदर्भमूल्य असलेल्या पुस्तकाचा नक्कीच विचार केला जाईल,” असे मत व्यक्त केले.

 

मसूद अझहरची चीनलाच भीती

 

चौथ्यांदा नकाराधिकार वापरत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावरटाळाटाळ करणार्‍या चीनचाही एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी पर्दाफाश केला. ते म्हणाले की, “चीन हा मसूद अझहरला घाबरत असल्यामुळे त्याला पाठीशी घालत आहे. त्याचे कारण, चीनमधील मुसलमानांच्या अन्यायाविरोधात मसूद अझहर चीनमध्येही दहशतवाद पसरवू शकतो, याची कल्पना चीनला आहे. पण, चीनमधील मुसलमानांवरील अन्याय-अत्याचारांवर पाकिस्तान आणि इतर इस्लामिक देश एक चकार शब्दही काढत नाहीत. कारण, सीपेकच्या माध्यमातून चीनचे पाकशी आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. पण, एक ना एक दिवस या दहशतवाद्याच्या झळा चीनलाही बसण्याशिवाय राहणार नाहीत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@